शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 13 मार्च 2023 (10:00 IST)

एकनाथषष्ठी निमित्त विनम्र अभिवादन

ॐ नमो जी जनार्दना । नाहीं भवअभव भावना ।
न देखोनि मीतूंपणा । नमन श्रीचरणा सद्‌गुरुराया ॥
 
जय जय देवाधिदेवा । भोगिसी गुरुत्वें सुहावा ।
विश्वीं विश्वात्मा ये सद्‌भावा । तूं कृपेनें जेव्हां अवलोकिसी ॥
ते विश्वीं जो विश्ववासी । त्यातें विश्वासी म्हणसी ।
तेणें विश्वासें प्रसन्न होसी । तैं पायांपाशीं प्रवेशु ॥
 
काय काशी करिती गंगा।
भीतरीं चांगा नाहीं तो।।
अधणीं कुचर बाहेर तैसा।
नये रसा पाकासी।।
 
राम राम म्हणे । तया कां न येती विमाने ।
नवल स्मरणाची ठेव | नामी नाही अनुभव ।।
 
असा कसा देवाचा देव बाई ठकडा |
देव एका पायाने लंगडा ||
शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो |
करी दह्यादुधाचा रबडा ||
वाळवंटी जातो कीर्तन करितो |
घेतो साधुसंतांसि झगडा ||
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई |
देव एकनाथाचा बछडा ||
 
बहिरा झालो या या जगी ॥धृ॥ 
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥ 
नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥ 
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥
 
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥
आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥
शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥
हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥
एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥
 
कैसी समचरणींची शोभा । अवघा जगी विठ्ठल उभा ॥१॥
येणे विठ्ठले लाविले पिसे । जिकडे पाहे तिकडे दिसे ॥२॥
पाहते पाहणीयामाझारी । पाहते गेले पाहण्यापरि ॥३॥
एकाजनार्दनी एकू । विठ्ठल अवलोकी लोकु ॥४॥
 
देवा माझे मन लागो तुझे चरणी । संसार व्यसनी पडोनेदी ॥१॥
नामस्मरण घडो संतसमागम । वाउगाचि भ्रम नको देवा ॥२॥
पायी तिर्थयात्रा मुखी रामनाम । हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥
आणिक मागणे नाही नाही देवा । एकाजनार्दनी सेवा दृढ देई ॥४॥
 
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
 
परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
 
सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा
एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
 
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
 
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे
भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना