बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रीरामविजय - अध्याय ८ वा

अध्याय आठवा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥
धन्य धन्य तुम्ही संतसज्जन ॥ राममहिमार्णवीचें मीन ॥ त्यांतील अनुभवमुक्तें पूर्ण ॥ दृश्यमान सर्व तुम्ही ॥१॥
राजभांडारींचीं रत्नें बहुत ॥ तीं भांडारीयासी ठाउकी समस्त ॥ कीं मित्रप्रभेचा अंत अद्भुत ॥ अरुण एक जाणे पै ॥२॥
कीं पृथ्वीचें किती वजन ॥ हें भोगींद्र जाणे संपूर्ण ॥ कीं आकाशाचें थोरपण ॥ एक प्रभंजन जाणतसे ॥३॥
कवीची पद्यरचना किती ॥ हें एक जाणे सरस्वती ॥ चंद्रामृत वानिजे बहुतीं ॥ परी महिमा जाणती चकोर ॥४॥
कीं प्रेमळ कळा गोड बहुत ॥ हें एक जाणती भोळे भक्त ॥ कीं श्रीरामकथेचा प्रांत ॥ वाल्मीक मुनि जाणतसे ॥५॥
रामनामाचा महिमा अद्भुत ॥ एक जाणे कैलासनाथ ॥ कीं चरणरजाचा प्रताप बहुत ॥ विरिंचितनया जाणे पैं ॥६॥
म्हणोन कथा हे गोड बहुत ॥ एथींचा सुरस सेविती संत ॥ असो सप्तध्यायीं गत कथार्थ ॥ राम मिथिलेसमीप राहिला ॥७॥
देशोदेशींचे जे कां नृप ॥ त्यांसी मूळ धाडी मिथिलाधिप ॥ पृतनेसहित अमूप ॥ राजे लवलाहीं पातले ॥८॥
मूळ धाडिलें दशरथा ॥ परी तो न येचि सर्वथा ॥ कौशिक घेऊन गेला रघुनाथा ॥ वियोगव्यथा थोर त्यासी ॥९॥
माझे कुमर दोघेजण ॥ कौशिक गेला असे घेऊन ॥ माझिया श्रीरामाचें वदन ॥ कैं मी देखेन पूढती ॥१०॥
या वियोगानळेंकरून ॥ श्रावणावरी आहाळे रात्रंदिन ॥ मिथिलेसी न यावया पूर्ण ॥ हेंचि कारण जाणिजे ॥११॥
इकडे ऋषीसहित कौशिक ॥ आला ऐकोन राव जनक ॥ नगराबाहेर तात्काळिक ॥ सामोरा आला समारंभें ॥१२॥
मूर्तिमंत सूर्यनारायण ॥ ऐसा एक एक दिव्य ब्राह्मण ॥ देखतां जनकें लोटांगण ॥ समस्तांसी घातलें ॥१३॥
जनक म्हणे भाग्य अद्भुत ॥ जैं घरा आला साधुसंत ॥ आजि मी जाहलों पुनीत ॥ पूर्वपुण्य फळासी आलें ॥१४॥
नृप सादर पाहे विलोकून ॥ म्हणे श्यामसुंदर दोघेजण ॥ कौशिका हे कोणाचे कोण ॥ सुकुमार सगुण आणिले ॥१५॥
कीं शशी आणि चंडकिरण ॥ कीं वाचस्पति आणि सहस्रनयन ॥ कीं रमापति उमापति दोघेजण ॥ सुवेष धरोनि पातले ॥१६॥
वाटे यांचिया स्वरूपावरून ॥ कोट्यानकोटी मीनकेतन ॥ टाकावे कुरवंडी करून ॥ पाहतां मन उन्मन होय ॥१७॥
जनकासी म्हणे विश्र्वामित्र हे राया दशरथाचे पुत्र ॥ यांचें वर्णावया चरित्र ॥ सहस्रवक्रा शक्ति नोहे ॥१८॥
येणें मार्गीं ताटिका वधून ॥ सिद्धीस पावविला माझा यज्ञ ॥ वीस कोटी पिशिताशन ॥ सुबाहुसहित मारिले ॥१९॥
मार्गी चरणरजेकरूनी ॥ उद्धरिली सरसिजोद्भवनंदिनी ॥ हरकोदंड पहावें नयनीं ॥ म्हणोनि येथें पातले ॥२०॥
साक्षात् शेषनारायण ॥ राया तुवां न करितां प्रयत्न ॥ घरा आले मूळेंविण ॥ सभाग्य पूर्ण तूं एक ॥२१॥
अपचितां जैसा निधि भेटला ॥ चिंतामणि येऊन पुढें पडला ॥ कीं कल्पद्रुम स्वयें आला ॥ गृह शोधित दुर्बळाचें ॥२२॥
कीं निद्रिस्थाचे मुखांत ॥ अकज्ञमरत पडलें अमृत ॥ कीं क्षुधितापुढें धांवत ॥ क्षीरसिंधु पातला ॥२३॥
कीं शास्त्राभ्यासावांचून ॥ भाग्यें जाहलें अपरोक्षज्ञान ॥ कीं मृत्तिका खणितां निधान ॥ अकस्मात लागलें ॥२४॥
जैं भाग्योदयें होय नृपति ॥ तरी घरींच्या दासी सिद्धी होती ॥ कल्पिलें फळ तात्काळ देती ॥ आंगणींचे वृक्ष जे कां ॥२५॥
हातीं कांचमणि धरितां ॥ तो चिंतामणि होय तत्त्वतां ॥ तृणगृहें क्षण न लागतां ॥ सुवर्णमंदिरें पैं होती ॥२६॥
खडाणा गाई दुभती ॥ वैरी तोचि मित्र होती ॥ विशेष प्रकाशे निजममि ॥ राजे पूजिती येऊनि घरा ॥२७॥
समयोचित होय स्फूर्ति ॥ दिगंतरा जाय किर्ति ॥ पदोपदीं निश्र्चितीं ॥ यश जोडे तयांतें ॥२८॥
असो जनकासी म्हणे विश्र्वामित्र ॥ तुझा आजि उदय पावला भाग्यमित्र ॥ घरासी आला स्मरारिमित्र ॥ सकल अमित्रां त्रासक जो ॥२९॥
जनकें करून बहुत आदर ॥ विश्र्वामित्र श्रीराम सौमित्र ॥ निजसभेसी आणोनि सत्वर ॥ मान देऊनि बैसविले ॥३०॥
देशोदेशींचे नृपति ॥ राम पाहोनि आश्र्चर्य करिती ॥ सीता द्यावी हो याप्रति ॥ नोवरा रघुपति साजिरा ॥३१॥
एक म्हणती स्वयंवरीं केला पण ॥ भार्गवचापासी चढवावा गुण ॥ हें कार्य परम कठीण ॥ रामास केंवि आकळे ॥३२॥
मनांत म्हणे जनक नृपवर ॥ जरी जांवयी होईल रघुवीर ॥ तरी माझ्या भाग्यास नाहीं पार ॥ परी पण दुर्धर पुढें असे ॥३३॥
तंव तया मंडपांगणीं ॥ परम चतुर चपळ करिणी ॥ वरी दिव्य चंवरडोल जडितरत्नीं ॥ झळकतसे अत्यंत ॥३४॥
त्यामाजी बैसली जनकबाळा ॥ हातीं घेऊनियां दिव्यमाळा ॥ विलोकित सकळ भूपाळां ॥ ऋृषिवृंदांसहित पैं ॥३५॥
जवळी सखिया सकळ असती ॥ श्र्वेत चामरें वरी ढाळिती ॥ एक क्षणांक्षणां श़ृंगार सांवरिती ॥ विडे देती एक तेथें ॥३६॥
जे त्रिभुवनपतीची मुख्य राणी ॥ आदिमाया प्रणवरूपिणी ॥ जे इच्छामात्रेंकरूनि ॥ ब्रह्मांड हें घडी मोडी ॥३७॥
ब्रह्मादिक बाळें आज्ञेंत ॥ आपले निजगर्भीं पाळित ॥ तिचें स्वरूप लावण्य अद्भुत ॥ कवणालागीं न वर्णवे ॥३८॥
