Festival Posters

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय ३०

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (14:12 IST)
 
याप्रमाणें उःशापवाणी निघतांच ती तेथून निघाली व मित्राचार्याची स्त्री शरयू हिच्या उदरीं तिचा जन्म झाला. शरयू गरोदर होऊन नऊ महिने पूर्ण होतांच ती प्रसूत होऊन कन्या झाली. ती कन्या मूळची अप्सरा असल्यामुळें तिचें स्वरूप अप्रतिम होतें. तिच नांव 'कदंबा' असें ठेवण्यांत आलें. कदंबा बारा वर्षाची झाली तेव्हां तिच्या बापानें तिच्याकरितां वर पाहण्याचा प्रयत्‍न चालविला. परंतु लग्न करण्याची तिची मर्जी नव्हती. ती रात्रंदिवस शंकराचें ध्यान करण्यांत निमग्न असे. शंकराची पूजा करण्यासाठीं आईबाप नित्य जात, त्यांच्यासमागमें ती नेमानें जात असे; परंतु ती मोठी होऊन तिला जसें समजूं लागलें, तशी ती एकटीहि शंकराच्या पूजेस देवालयांत जाऊं लागली.
 
एके दिवशी ती एकटीच शिवालयांत गेली होती. त्या वेळीं देवळांत दुसरें कोणी नव्हतें. 'जय शंकर' म्हणून शिवाच्या पाया पडून मस्तक जमिनीस टेकातांच शंकरानें अपलें प्रत्यक्ष रूप प्रकट केलें. तिला पाहतांच शिव कामातुर झाला. मग तो तिला धरण्याचा विचार करून धांवूं लागला, तेव्हां ती तेथून निसटून पळूं लागली. शिवानेंहि तिच्या मागोमाग धांवत जाऊन तिला धरिलें; पण शंकराचा स्पर्श होतांच ती सुरोचना पूर्ववत् अप्सरा होऊन स्वर्गास गेली.
 
परंतु कृत्य फसल्यामुळें शंकराच्या भलतीकडे वीर्यपात होऊन रेत कृष्णानदींत गेलें. पुढें शशांगर राजानें स्नान करून अर्ध्य देण्यासाठी हातांत उदक घेतलें, तों तें वीर्य हातांत आलें व राजास ओंजळीत मनुष्यदेहाचा पुतळा दिसूं लागला, मग आपणांस शंकरानें प्रसन्न होऊन अयोनिसंभव पुत्र दिला असा मनाशीं विचार करून अति हर्षानें घरीं जाऊन राजानें तो मुलगा मंदाकिनी राणीच्या स्वाधीन केला व तिला समग्र वृत्तांत निवेदन केला. ब्रह्मदेव, शंकर, विष्णु, इंद्र, बृहस्पति ह्यापैकीं कोणीतरी हा अवतार घेतला असावा असें त्यास वाटलें. मग राणीनें आनंदानें त्यास स्तनाशीं लावतांच पान्हा फुटून मुलगा दूध पिऊं लागला. त्याचें नांव कृष्णागर असें ठेविलें व रीतीप्रमाणें सर्व संस्कार केले. मग कांहीं दिवस तेथें राहून राजा कौडण्यपुरास गेला.
 
पुढें कृष्णागराचें वय बारा वर्षीचें झालें, तेव्हां त्याचें लग्न करण्याचें मनांत आणून राजानें मुलाच्या रूपास व गूणांस योग्य अशी कन्या शोधावयास बरीच मंडळी देशोदेशीं पाठविली. त्या मंडळीनीं अनेक स्थळें पाहिली. पण मुलाच्या योग्य मुलगी त्यांच्या पाहण्यात येईना. मग ते सर्व परत कौडण्यपुरास गेले व त्यांनीं सर्व मजकूर राजाच्या कानांवर घातला. पुढें कांहीं दिवसांनी मंदाकिनी राणी मरण पावली. तिच्या वियोगानें राजास परम दुःख झालें. राजानें वर्षश्राद्धापर्यंतचें तिचें उत्तरकार्य केलें.
 
पुढें राजास मदनाची पीडा होऊं लागली. पण पुनः लग्न करण्यास त्याचें मन धजेना. शेवटीं लग्न करण्याचा निश्चय करून त्यानें प्रधानास आपल्याजवळ बोलाविलें व त्यास आपला मनोदय सांगितला आणि माझ्यायोग्य एखादी मुलगी तुझ्या पाहण्यांत आहे काय, असें विचारलें, तेव्हां प्रधानानें सांगितलें कीं, पुरोहितानें बर्‍याच मुलींच्या टिपणांच्या नकला करुन आणिलेल्या आहेत; त्यापैकीं घटित पाहून कोणत्या मुलीशीं जुळतें तें पहावें, मग त्याचा विचार करून लग्न जुळविण्यास ठिक पडेल. मग प्रधानानें पुरोहितास बोलावून आणलें व मुलींच्या सर्व पत्रिका पाहिल्या त्यांत चित्रकूटचा राजा भूजध्वज ह्याच्या कन्येशीं चांगलें जमल. ती मुलगीहि अत्यंत रूपवती असून उपवरहि झालेली होती.
 
