सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (12:43 IST)

लघुभागवत - अध्याय ११ वा

आतां पुढील कथा मनोहर । ऐका श्रोते सादर ।
रुक्मिणीचें स्वयंवर । सांगतों संक्षिप्त परिसावें ॥१॥
बलिराम ज्येष्ठ भ्राता । तेणें रेवतराजसुता ।
विवाहविधीनें केली कांता । नामें रेवती सद्रुणी ॥२॥
कनिष्ठ बंधु श्रीकृष्ण । रुक्मिणी संगें त्याचें लग्र ।
झाले, परंतु थोर विघ्र । विवाहसमयीं उद्भवलें ॥३॥
विदर्भ देशीं भीमक नृपती । कन्या त्याची गुणरुपवती ।
रुक्मिणी नामें सुमति सती । लग्रायोग्य जाहली ॥४॥
भीमकापाशी ब्राह्मण । येऊनि गाती कृष्णाचे गुण ।
तें रुक्मिणी करी नित्य श्रवण । अंत:करण वेधलें ॥५॥
म्हणूनि निश्चय करी सती । वरीन तरी कृष्णचि पती ।
हा निजविचार वडिलांप्रती । कथीतसे बहु विनयें ॥६॥
रुक्मिणीचा ज्येष्ठभ्राता । रुक्मी नामें चतुर होता ।
परी कृष्णव्देष्टा, त्याच्या चित्ता । हा संबंध रुचेना ॥७॥
त्याहूनि सर्व इतर । म्हणती रुक्मिणीचा कर ।
धरावया अन्य योग्य वर । नसे कृष्णासारिखा ॥८॥
परी रुक्मीच्या ऐसें मनीं । शिशुपालासी  द्यावी भगिनी ।
हें ऐकतांचि रुक्मिणी । चिंता करी अंतरीं ॥९॥
मग सुचली तीस युक्ति । पत्र सुंदर विप्राहातीं ।
पाठविलें कृष्णाप्रती । श्लोकबध्द लिहोनी ॥१०॥
त्यामाजीं साद्यन्त । लिहिलें होतें स्वमनोगत ।
तुमच्या चरणीं माझा हेत । असे सर्वथा यदुराथा ॥११॥
परी मध्दंधु रुक्मीच्या मानसीं । मज अर्पावी शिशुपालासी ।
म्हणूनि विवाहाच्या पूर्वदिवशीं । तुम्ही यावें अगत्य ॥१२॥
आमुचा ऐसा कुलाचार । देवीदर्शनासी वधूवर ।
लग्रापूर्वी सपरिवार । नेती अवश्य नियमेंचि ॥१३॥
तरी आपण तेथें असा सिध्द । शिशुपालासीं घडेल युध्द ।
सकळ जाणतांचि आपण प्रबुध्द । सुचनार्थ म्यां लिहिलें ॥१४॥
सारांश आतां नाहीं वेळ । पत्रदर्शनीं उतावीळ ।
निघूनि यावें, अधिक पाल्हाळ । लेखनार्थ सुचेना ॥१५॥
त्यापरी कृष्ण घननीळ । रुक्मिणीहरणार्थ सबळ ।
त्या विप्रासी घेऊनि तत्काळ । निघे रथीं बैसोनी ॥१६॥
इकडे जरासंधादि खल । घेऊनि आले शिशुपाल ।
सवें अपार सैन्यबल । सिध्द ठेविलें देउळीं ॥१७॥
ऐसें सर्वत्र कुंडिनपुर । गजबजलें तेव्हां अपार ।
सुतसंतोषार्थ सत्कार । करी भीषक सकळांचा ॥१८॥
वधूवरपक्षी देवकें । ठेविती परम कौतुकें ।
वाद्यें गर्जती अनेकें । आनंदले जन सर्व ॥१९॥
परी रुक्मिणी चिंताक्रात । जागृत राहे सारी रात ।
हळूचि रडे परम दु:खित । अन्नोदक वर्जुनी ॥२०॥
म्हणे मी दुदैवी पूर्ण । आला नाहीं अजुनि ब्राह्मण ।
किंवा नसे प्रसन्न कृष्ण । सत्य कांहीं कळेना ॥२१॥
तंव तिचा वाम बाहु स्फुरे । विप्रही येऊनि आनंदस्वरें ।
वदे आलों, झालें सारें । कार्य, चिंता नसावी ॥२२॥
कृष्णासी देखतां यथोचित । भीमक सत्कार करी बहुत ।
त्यायोगें रुक्मीचें चित्त । जळे मत्सरवह्रीनें ॥२३॥
कृष्णदर्शनें अरिसेना । भयें दचकली कांहीं सुचेना ।
तोंचि रुक्मिणी गौरीपूजना । वाजत गाजत चालली ॥२४॥
गौरीसी पूजूनि यथोपचारें । रुक्मिणी जों मागें फिरे ।
तोंचि उचलिली शार्डधरें । वधू दिव्यशक्तीनें ॥२५॥
शिशुपालाचे शूर जन । रक्षीस होते करुनि यत्न ।
तरी रुक्मिणी रुपरत्न । हरिलें कृष्णें क्षणार्धे ॥२६॥
भुलले सारे रक्षक । वस्तु नेली नाहीं ठाउक ।
शत्रूनें कापिलें नाक । हात चोळीत बैसले ॥२७॥
तेव्हां रुक्मी ससैन्य वेगें । लागला कृष्णाच्या मागें ।
त्याचाही गर्व श्रीरंगें । हरिला संपूर्ण तत्काळ ॥२८॥
शत्रूचा होतां पराभव । आनंदले सर्व यादव ।
मग कृष्णाचें गौरव । केलें भीमकनृपानें ॥२९॥
बलिरामादि समस्त । श्रीकृष्णाचे निकट आप्त ।
आलियावरी विधियुक्त । रुक्मिणी अर्पिली कृष्णातें ॥३०॥
रुक्मिणीस झाले दश कुमर। त्यांत प्रद्युम्र पराक्रमी थोर ।
तेणें वधिला शंबरासुर । महा यत्न करुनियां ॥३१॥
आतां ऐका एक चमत्कार । श्रीकृष्ण प्रभु यादवेश्वर ।
त्यावरी आला आळ थोर । चोरी केली म्हणोनि ॥३२॥
सत्राजित नामें यादव एक । होता सूर्याचा उपासक ।
प्रसन्न झाला त्यसी अर्क । उपासना देखोनी ॥३३॥
प्रसाद दिधला स्यमंतक । रत्नमणि अमोलिक ।
जो अष्टसहस्र तोळे कनक । प्रसवे नियमें प्रत्यहीं ॥३४॥
स्यमंतक करील धारण । त्याचें अखंड होय कल्याण ।
आधि व्याधि भय दारुण । होय शमन दर्शनें ॥३५॥
तें रत्न उग्रसेनाकारणें । मागीतलें श्रीकृष्णें ।
परी सत्राजित मूढपणें। रत्न त्यातें देईना ॥३६॥
कृष्णप्रसादाहूनि अधिक । मानिला मणी स्वमंतक ।
गंगेहूनि थिल्लरीचें उदक । श्रेष्ठ म्हणे तो मूर्ख ॥३७॥
असो सोदर त्याचा एके दिनीं । प्रसेन नामें स्यमंतक मणी ।
कंठीं घालूनि गेला वनीं । सिंहे तया मारिलें ॥३८॥
मणि घेऊनि जाय केसरी । तंव त्यातें जांबुवंत संहारी ।
मणि नेऊनि देई विवरीं । खेळावया बाळकां ॥३९॥
तेव्हां बोले सत्राजित। प्रसेनाचा केला घात ।
प्राय: यदुनाथेंचि निश्चित। मणिलाभार्थ काननीं ॥४०॥
हा आळ जनांच्या वदनीं । श्रीकृष्णाच्या आला कानीं ।
अपयश हरावया गेला वनीं । रत्न शोधावयातें ॥४१॥
शोधाअंती कळों आलें । प्रसेनासी सिंहें मारिलें ।
त्या सिंहातेंही वधूनि नेलें । जांबवतें रत्न तें ॥४२॥
म्हणूनि एकला श्रीहरी । शिरे जांबवंताचे कुहरीं ।
आणि तया संगे युध्द करी । एक मासपर्यत ॥४३॥
तेव्हां जांबवंत होय दीन । कृष्णासी येऊनि शरण ।
मणिसहित स्वकन्यारत्न । जांबवंती अर्पिली ॥४४॥
मग सत्राजितासी तो मणी । देता झाला चक्रपाणी ।
झालें तें वृत्त त्याचे कानीं । घालूनि कलंक धूतला ॥४५॥
कृष्णावरी घेऊनि आळ । वृथा केला त्याचा छळ ।
म्हणूनि सत्राजितासी तळमळ । अहोरात्र लागली ॥४६॥
घालवावया प्रभूचा रोष । आणि आपुलाही कृतदोष ।
प्रभूसी स्वकन्या ससंतोष । सत्यभामा अर्पिली ॥४७॥
वरी देत होता स्यमंतक । परी स्वीकारीना यदुनायक ।
यत्न केले तेणें अनेक । परी कृष्ण तया स्पर्शेना ॥४८॥
कथेचा इतुकाचि सारांश । यश किंवा अपयश ।
जयापजय लाभ नाश । नेमिलें तें टळेना ॥४९॥
कृष्णासी स्त्रिया अनेक । त्यांत रुक्मिणी देवी प्रमुख ।
पुत्रपौत्रांचेंही सुख । होतें उत्तम तयासी ॥५०॥
प्रद्युम्र नामें कृष्णाचा सुत । तत्पुत्र अनिरुध्द गुणवंत ।
त्याचें विवाहवृत्त अत्यंत । मनोरंजक परिसावें ॥५१॥
शोणितपुर नाम नगरीं । बाणासुर राज्य करी ।
बळ पराक्रमाचा भारी । वाहे मद सर्वदा ॥५२॥
त्याची कन्या उपवर । उषा नामें परम सुंदर ।
स्वप्रीं तियेनें  अनिरुध्द वर । वरिला पौत्र कृष्णाचा ॥५३॥
स्वप्रीं जें जें देखावें । तें स्वप्रींच सत्य भासावें ।
जागें होऊनि पहावें । तंव कांहीं नाहीं ॥५४॥
त्यापरी जागी होतां पाहे सती ।तंव स्वप्रींचा न देखे पती ।
तेव्हां खेद वाटे चित्तीं । कांहीं कार्य सुचेना ॥५५॥
स्वप्रींचे रुप मनोहर । उषा आठवे आठही प्रहर ।
स्वरुपाचा न पडे विसर ।कांहीं केल्या तियेतें ॥५६॥
तियेनें धरिलें ऐसें मनीं । वरीन वर, जो देखिला स्वप्रीं ।
परी ही गोष्ट पित्याचे कानीं । नाहीं तिनें घातली ॥५७॥
तरी सखी तिची चित्रलेखा । चतुर होती प्रधानकन्यका ।
तियेपाशीं आत्मदु:खा । मुक्तचित्तें निवेदिलें ॥५८॥
उषेचें ऐकूनि स्वप्रवृत्त । चित्रलेखेचें द्रवलें चित्त ।
म्हणे करीन दु:खमुक्त । सखि तूतें सत्वरीं ॥५९॥
मग त्रिभुवनींचे पुरुष । जे सौदर्यें प्रसिध्द विशेष ।
ते चित्रपटीं लिहोनि पुसे तीस । दाखवी कवण स्वप्रींचा ॥६०॥
म्हणे मी येथें तयास । आणीन करुनि प्रयास ।
तुज होय तो पूर्ण वश । ऐशी युक्ति योजीन मी ॥६१॥
मग उषेनें दाविल्यावरी । चित्रलेखेनें सत्वरीं ।
अनिरुध्दासी निद्रेच्या भरीं । उषामंदिरीं आणिलें ॥६२॥
 तो जागा होऊनि पाहे । तंव भलतीकडे आलों आहें ।
ऐसें देखतां अत्यंत मोहें । बावरे चित्त तयाचें ॥६३॥
मग तयासी सर्व वृत्तांत । कळतां झालें शांत चित्त ।
ऐसा बहुत काळ तेथ । सुखें तेणें लोटिला ॥६४॥
पुढें हें वृत्त एके दिनीं । पावलें बाणासुराच्या कानीं ।
तेव्हां सहज त्याचे मनीं । क्रोधानळ पेटला ॥६५॥
म्हणे मत्कन्येच्या सदनीं । माझ्या आज्ञेवांचुनी ।
परपुरुष वसे चोरुनी । त्यासी करुं शासन ॥६६॥
मग आवेशें झडकरी । आला उषेच्या मंदिरीं ।
अनिरुध्दातें धरुनि करीं । कारागृहीं ठेविलें ॥६७॥
इकडे व्दारकेमाजी जन । अनिरुध्दास्तव रात्रंदिन ।
तळमळती होऊनि उव्दिग्र । चहूंकडे शोधिती ॥६८॥
तेव्हा येऊनि वदे नारद । कीं बाणासुरें अनिरुध्द ।
ठेविला असे करुनि बध्द । कारागृहीं आपुल्या ॥६९॥
तैं बलिराम आणि कृष्ण । घेऊनि सवें यादवगण ।
बाणासुरासीं दारुण । युध्द केलें तयांनी ॥७०॥
पुढें बाणासुर येऊनि शरण । अनिरुध्दासी केली उषा अर्पण ।
विधिपूर्वक झालें लग्र । समारंभ थोर जाहला ॥७१॥
मग रामकृष्णादि समस्त । व्दारकेसी आले परत ।
पुढील कथा अद्भुत । सावधान परिसावी ॥७२॥
भागवत ग्रंथ प्रसिध्द । तेथील सार सुबोध ।
गातसे भक्त गोविंद । बालहिताकारणें ॥७३॥
याचें करितां श्रवण पठण । आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण ।
प्राप्त होईल विद्याधन । ऐसें वरदान व्यसाचें ॥७४॥
॥इति श्रीलघुभागवते एकादशोऽध्याय: ॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