अनंतशक्ति कर जोडोन ॥ जी पुढें ठाकती येऊन ॥ जिनें आदिपुरुषा जागा करून ॥ सगुणत्वासी आणिला ॥३९॥
या ब्रह्मांडमंडपामाझारी ॥ जनकात्मजेऐशी सुंदरी ॥ उपमा द्यावया दुसरी ॥ कोणे अवतारीं नसेचि ॥४०॥
जैसें जांबूनदसुवर्ण तप्त ॥ तैसें सर्वांग दिव्य विराजित ॥ आकर्ण नेत्र विकासित ॥ मुखमृगांक न वर्णवेचि ॥४१॥
मुखीं झळकती दंतपंक्ति ॥ बोलतां जिकडे पडे दीप्ति ॥ पाषाण ते पद्मराग होती ॥ वाटे रत्नें विखुरती बोलतां ॥४२॥
जानकीचे आंगींचा सुवास ॥ भेदोन जाय महदाकाश ॥ जिणें भुलविला आदिपुरुष ॥ आपुल्या स्वरूपविलासें ॥४३॥
पाय ठेवितां धरणीं ॥ पदमुद्रा उमटती जे स्थानीं ॥ तेथें वसंत येऊनि ॥ लोळत भुलोनि सुवासा ॥४४॥
चंद्रसूर्याच्या गाळिल्या ज्योती ॥ तैशीं कर्णपुष्पें अत्यंत झळकती ॥ कर्णीं मुक्तघोस ढाळ देती ॥ कृत्तिकापुंज जैसे कां ॥४५॥
आकर्णपर्यंत विशाळ नयन ॥ माजी विलसे सोगियाचें अंजन ॥ कपाळीं मृगमद रेखिला पूर्ण ॥ वरी बिजवरा झळकतसे ॥४६॥
शीत दाहकत्व सांडोनि ॥ शशांक आणि वासरमणि ॥ सुदा विलसती दोनि ॥ मुक्ताजाळीं गगनीं भगणें जैशीं ॥४७॥
विद्युत्प्राय दिव्यांबर ॥ मुक्तलग चोळी शोभे विचित्र ॥ वरी एकावळी मुक्ताहार ॥ पदकीं अपार तेज फांके ॥४८॥
दशांगुळीं मुद्रिका यंत्राकार ॥ वज्रचुडेमंडित कर ॥ कटिकांचीवरी चालतां धरणीं ॥ जिचिया स्वरूपावरूनी ॥ कोटी अनंग ओंवाळिजे ॥५०॥

अध्याय आठवा - श्लोक ५१ ते १००
असो ऐशी ते चित्कळा ॥ सुकळ सभा विलोकी डोळां ॥ तो ऋृषिपंक्तिमाजी घनसांवळा ॥ परब्रह्मपुतळा देखिला ॥५१॥
विजयनामें सखीप्रति ॥ सीता म्हणे पाहें ऋषिपंक्ति ॥ त्यांमाजी विलसे जी मूर्ति ॥ माझी प्रिति जडली तेथें ॥५२॥
घनश्याम सुंदर रूपडें ॥ देखतां कामाची मुरकुंडी पडे ॥ सखे मज वर जरी ऐसा जोडे ॥ तरीच धन्य मी संसारीं ॥५३॥
बहुत जन्मपर्यंत ॥ तप केलें असेल जरी अत्यंत ॥ तरीच हा मज होईल कांत ॥ विजये निश्र्चित जाणपां ॥५४॥
नवस करूं कवणाप्रति ॥ कोणती पावेल मज शक्ति ॥ रघुवीर जरी जोडेल पति ॥ तरी त्रिजगतीं धन्य मी ॥५५॥
राजीवनेत्र घनसांवळा ॥ स्वरूपठसा सर्वांत आगळा ॥ आपले हातीं यासी घालीन माळा ॥ मग तो सोहळा न वर्णवे ॥५६॥
तों विश्र्वामित्र म्हणे जनकाप्रति ॥ आतां कोदंड आणावें शीघ्रगती ॥मिळाले येथें सर्व नृपती ॥ जे कां पुरुषार्थीं थोर थोर ॥५७॥
अष्टचक्रशकट प्रचंड ॥ त्यावरी ठेविलें चंडकोदंड ॥ सहस्रवीरांचे दोर्दंड ॥ ओढितां भागले न ढळेचि ॥५८॥
मग गजभार लाविले ॥ रंगमंडपीं ओढून आणिलें ॥ देखतां सर्व राजे दचकले ॥ म्हणती हे नुचले कोणाशीं ॥५९॥
एक म्हणती हें शिवचाप ॥ उचलील ऐसा न दिसे भूप ॥ एकास सुटला चळकंप ॥ गेला बळदर्प गळोनियां ॥६०॥
एक महावीर बोलत ॥ आम्ही कौतुक पाहों आलों येथ ॥ एक म्हणती जनकाचा स्नेह बहुत ॥ म्हणोनि भेटीस पातलों ॥६१॥
जनक सांगे सकळांतें ॥ हें विरूपाक्षें घेऊन स्वहतें ॥ शिक्षा लाविली दक्षातें ॥ सहस्रक्षातें नुचले हें ॥६२॥
ऐसिया चापासी उचलोन ॥ जो राजेंद्र वाहील गुण ॥ त्यासी हे जनकी गुणनिधान ॥ माळ घालील स्वहस्तें ॥६३॥
तटस्थ पाहती सकळ वीर ॥ कोणी न देती प्रत्त्युतर ॥ कोणी सांवरोनियां धीर ॥ चाप उचलूं भाविती ॥६४॥
तों मूळ न पाठवितां रावण ॥ प्रधानासहित आला धांवोन ॥ सभा गजबजली संपूर्ण ॥ म्हणती विघ्न आलें हें ॥६५॥
आतां गति येथें नव्हे बरी ॥ बळेंचि उचलोन नेईल नोवरी ॥ कोणी म्हणती क्षणाभीतरीं ॥ चंडीशचाप चढवील हा ॥६६॥
जनकासी म्हणे रावण ॥ तुवां धनुष्याचा केला पण ॥ तरी क्षणमात्रें तें मोडून ॥ कुटके करीन येथेंचि ॥६७॥
म्यां हालविला कैलास ॥ बंदीं घातले त्रिदश ॥ ऐरावतासमवेत देवेश ॥ समरभूमीस उलथिला ॥६८॥
तो मी रावण प्रतापशूर ॥ चाप लावाया काय उशीर ॥ उपटोनियां मेरुमांदार ॥ कंदुका ऐसे उडवीन ॥६९॥
पृथ्वी उचलोनि अकस्मात ॥ घालूं शकें मी समुद्रांत ॥ कीं घटोद्भवासारिखा सरितानाथ ॥ क्षणमात्रें शोषीन मी ॥७०॥
तरी आतां हेंचि प्रतिज्ञा पाहीं । हें चाप मोडूनि लवलाहीं ॥ होईन जनकाचा जावई ॥ सकळ रायां देखतां ॥७१॥
बसनें भूषणें सांवरून । चापाकडे चालिला रावण । गजगजिले जानकीचें मन अति उदिग्न जाहली ॥७२॥
म्हणे आपर्णापति त्रिनयना ॥ त्रिपुरांतका मदन दहना ॥ तुझें चाप नुचले रावणा ॥ गजास्थ जनका ऐसें करी ॥७३॥
या दुर्जनाचे तोंड काळें ॥ सदाशिवा करी शीघ्र वहिलें ॥ महा दैवतें प्रचंड सबळें ॥ या धनुष्यावरी बैसवी ॥७४॥
अहो अंबे मूळपीठ निवासिनी ॥ मंगळ कारके आदि जननी । या रावणाच्या शक्ती हिरुनी ॥ नेई मृडानी सत्वर ॥७५॥
ऐसें जानकीनें प्राथिलें । तो दैवतें धांविन्नलीं सकळे । गुप्तरूपें शीघ्र काळैं ॥ येऊन बैसली चापावरी ॥७६॥
नवकोटी कात्यायनी ॥ चौसष्ट कोटी योगिनी ॥ यां सहित कालिका येउनी ॥ धनुष्यावरी बैसत ॥७७॥
धनुष्य उचलूं गेला दशवक्त्र । तंव ते न ढळेचि अणुमात्र । बळें लाविले वीसही कर । जाहलें शरीर निस्तेज पै ॥७८॥
द्विपपंक्तीनें अधर प्रांत । शक्रारि जनक बळेंरगडित । चा उभें करितां त्वरित । जाहलें विपरीत तेधवां ॥७९॥
जैसा महाद्रुय उन्मळे । तैसें शिवचाप कलथलें । रावण उताणा पडे ते वेळे । हलकल्लोळ मांडला ॥८०॥
जैसा पूर्वीं गयासुर दैत्य । त्यावरी ठेविला पर्वत । तैसाचि पडला लंकानाथ । धनुष्य अद्भुत उरावरी ॥८१॥
रावण पडतां भूतळीं । सभेवरी उसळली धुळी । दाही मुरवीं मृत्तिका पडली । आनंदली जानकी ॥८२॥
दाही मुखीं रुधिर वाहत । कासावीस जाहला बहुत । म्हणे धांवा धांवा समस्त । धनुष्य त्वरित काढा हें ॥८३॥
रावण म्हणे जनकाप्रती । माझे प्राण चालिले निश्र्चितीं । परी इंद्रजित कुंभकर्ण असती । तुज निर्दाळिती सहमुळीं ॥८४॥
गजबजली सभा समस्त । म्हणती कोण बळिवंत । हें चाप उचलील उद्भुत । महा अनर्थ ओढवला ॥८५॥
घाबरा झाला मिथुळेश्र्वर । म्हणे पृथ्वी झाली निर्वीर । क्षेत्री भार्गवें आटिले समग्र । त्रिसप्त वेळां हिंडोनि ॥८६॥
या सभेमाजीं बळिवंत । कोणी क्षेत्री नाहीं रणपंडित । कौशिकें ऐसी ऐकतां माता खुणावित श्रीरामचंद्रा ॥८७॥
जैसा निद्रिस्त सिंह जागा केला । कीं याज्ञिकें जात वेद फुंकिला । तैसा विश्र्वामित्रें ते वेळां । खुणाविला रघुवीर ॥८८॥
म्हणे नरवीर पंचानना । त्रिभुवन वंद्या राजवनयना । पुराण पुरुषा रघुनंदना । अरि मर्दना ऊठ वेगीं ॥८९॥
कमलोद्भव जनका उदारा । ताटिकांतका अहल्योध्दारा । मख पाळका समर धीरा । असुर संहारका ऊठ वेगी ॥९०॥
जैशी निशा संपतां तत्काळ । उदयाद्रिवरी ये रविमंडळ । तैसा राम तमालनीळ । उठून उभा ठाकला ॥९१॥
कीं महायाग होतां पूर्णाहुती । तत्काळे प्रकटे आराध्य मूर्ती । तैसा उभा ठाकला रघुपती । राजे पाहती टकमकां ॥९२॥
कीं प्रल्हादा कारणें झडकरी । स्तंभांतूनि प्रकटे नरहरी । कीं वेदांत ज्ञान होतां अंतरीं । निजबोध जेवीं प्रकटे ॥९३॥
वंदोनियां गुरुचरणां सवेंचि नमिलें सकळ ब्राह्मणां । पूर्ण ब्रह्मानंद रामराणा । वेद पुराणां वंद्य जो ॥९४॥
श्रीराम विरक्त ब्रह्मचारी । हे रमा आपणाविण कोण नवरी । या लागीं शरशुवीर विहारी । उठता जाहला तेधवां ॥९५॥
सभेस बैसले नृपवर । केले नानापरींचें शृंगार । परी सर्वांत श्रेष्ठ श्रीरामचंद्र । रोहिणीवर भगणांत जैसा ॥९६॥
कीं शास्त्रांमाजी वेदांत । कीं निर्जरांमाजी शचीनाथ । तैसा श्रीराम समर्थ । सभेत मुख्य विराजे ॥९७॥
उठिला देखोनि श्रीरामचंद्र । उचंबळला सीचे चा सुख समुद्र । नव मेघ रंग रघुवीर । रंग मंडपा प्रति आला ॥९८॥
कोटि अनंग ओवाळून । टाकावे ज्याच्या नखावरून ॥ जो अरिचक्रवारण पंचानन ॥ जात लक्षून धनुष्यातें ॥९९॥
देखतां राम सुकुमार ॥ घाबरलें सीतेचें अंतर ॥ म्हणे कोमळगात्र रघुवीर ॥ प्रचंड थोर धनुष्य हें ॥१००॥

अध्याय आठवा - श्लोक १०१ ते १५०
कूर्मपृष्ठी जैसा कठोर ॥ तैसें हें कोदंड प्रचंड थोर ॥ दशरथकुमार सुकुमार ॥ कैसें उचलेल तयातें ॥१॥
मदनदहनाचें धनुष्य थोर ॥ रघुनाथमूर्ति मदनमनोहर ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥२॥
घनश्यामकोमळगात्र ॥ राजकुमार राजीवनेत्र ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥३॥
बळहत केला दशकंधर ॥ परम कोमल रघुपतीचे कर ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥४॥
वाटे खुपती कोमळ कर ॥ ऐसी रामतनु सुकुमार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥५॥
मज न गमेचि दुसरा वर ॥ तुज सत्य करणें पण साचार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुजा ॥६॥
चंडीशकोदंड प्रचंड थोर ॥ लघुआकृति राम निर्विकार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुजा ॥७॥
श्रीरामावांचून इतर ॥ पुरुष तुजसमान साचार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥८॥
दुजा वरावया येतां वर ॥ देह त्यागीन हा निर्धार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥९॥
सीता विजयेसी म्हणे अवधारीं ॥ बाप नव्हे हा वाटतो वैरी ॥ हा पण त्यजोनि निर्धारीं ॥ रामासी मज अर्पीना ॥११०॥
ऐसें सीतेचें अंतर ॥ जाणोनियां जगदोद्धार ॥ दंड पिटोनि प्रचंड थोर ॥ कोदंडासमीप पातला ॥११॥
दशरथ महाराज दिग्गज ॥ त्याचा छावा रघुराज ॥ धनुष्यइक्षु देखोनि सहज ॥ परम चपळ धांविन्नला ॥१२॥
श्रीरामसव्यबाहु प्रचंड ॥ हाचि वरी केला शुंडादंड ॥ भवधनुष्यइक्षु द्विखंड ॥ करील आतां निर्धारें ॥१३॥
दशकंधर हें पद्मकानन ॥ वीस हस्त द्विपंचवदन ॥ तीस कमळें हीच पूर्ण ॥ कोदंड जाण इक्षु तेथें ॥१४॥
पद्मवनीं गज निघे लवलाहीं ॥ मग त्यासी कमळांची गणना काई ॥ तैशीं दशमुखाचीं हस्तकमळें पाहीं ॥ तुडवीत आला रघुवीर ॥१५॥
तटस्थ पाहती सकळ जन ॥ म्हणती विजयी हो कां रघुनंदन ॥ सीतानवरी हे सगुण ॥ यासीच घालो निजमाळा ॥१६॥
आनंदमय सकळ ब्राह्मण ॥ चिंतिती रामासी जयकल्याण ॥ म्हणती हें भवचाप मोडून ॥ टाको रघुवीर सत्वर ॥१७॥
एक म्हणती राम सुकुमार ॥ नीलपंकजतनु वय किशोर ॥ भवकोदंड प्रचंड थोर ॥ उचलेल कैसें रामातें ॥१८॥
एक म्हणती चिमणें रामाचें ठाण ॥ एक म्हणती सिंह दिसतो लहान ॥ परी पर्वताकार गज विदारून ॥ न लागतां क्षण टाकितो ॥१९॥
घटोद्भव लहान दिसत परी क्षणें प्राशिला सरितानाथ ॥ गगनीं सविता लघु भासत ॥ परी प्रभा अद्भुत न वर्णवे ॥१२०॥
असो ते वेळे रघुवीर ॥ विद्युत्प्राय उत्तरीय चीर ॥ तें सरसावोनि सत्वर ॥ कटिकप्रदेशीं वेष्टिलें ॥२१॥
माथां जडित मुकुट झळकत ॥ आकर्णनेत्र आरक्त रेखांकित ॥ मस्तकीचें केश नाभीपर्यंत ॥ दोहोकडोनि उतरले ॥२२॥
किशोर सुकुमार भूषण ॥ अलकसुवासें भरलें गगन ॥ त्या सुवासासी वेधून ॥ मिलिंदचक्र भ्रमतसे ॥२३॥
श्रीरामतनूचा सुवास पूर्ण ॥ जात सप्तावरण भेदून ॥ असों तें शिवधनुष्य रघुनंदन ॥ करें करोनियां स्पर्शीत ॥२४॥
नीलवर्ण कुंतल ते अवसरीं ॥ पडले दशकंठाचे हृदयावरी ॥ विषयकंठवंद्य ते अवसरीं ॥ सांवरोनि मागें टाकित ॥२५॥
शिवधनुष्यासीं घंटा सतेज ॥ वरी विद्युत्प्राय झळके ध्वज ॥ त्सासमवेत रघुराज ॥ उचलिता जाहला ते काळीं ॥२६॥
गज शुंडेनें आक्रमी इक्षुदंड ॥ तैसें रामें आकर्षिलें कोदंड ॥ पराक्रम परम प्रचंड ॥ दशमुंड विलोकीतसे ॥२७॥
परम म्लान द्विपंचवदन ॥ दृष्टीं देखोनि गाधिनंदन ॥ म्हणे नरवीरश्रेष्ठा वेगेंकरून ॥ संशय हरणे सर्वांचा ॥२८॥
जनक म्हणे कौशिक मुनी ॥ ज्या चापें दशकंठ धोळिला धरणींते धनुष्य रामाचेनी ॥ कैसें उचलेल नेणवे ॥२९॥
जनकासी म्हणे ऋषि कौशिक श्रीराम हा वैकुंठ नायक । अद्भुत करील कौतुका पाहें नावेक उगाचि ॥१३०॥
इकडे रामें धनुष्य उचलून । क्षण न लागता वाहिला गुण । ओढी ओढिली आकर्ण सुहास्य वदनें तेधवां ॥३१॥
श्रीरामाचें बळ प्रचंड । ओढीस न पुरेचि भव कोदंड । तडाडिलें तेणें ब्रह्मांड । चाप कर करिलें तेधवां ॥३२॥
मुष्टीमाजीं तडाडित । जैशा सहस्र चपळा कडकडित । विधि आणि वृत्रारि हडबडित । वाटे कल्पांत जाहला ॥३३॥
उर्वी मंडळ डळमळित । भोगींद्र मान सरसावित । दंतबळें उचलोनि देत । आदिवराह पाताळीं ॥३४॥
सभा सकळ मुर्च्छित जाहली । महावीरांची शस्त्रें गळालीं । राजे भाविती उर्वी चालिली । रसातळा आजीच ॥३५॥
रामें चाप केलें द्विखंड । प्रतापें भरलें ब्रह्मांड । पुष्प संभार उदंड । वृंदारक वर्षती ॥३६॥
सभा सकळ मुर्च्छित जाहली । परी एक चौघे सावध पाहत । जनक आणि गाधिसुत । सीता सौमित्र चौघेंही ॥३७॥
असो भवकोदंड मोडोनी । द्विखंड रामें टाकिली धरणीं । रावण उठोन ते क्षणीं । अधोवदनें चालिला ॥३८॥
सभेस मारावया आणिती तस्कर । तैसा म्लान दिसे दशवक्त्र । कीं रणीं अवेश आलिया महावीर । त्याचा मुखचंद्र उतरे जेवीं ॥३९॥
कीं दिव्य देतां खोटा होत । मग तो मुख नदाखवती लोकांत । तैसा प्रधानेंसी लंकानाथ । गेला त्वरित स्वस्थाना ॥१४०॥
पुण्य सरतां स्वर्गींहूनि खचला । कीं याज्ञिकें अंत्यज बाहेर घातला । कीं द्विज याती भ्रष्ट जाहला । तो जेवीं दवडिला पंडितीं ॥४१॥
याची प्रकारें सभेंतूनी । रावण गेला उठोनी । जैसा केसरीच्या कवेंतूनी । जंबूक सुटला पूर्व भाग्यें ॥४२॥
असो इकडे विजयी रघुनंदन । जैसा निरभ्र नभीं चंड किरण । सुकुमार नव घन तनु सगुण । भक्तजन पाहती ॥४३॥
सर्वांचे नयनीं अश्रुपात । ऋषि चक्र सद्रदित । हा कोमल गात्र रघुनाथ । कठीण चाप केवी भंगिलें ॥४४॥
श्रीराम सौकुमार्याची राशी । विश्र्वामित्रें धांवोनि वेगेंसी । रघुवीर आलिंगला मानसीं । प्रेमपूर न आवरे ॥४५॥
म्हणे आदिपुरुषा पूर्णब्रह्मा । स्मरारि मित्रा आत्मयारामा । भक्तकाम कल्पद्रुमा । अद्भुत लीला दाविली ॥४६॥
तुझ्या करणी वरूनि लावण्य खाणी । ओंवाळावी वाटे समग्र धरणी । आणि या जीवाची कुरवंडी करोनी । तुज वरोनि सांडावी ॥४७॥
इतुक्यांत करिणी वरोन लावण्य खाणी । खालीं उतरोनि तेच क्षणीं । माळ घेऊन नंदिनी । हंस गमनी चमकत ॥४८॥
मेदिनी म्हणे मी धन्य । माझी कन्या वरील रघुनंदन । श्रीराम जामात सगुण । मन मोहन जगद्वंद्य ॥४९॥
श्रीराम जगाचा जनिता । जानकी सहजचि जगन्माता । तारावयासी निज भक्तां । आली उभयतां रूपासी ॥१५०॥

अध्याय आठवा - श्लोक १५१ ते २००
श्रीराम सच्चिदानंद घन तनु । जो पुराण पुरुष पुरातनु । जो पूर्णावतारी पूर्णब्रह्म धनु । सकळ तनूंचा साक्षी पैं ॥५१॥
आदि मध्य जो अंती । परी हाचि एक सीतेचा पती । तुच्छ करून सकळ नृपती । वरी रघुपती प्रियकर ॥५२॥
हंस गती जानकी चालत । पद भूषणें मधुर गर्जत । गळां माळ घालूनि त्वरित । मस्तक चरणीं ठेविला ॥५३॥
गळां घालतांचि माळ । जाहला स्वानंदाचा सुकाळ । वाद्यें वाजों लागलीं तुंबळ । नांदें निराळ दुमदुमिलें ॥५४॥
संतोषला मिथुळेश्र्वर । म्हणे माझे भाग्यास नाहीं पार । जांवई जाहला रघुवीर । भुवन सुंदर मेघश्याम ॥५५॥
जनकें आणि विश्र्वामित्रें । लिहीलीं अयोध्येसी दिव्य पत्रें । घेऊनियां दूत त्वरें ॥ अयोध्येसी पातले ॥५६॥
कुंकुममंडित पत्रें ॥ लिहिलीं होती विश्र्वामित्रें ॥ ती उचलोनी अजराजपुत्रें ॥ वसिष्ठाकरीं दीधलीं ॥५७॥