मग ही कामगिरी बजावण्याकरितां राजानें आपल्या प्रधानाला चित्रकुटास भूजध्वज राजाकडे पाठविलें. त्यानें तेथें जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्यास सर्व मजकूर कळविला. भूजध्वज राजासहि ही गोष्ट मान्य झाली. पत्रिका काढून पाहतां कांहीं नडण्याजोगें आलें नाहीं. मग त्यास मुलगी देण्याचें त्या राजानें कबूल करतांच प्रधानानें पत्र लिहून आपल्या राजाकडे दूत पाठविला. तो कौंडण्यपुरास गेल्यावर पत्र वाचून शशांगर राजास परमानंद झाला व तो लग्नासाठीं चित्रकूटास गेला. लग्नसोहळा उत्तम प्रकारें पार पडला. नंतर भुजावंती स्त्री घेऊन राजा आपल्या नगरांत परत आला. त्यावेळीं भुजवंती वय तेरा वर्षाचें व कृष्णागर पुत्राचें वय सतरा वर्षांचें होतें.
 
एके दिवशीं अशी गोष्ट घडून आली कीं, सापत्‍न पुत्राची व तिची नजरानजर झाली. त्यापूर्वीं तिनें त्यास निरखून पाहिलेलें नव्हतें. एकें दिवशीं राजा शिकारीस गेला असतांना राजपुत्र वावडी उडवावयास बाहेर पडला होता. त्यास पाहतांच भुजावंती कामानें व्याकूळ झाली. मग तिनें दासीस बोलावून सांगितलें कीं, तो पलीकडच्या घरीं वावडी उडवीत आहे; त्यास मजकडे घेऊन ये. आज्ञा होतांच दासीनें कृष्णानराजवळ जाऊन तुला तुझ्या सापत्‍न मातेनें बोलाविलें आहे, असा निरोप कळविला.
 
आईनें निरोप पाठविला म्हणून राजपुत्र आनंदानें दासीसमागमें भुजावंतीकडे गेला. त्यापूर्वीं तो एकदांच तिच्या भेटीस गेला होता. त्यानंतर ही दुसरी भेट बहुत दिवसांनीं होण्याचा योग येत असून आपली माता आपणास बोलावून नेत आहे, म्हणुन आपलें भाग्य उदयास आलें, असें त्यास वाटूं लागलें. त्या वेळीं भुजावंती रंगमहालाच्या दाराशीं त्याची वाट पाहात उभी राहिली होती; इतक्यांत दासी कृष्णागरास घेऊन तिकडे आली व राजपुत्रास भुजावंती दाखवून निघून गेली.
 
कृष्णागर सापत्‍न आईजवळ गेल्यावर त्यानें आईस नमस्कार केला. परंतु कामानें व्यथित झाल्यामुळें तिनें हा आपला मुलगा आहे हा विचार एका बाजूस ठेवून अन्य नजरेनें कृष्णागराकडे पाहिल्यानें तो मनांत दचकला. ती त्याच्याजवळ जाऊन व त्याचा हात धरून, मला या वेळेस भोग देऊन माझा काम शांत कर, असें तिनें त्यास उघड सांगितलें. तसेंच त्यानें वश व्हावें म्हणुन तिनें दोन शब्द बोलून बराच आग्रह केला. त्या वेळीं कृष्णागरानें संतापून तिची भीड न धरितां तिला अतिशय फजीत केलें. तो तिला म्हणाला, तुं माझी प्रत्यक्ष सापत्‍न माता आहेस; असें असतां तूं आज मजशीं पापकर्म करावयास प्रवृत्त झालीस. तुं काय रानातलें जनावर आहेस ? स्त्रियांची जात अमंगळ व दुष्ट त्या कसा अनर्थ करून सोडतील, याचा नेम नाहीं. असें बोलून हात झिडकारून तो पुन्हा पतंग उडवावयास गेला.
 
त्या वेळीं कामानें आपला अंमल भुजावंतीवर बसविल्यामुळें ती देहभान विसरली होती. जेव्हां हा आपला सापत्‍न पुत्र आहे, असें तिच्या पूर्ना लक्षांत आलें, तेव्हां ती भयभीत होऊन गेली, तिनें दासीस बोलावून सांगितलें कीं, मघाशीं मी तुजकडून जो पुरुष आणविला तो कोणी परका नसून माझाच सावत्र मुलगा होता; ह्यामुळें मोठ्याच अनर्थाची गोष्ट आपल्या हातून घडली आहे. आतां तो राजास ही हकिकत सांगेल व ती ऐकल्यावर राजा माझा प्राण घेतल्यावांचून राहणार नाहीं. त्यास्तव आतां विष खाऊन आपणच जिवाचा घात करावा हें चांगलें म्हणजे ही घाणेरडी गोष्ट उघडकीस येणार नाहीं.

सर्व पहा

श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : सर्व संकटांपासून संरक्षण देणारे प्रभावी दत्त स्तोत्र

श्री दत्त अपराध क्षमापन स्तोत्रम् : मनःशांती, क्षमा आणि श्री दत्त कृपा मिळवण्यासाठी दररोज पठण करा

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी यांनी रचलेल्या स्तोत्रांचे फलित

देवशयनी आषाढी एकादशी २०२६: दुर्मिळ शुभ योगांचा संयोग; सुख-समृद्धीसाठी करा हे ५ प्रभावी उपाय

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख