शुक्रवार, 5 डिसेंबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 4 डिसेंबर 2025 (15:44 IST)

समर्थ रामदास स्वामींना दत्त महाराजांचे दर्शन..

समर्थ रामदास स्वामींना दत्त महाराजांचे दर्शन
एकदा समर्थ रामदास माहुरगड येथे गेले. तेथे देवीचे दर्शन घेऊन दत्तात्रेयांचे स्थान असलेल्या माहुरगडापाशी आले. तेच अनुष्ठान करीत बसलेले दहापाच ब्राह्मण दिसले. त्यांस विचारले की, तुम्ही येथे का बसला आहात? तेव्हा ते म्हणाले, दत्तात्रेयांच्या दर्शनाकरिता अनुष्ठान करीत आहोत. ते ऐकून समर्थ म्हणाले उत्तम आहे. तुमच्या समागमे आम्हांसही दर्शन घडेल. असे म्हणून समर्थ ही तेथेच बसले.
 
दत्त महाराजांनी मलंग फकिरचा वेष धारण केला व एक बायको, तीन मुले, पंचवीस कोंबडे, सहा बकरे, एक रेडा यांसह देवालयाजवळ आले व स्त्रीला म्हणाले यहा खाना खाने का इरादा हैं। इस वास्ते हंडी पकाना। असे म्हणताच त्या स्त्रीने रेड्यावरून ओझे उतरवले. चूल मांडून त्यावर एक घागर पाणी मावण्याइतकी हंडी चढवली. तिने विचारले हंडी में क्या डालना? तेव्हा फकीर (दत्तात्रेय) बोलला की, मुर्गी काटके डाल। असे म्हणताच तिने पंचवीस कोंबडे कापून हंडीमध्ये टाकले तथापि हंडी रिकामी पाहून त्या मलंग स्त्रीने सांगितले की, हंडी भरी नही। असे म्हणताच मलंग फकीर म्हणाला, छोरे काटकर डालो। हे ऐकून तिने तिन्ही मुले कापून हंडीत टाकली आणी म्हणाली, अबतक हंडी भरी नही। असे बोलताच त्याने सांगितले, बकरिया काटकर डाल । ह्याप्रमाणे बकरीही कापून हंडीत टाकली व पुनः बोलली, इससे भी हंडी भरी नहीं। तेव्हा त्याने पुनःसांगितले की, रेडा काटकर डाल। हंडी काही भरली नाही असे त्या स्त्री ने सांगितले. तेव्हा फकीर बोलला की, इन बमनोको काटकर डालो। असे म्हणताच त्या बाईने सूरी घेऊन ब्राह्मणांकडे धाव घेतली. 
 
ब्राम्हणांनी पूर्वीचे तिचे सर्व कृत्य पाहिल्यामुळे त्यांनी आसन जपविधी, माळा,गोमुखीअवघे टाकून तेथून पलायन केले. रामदासस्वामी आणि कल्याण व उद्धव हे दोघेच तिथे राहिले. हे पाहून बाई फकिरास म्हणाली की  सब बम्मन भाग गये। फकीर बोलला अच्छा बहुत बेहत्तर हुआ। हंडी भरी नही, इस वास्ते जो एक बैठा हैं और दो खडे हैं, उनको काटकर डालो। मग समर्थानी स्मितहास्य करून मान पुढे केली.असे पाहून त्यांच्याकडे न जाता बाई प्रथम कल्याण व उद्धव यांच्याकडे गेली. त्या समयी त्यांनीही मान पुढे केली.
 
हे पाहून दत्त महाराज त्यांवर प्रसन्न होऊन त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले. हंडी, बाई वगैरे सर्व गुप्त झाले. तेव्हा रामदासा, आत ये असा शब्द मंदिरातून आला. त्या समयी स्वामींनी आत जाऊन साष्टांग नमस्कार केला.
 
दत्त महाराजांनी मस्तकी हात ठेवून समर्थांस उठवले.स्वामींनी दत्तात्रेयांची पूजा करून स्तवन केले. महाराज संतुष्ट झाले व त्यांनी समर्थांस विचारले कीं, श्रींची आज्ञा तुम्हास आहे, त्याप्रमाणे करतां कीं नाही? समर्थ म्हणाले श्रींची जी आज्ञा तीच आपली आज्ञा. त्याप्रमाणे सर्व करीत आहे.तेव्हा दत्तात्रेय म्हणाले तुम्ही येऊन दर्शन घेऊन जावे, ते न करता ब्राह्मणांजवळ बसण्याचें कारण काय? समर्थ उत्तरले, गरीब ब्राम्हण दर्शनाकरितां बसले होते. त्यांची इच्छा पूर्ण होईल म्हणून मीही त्यांच्याजवळ बसलों होतों. पुढें पाहतों तों आपण प्रत्यक्ष येऊन दर्शन न देतां उलट भय दाखवून सर्व ब्राह्मणांस पळविलें. हें असे करणे स्वामींस योग्य कीं अयोग्य? ते ऐकून दत्तात्रेय स्मितहास्य    करून उद्गारले, ते ब्राम्हण दर्शनास अपात्र असल्याने त्यांस भय दाखविलें. तुमच्या समागमे उद्धव कल्याण होते. त्यांस भय कां प्राप्त झाले नाही? माझ्या दर्शनास अधिकारी पाहिजेत. अशी आज्ञा होताच स्वामींनी पुन्हा विनंती केली कीं, ब्राम्हणांस दर्शन दिलें पाहिजे. तेव्हा महाराजांनी सांगितले कीं,तू त्यांना अधिकारी कर, म्हणजे दर्शन देऊं. त्यानंतर दत्तात्रेय अदृश्य झाले.
 
नंतर स्वामींनी उद्धवास सर्व ब्राह्मणांस बोलवायला पाठवले..घडलेला सविस्तर वृतांत त्यांना सांगितल्यानंतर  आम्ही दुर्दैवी आहोंत. स्वामी, आपण समर्थ आहांत, हें न कळतां गेलों. आतां दत्तात्रेय आपणच आहांत. तरी आम्हांवर कृपा करावी.अशी त्या ब्राम्हणांनी विनंती केली. हे पाहून स्वामींनी ब्राम्हणांस दयापूर्वक मंत्रानुग्रह दिला. नंतर दत्त महाराजांचे स्मरण करतांच पायीं पादुका, हातीं दंडक कमंडलू अशी त्रिगुणात्मक मूर्ती पुढें उभी ठाकली व ब्राम्हणांस व आपल्या शिष्यमंडळींना दत्त महाराजांचे दर्शन घडले..
 
भगवंताच्या भक्तिसाठी  वर्ण, जात, कुळ, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरूष असा भेदभाव नसतोच. भगवंत भक्तांचा केवळ प्रेमभाव, श्रध्दा, दृढ विश्वास पाहतो.
 
तसेच प्रभू दत्त दिगंबरांचे आहे. ते अल्पसंतोषी आहेत. कनवाळू आहेत. थोडया सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात. फक्त लागते ती उत्कट आस... "त्यांच्या भेटीची"... "अनुभूती" ची. मग ही त्रिमूर्ती कोणत्याही स्वरूपात येऊन प्रकट होतात. आपणास त्याची अनुभूती येतेच.मग ती कधी प्रत्यक्ष पणे म्हणा किंवा स्वप्नां व्दारे.. जेवढी उत्कट आपली भक्ती तशी अनुभूती दत्त महाराज देतातच.