दोहींतील एकचि अभिप्राय ॥ गूढ परम लिहिलें चातुर्य ॥ त्याचा अर्थ करोनि ऋषिवर्य ॥ ब्रह्मकुमर सांगतसे ॥५८॥
हिमनगजामातसायकासन ॥ भंगूनि विजयी झाला बाण ॥ तेव्हां थरथरिला पूर्ण ॥ आनंदघन रथस्वामी ॥५९॥
गुणें केली बहुत स्तुति ॥ आनंदें यश वर्णी सारथी ॥ जोंवरी रथचक्रे असती ॥ वोहोरें नांदोत तोंवरी ॥१६०॥
रथगर्भीं होतें जें निधान ॥ तेणें बाणप्रताप देखोन ॥ ऐक्य झालें चरणीं येऊन ॥ तुम्हीं त्वरेंकरून येईंजे ॥६१॥
अर्थ सांगे वसिष्ठमुनि ॥ साक्ष श्र्लोक असे महिम्नीं ॥ त्रिपुरवधीं जेव्हां शूलपाणि ॥ बाण चक्रपाणि जाहला ॥६२॥
पृथ्वीचा केला तेव्हां रथ ॥ चंद्रमित्र चाकें अद्भुत ॥ कनकाद्रि धनुष्य होत ॥ गुण तेथें फणींद्र पैं ॥६३॥
सारथि झाला कमलासन ॥ जानकी रथगर्भींचें रत्न ॥ बाण तोचि हा रघुनंदन ॥ शिव धनुष्य जेणें भंगिलें ॥६४॥
ऐसा अर्थ सांगे ब्रह्मसुत ॥ आनंदला राजा दशरथ ॥ दळभारें सिद्ध होत ॥ धाव देत निशाणीं ॥६५॥
सोळा पद्में दळभार ॥ चतुरंग दळ निघे निघे सत्वर ॥ सुमंतादि प्रधान राजकुमार ॥ भरतशत्रुघ्न निघाले ॥६६॥
कौसल्या सुमित्रा कैकयी राणी ॥ निघाल्या आरूढोनि सुखासनीं ॥ दूत वेत्रकनकपाणीं ॥ सहस्रावधि धांवती पुढें ॥६७॥
सप्तशतें दशरथाच्या युवती ॥ त्याही रामलग्ना पाहों येती ॥ सुखासनीं बैसोनि जाती ॥ अनुक्रमें करूनियां ॥६८॥
प्रजालोक निघाले समस्त ॥ निजरथीं बैसे दशरथ ॥ लक्षोनियां मिथिलापंथ ॥ परम वेगें चालिले ॥६९॥
पृथ्वीपति राजा दशरथ ॥ मस्तकीं आतपत्रें विराजित ॥ मित्रपत्रें परत शोभत ॥ दोहीं भागीं समसमान ॥१७०॥
मृगांकवर्ण चामरें ॥ एकावरी विराजती तुंगारपत्रें ॥ एक उडविती लघु चिरें ॥ दोहींकडे श्र्वेतवर्ण ॥७१॥
मकरबिरुदें पुढें चालती ॥ नभचुंबित ध्वज विराजती ॥ वाद्यगजरें करून क्षिती ॥ दुमदुमिली तेधवां ॥७२॥
पुढें शमदमांचे पायभार ॥ मागें सद्विवेकाचे तुरंग अपार ॥ त्यापाठीं निजबोधाचे कुंजर ॥ किंकाटती रामनामें ॥७३॥
निजानुभवाचे दिव्य रथ ॥ त्यावरी आरूढले वऱ्हाडी समस्त ॥ वारू तेचि चारी पुरुषार्थ ॥ समानगती धांवती ॥७४॥
जागृती प्रथम पेणें सत्य ॥ स्थूळ परग्राम अद्भुत ॥ तेथें न राहे दशरथ ॥ चित्तीं रघुनाथ भरला असे ॥७५॥
पुढें स्वप्नावस्था सूक्ष्मनगर ॥ तेथें न राहे अजराजकुमर ॥ म्हणे जवळी करावा रघुवीर ॥ आडवस्ति करूं नका ॥७६॥
पुढें सुषुप्ति अवस्था कारणपूर ॥ सदा ओस आणि अंधकार ॥ रामउपासक वऱ्हाडी थोर ॥ जाती सत्वर पुढेंचि ॥७७॥
मिथिलेबाहेर उपवन ॥ तुर्या अवस्था दिव्यज्ञान ॥ पुढें रघुनाथप्राप्तीचें चिन्ह ॥ राहिले लक्षोन तेथेंचि ॥७८॥
पुढें विराजे विदेहनगर ॥ ऐकों येत अनुहत वाद्यगजर ॥ निजभारेंसी विदेहनृपवर ॥ आला सामोरा दशरथा ॥७९॥
असो दृष्टी देखतां विदेहनृप ॥ आनंदें उठिला अयोध्याधिप ॥ क्षेम दीधलें सुखरूप ॥ अनुक्रमें सकळिकांसी ॥१८०॥
भरत शत्रुघ्न देखोन ॥ म्हणे आमचे सदनींहून ॥ राम सौमित्र आले रुसोन ॥ जनक संदेहीं पडिलासे ॥८१॥
दशरथ म्हणे हे शत्रुघ्न भरत ॥ आश्र्चर्य करी मिथिलानाथ ॥ असो समस्त गजरेंसी मिरवत ॥ निजमंडपांत आणिले ॥८२॥
चापखंडें देखतां ते वेळे ॥ वीरांसी रोमांच उभे ठाकले ॥ एकांचे नेत्रीं अश्रु आले ॥ कोदंडखंडें देखतां ॥८३॥
तंव तो भक्तकामकल्पद्रुम ॥ कौसल्येनें जवळी देखिला राम ॥ धांवोनि आलिंगिला परम ॥ हृदयीं प्रेम न समाये ॥८४॥
मांडीवरी घेऊनि रघुवीर ॥ म्हणे रामा तूं कोमलांग सुकुमार ॥ चंडीशकोदंड परम कठोर ॥ कैसें चढवोनि मोडिलें ॥८५॥
दशरथें आलिंगिला राम ॥ जो सच्चिदानंद मेघश्याम ॥ भरत शत्रुघ्न परम सप्रेम ॥ श्रीरामचरण वंदिती ॥८६॥
असो जनकें दिव्य मंदिरें ॥ जानवशासी दीधलीं अपारें ॥ दोहींकडे मंडप उभविले त्वरें ॥ मंगलतूर्यें वाजती ॥८७॥
लक्ष्मण भरत शत्रुघ्न ॥ परम प्रतापी राजनंदन ॥ जनकरायें देखोन ॥ दशरथासी विनविलें ॥८८॥
म्हणे जानकी दिधली रघुनंदना ॥ ऊर्मिला देईन लक्ष्मणा ॥ मांडवी श्रुतकीर्ति बंधुकन्या ॥ भरतशत्रुघ्नां देईन मी ॥८९॥
दशरथासी मानला विचार ॥ देवकप्रतिष्ठा केली सत्वर ॥ चौघी कन्यांसी परिकर ॥ हरिद्रा लाविली तेधवां ॥१९०॥
सीतेची शेष हरिद्रा ॥ ते पाठविली रामचंद्रा ॥ भरत शत्रुघ्न सौमित्रा ॥ शेष आलें तैसेंचि ॥९१॥
असो यथाविधि जाहलें नाहाण ॥ नोवरे बैसले चौघेजण ॥ तों जनक वऱ्हाडी वऱ्हाडिणी घेऊन ॥ मुळ आला वरांसी ॥९२॥
शांति क्षमा दया उन्मनी ॥ सद्बुद्धि सद्विद्या कामिनी ॥ तितिक्षा मुमुक्षा विलासिनी ॥ तुर्या आणि उपरति ॥९३॥
सुलीनता समाधि सद्रति ॥ परमसदनीं ह्या मिरविती ॥ तों वऱ्हाडी पातले निश्र्चिती ॥ श्रीरामासी न्यावया आले ते ॥९४॥
बोध आनंद सद्विवेक ॥ ज्ञान वैराग्य परमार्थ देख ॥ निष्काम अक्रोध अनुताप चोख ॥ रघुनायक विलोकिती ॥९५॥
जनकें पूजोनि चौघे वर ॥ तुरंगीं बैसविले सत्वर ॥ पुढें होत वाद्यांचा गजर ॥ गगनीं सुरवर पाहती ॥९६॥
मिरवत आणिले चौघेजण ॥ मणिमय चौरंग समसमान ॥ मधुपर्कविधि वरपूजन ॥ यथासांग करी नृपनाथ ॥९७॥
रघुपतीचें पद सुंदर ॥ स्वयें प्रक्षाळी मिथिलेश्र्वर ॥ सुमेधा घाली वरी नीर ॥ कनकझारीं घेऊनियां ॥९८॥
वेदांचा निर्मिता रघुनाथ्ज्ञ ॥ त्यासी घालिती यज्ञोपवीत ॥ रायें षोडशोपचारयुक्त ॥ पूजा केली तेधवां ॥९९॥
घटिका प्रतिष्ठिली अंतरीं ॥ कौशिक सर्वांसी सावध करी ॥ म्हणे वादविवादशद्बकुसरी ॥ टाकोन झडकरीं सावध व्हावें ॥२००॥

अध्याय आठवा - श्लोक २०१ ते २५०
चौघी कन्या आणिल्या बाहेरी ॥ डौरिल्या दिव्यवस्त्रालंकारीं ॥ स्नुषा देखोनि ते अवसरीं ॥ आश्र्चर्य करी दशरथ ॥१॥
अंतरपट मध्यें धरून ॥ तो फेडावयासी विद्वज्जन ॥ सुरस मंगळाष्टकें म्हणोन ॥ सावधान म्हणताती ॥२॥
जनकाची जी पट्टराणी ॥ सुमेधा नामें पुण्यखाणी ॥ चौघे जामात देखोनी ॥ आनंद मनीं समाये ॥३॥
म्हणे श्रीरामाच्या मुखावरून ॥ कोटी काम सांडावे ओंवाळून ॥ जानकीचें भाग्य धन्य ॥ ऐसें निधान जोडलें ॥४॥
असो मंगळाष्टकें म्हणती पंडित ॥ लग्नघटिका संपूर्ण भरत ॥ ॐपुण्या आचार्य म्हणत ॥ तों अंतरपट फिटलासे ॥५॥
मंगलाकार चापपाणी ॥ त्याचे मस्तकीं मंगलभगिनी ॥ मंगलाक्षता घालोनी ॥ मस्तक चरणीं ठेविला ॥६॥
सीतेचे मस्तकीं रघुनाथ ॥ लग्नाक्षता घाली त्वरित ॥ तोचि मस्तकीं ठेविला हस्त ॥ अक्षय कल्याणदायक जो ॥७॥
सीतेनें वरितां रघुनंदन ॥ ऊर्मिळेने परिणिला लक्ष्मण ॥ मांडवीनें भरत सगुण ॥ श्रुतकीर्ति शत्रुघ्न वरीतसे ॥८॥
तो मंगलतूर्यांचा घोष आगळा ॥ परम जाहला ते वेळां ॥ तेथींचा वर्णावया सोहळा ॥ सहस्रवदना अशक्य ॥९॥
अक्षय भांडारें बहुत ॥ जनक वरदक्षिणा देत ॥ याचकजन समस्त ॥ तृप्त केले निजधनें ॥२१०॥
विवाहहोमालागीं निर्धारीं ॥ वेगीं चला बहुल्यावरी ॥ नोवऱ्या कडिये झडकरी ॥ घेवोनियां चलावें ॥११॥
ऐकोनि हांसे रघुपती ॥ म्हणे प्रपंचाची विपरीत गति ॥ तों वसिष्ठ म्हणे रघुपति ॥ कडिये घेईं सीतेतें ॥१२॥
सीता उचलितां श्रीरामें ॥ तैसेंच तिघे करिती अनुक्रमें ॥ बहुल्यावरी आनंदप्रेमें ॥ चौघेजण बैसले ॥१३॥
लज्जाहोमादि सर्व विधि सिद्ध ॥ करी अहल्यासुत शतानंद ॥ जनकासी जाहला परम आनंद ॥ तो आल्हाद न वर्णवे ॥१४॥
तों अंतर्गृहीं रघुवीर ॥ पूजावया चालिला गौरीहर ॥ सीतेसी कडिये घेऊनि सत्वर ॥ श्रीरामचंद्र चालिला ॥१५॥
गौरीहर पूजोनि त्वरें आंबा शिंपिती चौघें वोहरें ॥ निंबलोण निजकरें ॥ सुमेधा उतरी तेधवां ॥१६॥
सुमेधेनें जाऊनि ते क्षणीं ॥ प्रार्थोनि आणिल्या तिघी विहिणी ॥ दिव्य वस्त्रालंकारें गौरवूनि ॥ मंडपात बैसविल्या ॥१७॥
देखोनिया चौघी सुना ॥ आनंद जाहला तिघींचिया मना ॥ इकडे जनक विनवी रघुनंदना ॥ विज्ञापना परिसावी ॥१८॥
चार दिवसपर्यंत ॥ येथेंच क्रमावे माझा हेत ॥ साडे जाहलिया त्वरित ॥ मग अयोध्येसी जाइंजे ॥१९॥
पुढील जाणोनि वर्तमान ॥ तें न मानीच रघुनंदन ॥ म्हणे आम्ही आतां येथून ॥ करूं गमन अयोध्येसी ॥२२०॥
कां त्वरा करितो रघुवीर ॥ आतां युध्दासी येईल फरशधर ॥ तरी तो प्रचंड वीर अनिवार ॥ मिथिलानगर जाळील पैं ॥२१॥
यालागीं संहारावया दशकंधर ॥ जाणें सत्वर लंकेसी ॥२२॥
झेंडा नाचवूं लंकेपुढें ॥ राक्षसांची अपार मुंडें ॥ ओंवाळणी पडतील कोंडें ॥ करील साडे बिभीषण ॥२३॥
ऐसें श्रीरामाचें मनोगत ॥ वसिष्ठ जाणोनि त्वरित ॥ जनकासी सांगे गुह्यार्थ ॥ वोहरें आतांचि बोळवीं ॥२४॥
मग जे अयोध्यावासी जन ॥ समस्तांसी दीधलें भोजन ॥ चौघें वोहरें आणि अजनंदन ॥ राण्या समस्त जेविल्या ॥२५॥
तात्काळ साडे करून ॥ वस्त्रालंकार सर्वांस अर्पून ॥ चौघांजणांसी आंदण ॥ अपार दीधलें तेधवां ॥२६॥
अश्र्व गज दास दासी ॥ तन मन धन अर्पिलें श्रीरामासी ॥ जनक निघाला स्वभारेंसी ॥ दशरथासी बोळवित ॥२७॥
ऐसें देखोनि नारद ऋृषि ॥ वेगें धांविन्नला बद्रिकाश्रमासी ॥ देखोनियां भृगुकुळटिळकासी ॥ म्हणे बैसलासी काय आतां ॥२८॥
तूं द्विजकुळीं महाराज वीरेश ॥ आणि त्या रामें तुझें भंगिलें धनुष्य ॥ तुज थोर आलें अपयश ॥ रामें यश वाढविलें ॥२९॥
मग बोले भृगुकुळदिवाकर ॥ आमचें अवतारकृत्य जाहलें समग्र ॥ मग म्हणे कमलोद्भवपुत्र ॥ तुज अणुमात्र क्रोध नये ॥२३०॥
जमदग्नीनें क्रोध टाकिला ॥ तो तात्काळचि मृत्यु पावला ॥ तुजही तैशीच आली वेळा ॥ दशरथी तुजला न सोडी ॥३१॥
शिवें तुज दीधलें पिनाक जाण ॥ तेणें घेतलें क्षत्रियांचे प्राण ॥ ऐसें बोलतां ब्रह्मनंदन ॥ जमदग्निसुत क्षोभला ॥३२॥
किंवा मृगेंद्र निजेला ॥ तो पदघातें हाणोन जागा केला ॥ कीं नरसिंहचि प्रकटला ॥ स्तंभाबाहेर दुसऱ्यानें ॥३३॥
घृतें शिंपिला वैश्र्वानर ॥ कीं नासिकेवरी ताडिला व्याघ्र ॥ कीं बळेंचि खवळिला फणिवर ॥ कीं महारुद्र कोपविला ॥३४॥
मग विष्णुचाप चढविलें ॥ नारद भार्गव दोघे निघाले ॥ श्रीरामासी आडवे आले ॥ मनोवेगेंकरूनियां ॥३५॥
सांवळा पुरुष दैदीप्यमान ॥ विशाळनेत्र सुहास्यवदन ॥ जटामुकुट मस्तकीं पूर्ण ॥ यज्ञोपवीत झळकतसे ॥३६॥
कांसेसी विराजे पीतांबर ॥ तडित्प्राय उत्तरीयवस्त्र ॥ परम आरक्त दिसती नेत्र ॥ कीं सहस्रकर उतरला ॥३७॥
धनुष्यास बाण लावून ॥ मार्गीं उभा ठाकला येऊन ॥ सोळा पद्में दळ संपूर्ण ॥ कंपायमान जाहलें ॥३८॥
ती सप्तकें जेणें फिरोनि ॥ निर्वीर केली अवनि ॥ अवघे राजे टाकिले आटोनि ॥ कीं प्रळयाग्नि दुसरा ॥३९॥
ऐसा तो महाराज जामदग्न्य ॥ क्षत्रियजलदजालप्रभंजन ॥ कीं हा कुठारपाणि भृगुनंदन ॥ वीरकानन निर्मुळ केलें ॥२४०॥
मार्गीं देखतां महाव्याघ्र ॥ भयाभीत होती अजांचे भार ॥ तैसा देखतां रेणुकापुत्र ॥ शस्त्रें गळालीं बहुतांचीं ॥४१॥
गजबजिला दळभार समस्त ॥ मिथिलेश्र्वर होय भयभीत ॥ स्त्रियांमाजी दडला दशरथ ॥ म्हणे अनर्थ थोर मांडिला ॥४२॥
तो वैराग्यगजारूढ रघुनाथ ॥ वरी निर्धार चवरडोल शोभत ॥ पुढें अनुभव बैसला महावत ॥ विवेकांकुश घेऊनियां ॥४३॥
ज्ञानाचे ध्वज फडकती ॥ चपळेऐसे सतेज तळपती ॥ विज्ञानमकरबिरुदें निश्र्चिती ॥ पुढें चालती स्वानंदें ॥४४॥
निवृत्तीच्या पताका पालविती मुमुक्षुसाधका ॥ रामनामचिन्हांकित देखा ॥ दयावातें फडकती ॥४५॥
मनपवनाचे अश्र्वभार चालिले ॥ अनुसंधानवाद्रोरे लाविले ॥ विरक्तिपाखरेनें झांकिले ॥ अनुभवाचे सोडलिे मुक्तघोस ॥४६॥
चिद्ररत्नजडित दिव्य रथ ॥ चारी वाचा चक्रें घडघडित ॥ घोडे जुंपिले चारी पुरुषार्थ ॥ सारथि तेथें आनंद पैं ॥४७॥
नामशस्त्रें घेऊनि हातीं ॥ सोहंशब्दें वीर गर्जती ॥ क्षणें प्रपंचदळ विध्वंसिती ॥ नाटोपती कळिकाळा ॥४८॥
रामावरी अद्वयछत्र ॥ स्वानंदाचें मित्रपत्र ॥ तन्मय चामरें परिकर ॥ प्रेमकुंचे वरी ढाळिती ॥४९॥
हडपेकरी शुद्धसत्व ॥ निजभक्तीचे विडे देत ॥ अष्टभाव सेवक तेथ ॥ राघवा पुढें धांवती ॥२५०॥

अध्याय आठवा - श्लोक २५१ ते ३१६
अनुतापलघुचीर घेऊनी ॥ मायिक धुरोळा वारी ते क्षणीं ॥ तर्क पिकपात्र धरूनी ॥ मुख विलोकिती रामाचें ॥५१॥
सौमित्र भरत शत्रुघ्न बंधू ॥ हेचि सच्चिदानंद आनंदू ॥ स्वरूपप्राप्तीचे कुंजर अभेदू ॥ तयांवरी आरूढले ॥५२॥
हिरे जडले दांतोदांती ॥ वरी मुक्तजाळिया मिरवती ॥ कामक्रोधांचे तरु मोडिती ॥ सहज जातां निजपंथें ॥५३॥
आशा तृष्णा कल्पना भ्रांति ॥ वाटे जातां गुल्में छेदिती ॥ शुंडा होणोनियां दांतीं ॥ कडे फोडिती विषयांचे ॥५४॥
मदमत्सरदंभपर्वत ॥ रथचक्रातळीं पिष्ट होत ॥ कुमतें पाषाण पिष्ट करित ॥ रगडोन जाती घडघडां ॥५५॥
धैर्यतुरंग अलोट चपळ ॥ मायारणांगणीं तळपती सबळ ॥ वरी रामउपासक निर्मळ ॥ कळिकाळासी न गणती ॥५६॥
शमदमांचे पायभार ॥ निष्कामखंडें झेलिती समग्र ॥ भवदळभंजन प्रतापशूर ॥ आत्मस्थितीं चालती ॥५७॥
अनुहत वाद्यें वाजती ॥ ऐकतां कुतर्क पक्षी पळती ॥ कर्मजाळ वनचरें निश्र्चितीं ॥ टाकोनि जाती स्वस्थाना ॥५८॥
चारी साही अठराजण ॥ रामासी वानिती बंदिजन ॥ चारी मुक्ति आनंदेकरून ॥ नृत्य करिती राघवापुढें ॥५९॥
वाटेसी अविद्या वहाती सरिता ॥ ते कोरडी जाहली दळ चालतां ॥ भाव निश्र्चय तत्वतां ॥ वेत्रधारी पुढें धांवती ॥२६०॥
सोहंभाव गर्जत ॥ वाटेसी द्वैतजनांतें निवारित ॥ पुढें भक्त स्वानंदें नाचत ॥ गुण वर्णित राघवाचे ॥६१॥
एक जाहले निःशब्द मुके ॥ ऐकती रामचरित्र कौतुकें ॥ एक अत्यंत बोलके ॥ एक समाधिसुखें डोलती ॥६२॥
ऐसा निजभारेंसी रघुनंदन ॥ जो कौसल्याहृदयमांदुसरत्न ॥ निजभार थोकला देखोन ॥ गजारूढ पुढें झाला ॥६३॥
तंव तो क्षत्रियांतक महावीर ॥ वडील अवतार ऋृषिपुत्र ॥ कर जोडोनि नमस्कार ॥ करी तयांतें राघव ॥६४॥
किंचित निवाला फरशधर ॥ मग बोले पंकजोद्भवपुत्र ॥ तुज देखोनि राघवेंद्र ॥ गजाखालीं उतरेना ॥६५॥
तूं वीर आणि विशेषें ब्राह्मण ॥ हा तुज कांहींच नेदी मान ॥ यथार्थ म्हणे भृगुनंदन ॥ लाविला बाण चापासी ॥६६॥
रघुपतीस म्हणे भृगुनंदन ॥ तूं क्षत्रिय म्हणवितोसी दारुण ॥ अधमा त्राटिका स्त्री वधून ॥ अधर्म केला साच पैं ॥६७॥
स्त्री रोगी मूर्ख बाळ ॥ योगी याचक अशक्त केवळ ॥ पंकगर्तेत अंध पांगुळ ॥ वृद्ध ब्राह्मण गाय गुरु ॥६८॥
ज्येष्ठबंधु मातापिता ॥ जो कां शस्त्र टाकोन होय पळता ॥ इतुक्यांवरी शस्त्र उचलितां ॥ महादोष बोलिला असे ॥६९॥
म्हणोनि तूं अधम वीर ॥ स्त्रीहत्या केली साचार । त्यावरी जानकीहृत्पद्मभ्रमर ॥ काय बोलता जाहला ॥२७०॥
म्हणे ताटिका नव्हे माझी माता ॥ तुवां मातृवध केला जाणता ॥ यापरीस काय अधमता ॥ उरली असे सांगपां ॥७१॥
उच्चवर्ण तूं ब्राह्मण ॥ सांडून अनुष्ठान तपाचरण ॥ तुज शस्त्र धरावया काय कारण ॥ राजहिंसा केलिया ॥७२॥
तूं ब्राह्मण परम पवित्र ॥ तुजवरी आम्ही धरावें शस्त्र । हे कर्म आम्हां अपवित्र ॥ ऋृषिपुत्रा जाणपां ॥७३॥
ऐसें ऐकतां फरशधर ॥ सोडी तात्काळ निर्वाण शर ॥ इकडे कोदंडासी बाण रघुवीर ॥ लाविला परी सोडीना ॥७४॥
कल्पांतचपळेसारिखे जाण ॥ येती भार्गवाचे तीक्ष्ण बाण ॥ ते दृष्टीनें पाहतां सीताजीवन ॥ जाती वितळोन क्षणार्धें ॥७५॥
जैसा झगटतां चंडपवन ॥ दीप सर्व जाती विझोन ॥ कीं शिवदृष्टीपुढें मदन ॥ न लागतां क्षण भस्म होय ॥७६॥
कीं प्रगटतां निर्वाणज्ञान ॥ मद मत्सर जाती पळोन ॥ कीं अद्भुत वर्षतां घन ॥ वणवा विझोन जाय जैसा ॥७७॥
जें जें टाकी अस्त्रजाळ ॥ तें तें दृष्टीनेंच विरे सकळ ॥ भार्गव म्हणे हा तमाळनीळ ॥ क्षीराब्धिवासी अवतरला ॥७८॥
आमुची सीमा जाहली येथून ॥ खाली ठेवी धनुष्यबाण ॥ गजाखालीं उतरोन सीताजीवन ॥ भेटावया धांविन्नला ॥७९॥
जैशा क्षीराब्धीच्या लहरी धांवती ॥ एकासी एक प्रीतीनें भेटती ॥ कीं अद्वैतशास्त्रींच्या श्रुती ॥ दोनी येती ऐक्यासी ॥२८०॥
राम फरशधर जेव्हां भेटले ॥ एकरूप दोन्हीचें ओतिलें ॥ कीं दोनी दीप एकचि जाहले ॥ तैसेंचि भासलें जनांसी ॥८१॥
एकस्वरूप दोघेजण ॥ कालत्रयीं न होती भिन्न ॥ भृगुपति रघुपति अभिधान ॥ परी दुजेंपण असेना ॥८२॥
जेणें निर्दाळिले सकळ क्षत्री ॥ ते क्रोधज्योति होती अंतरीं ॥ ती रघुपतीच्या मुखाभीतरीं ॥ प्रवेशली अकस्मात ॥८३॥
मग भार्गवासी म्हणे रघुनंदन ॥ म्यां जो चपासी लाविला बाण ॥ यास सांगें कांहीं कारण ॥ कोणीकडे टाकूं आतां ॥८४॥
परशुराम म्हणे स्वर्गमार्ग ॥ निरोधोनि टाकीं सवेग ॥ मी चिरंजीव होऊनि सांग ॥ तपचरण करीन ॥८५॥
तों निमिष न लागतां गेला बाण ॥ टाकिला स्वर्गमार्ग रोधून ॥ चिरंजीव केला भृगुनंदन ॥ हे कथा संपूर्ण नाटकीं असे ॥८६॥
असो अज्ञा घेऊनि तें वेळां ॥ भार्गव बद्रिकाश्रमीं गेला ॥ जनकासी निरोप दीधला ॥ तोही गेला मिथिलेसी ॥८७॥
इकडे नरवीरपंचानन ॥ देवाधिदेव रघुनंदन ॥ दळभारेंसी संपूर्ण ॥ अयोध्येसी पातला ॥८८॥
नगरांतून धांवती जन ॥ दृष्टीभरी पाहिला रघुनंदन ॥ साक्षात शेषनारायण ॥ अयोध्येंत प्रवेशती ॥८९॥
जें आत्म्प्राप्तीचें स्थान॥ तें अयोध्यानगर दैदीप्यमान ॥ प्रथम दुर्ग स्थूळदेह जाण ॥ सूक्ष्म आंतूनि दुसरें ॥२९०॥
कारणदुर्ग जाणिजे तिजें ॥ पुढें महाकारण ॥ दुर्ग विराजे ॥ षट्चक्रांची गोपुरें सतेजें ॥ ठायीं ठायीं झळकती ॥९१॥
असो नगराबाहेरूनि ॥ चारी अवस्था चारी अभिमानी ॥ हुडे झळकती पाहतां दुरोनि ॥ दिव्य तेज तळपतसे ॥९२॥
स्थूळ सूक्ष्म तत्वें बहुत ॥ या चर्या दाट झळकत ॥ पंच प्राण दशेंद्रियें तेथ ॥ वीर गर्जती ठायीं ठायीं ॥९३॥
भू नीर अनळ अनिल निराळ ॥ हेचि भांडीं वरी विशाळ ॥ शमदमांचे वृक्ष वरी निर्मळ ॥ सदां सफळ विराजती ॥९४॥
रज तम अविद्या केर ॥ नगरांत नाहीं अणुमात्र ॥ श्रवणचंदनसडे निरंतर ॥ चहूंकडे घातले ॥९५॥
मननाचिया रंगमाळा ॥ घरोघरी घातल्या निर्मळा ॥ शांतिकस्तूरीचा सुवास आगळा ॥ चहूंकडे येतसे ॥९६॥
निजध्यास तोरणें बहुत ॥ साक्षात्कार कळस झळकत ॥ कर्दळीस्तंभ विराजित ॥ मनोजयाचे चहूंकडे ॥९७॥
पूर्णानंदाचे कुंभ ॥ निजबोधें भरलें स्वयंभ ॥ आत्मप्रकाश दीप सुप्रभ चहूंकडे लखलखित ॥९८॥
अयोध्यावासियांच्या गळां ॥ सदा डोलती सुमनमाळा ॥ दयेचा तांबूल रंगला ॥ चतुर्थ मोक्षविशेष ॥९९॥
समाधि आणि सुलीनता ॥ सर्वांसी लाविल्या गंधाक्षता ॥ शुद्धसत्ववस्त्रें समस्तां ॥ मळ तत्वतां नसेचि ॥३००॥
चारी चौबारें बारा बिदी ॥ सोळा बाजार बहात्तर सांदी ॥ चौदा दासी त्रिशुद्धी ॥ पाणी वाहती अयोध्येंत ॥१॥
निरभिमानी चौसष्टजणी ॥ सदा विलसती श्रीरामसदनीं ॥ आणिक एक चारी आठजणी ॥ प्रीति करोनि राबती ॥२॥
अष्टभाव मखरें कडोविकडी ॥ नव महाद्वारें तेथें उघडीं ॥ ऊर्ध्वमुख निजप्रौढीं ॥ दशमद्वार झांकिलें ॥३॥
अष्टांगयोगी रामभक्त ॥ तेचि त्या द्वारें येत जात ॥ आणिकांस तो न सांपडे पंथ ॥ असे गुप्त सर्वदा ॥४॥
चतुर्दश रत्नें साधोनि वृत्रारि ॥ जैसा प्रवेशे अमरपुरीं ॥ कौसल्यात्मज ते अवसरीं ॥ तैसा अयोध्येंत प्रवेशला ॥५॥
सफळ देखोनि दिव्य द्रुम ॥ बहुत धांवती विहंगम ॥ तैसा पहावया आत्माराम ॥ नगरजन धांवती ॥६॥
देव वर्षती सुमनसंभार ॥ धडकत वाद्यांचा गजर ॥ मंडपघसणी झाली थोर ॥ श्रीराम पहावयाकारणें ॥७॥
देखोनियां रामचंद्र ॥ वेधले जनननयनचकोर ॥ उंचबळला सुरसमुद्र ॥ प्रेमभरतें दाटलें ॥८॥
कीं राम देखतां दिनमणी ॥ टवटविल्या निजभक्तकमळिणी ॥ सकळ लोकां अलंकारलेणीं ॥ राघवेंद्रे दीधली ॥९॥
भांडारें फोडोनि दशरथें ॥ निजधन वांटिलें याचकांतें ॥ गजारूढ बंदिजन तेथें ॥ सूर्यवंश वाखाणिती ॥३१०॥
निजात्मसदनीं रघुनाथ ॥ सीतेसहित प्रवेश समर्थ ॥ तनमनधनेंसी यथार्थ ॥ मूद वरोनि ओंवाळिजे ॥११॥
रामविजयग्रंथ प्रचंड ॥ येथें संपलें बालकांड ॥ पुढें अयोध्याकांड परम गोड ॥ श्रवणें कोड पुरवी पैं ॥१२॥
अग्राकडोनि इक्षुदंड ॥ मूळाकडे विशेष गोड ॥ सप्तकांड तैसा हा इक्षुदंड ॥ बहुत रसाळ पुढें पुढें ॥१३॥
पापपर्वत जडभार ॥ रामविजय त्यावरी वज्र ॥ संतश्रोते पुरंदर ॥ चूर्ण करिती निजबळें ॥१४॥
श्रीमद्भीमातटविलासा ॥ ब्रह्मानंदा पंढरीशा ॥ श्रीधरवरदा पुराणपुरुषा ॥ अभंगा अविनाशा अक्षया ॥१५॥
स्वति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत श्रोते चतुर ॥ अष्टमाध्याय गोड हा ॥३१६॥
श्रीरामचंद्रापर्णमस्तु ॥