शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 21 जुलै 2024 (11:04 IST)

भारतीय मुलीच्या मृत्यूबद्दल विनोद केल्याने अमेरिकन पोलिसाला नोकरीवरून काढलं, नेमकं प्रकरण काय?

जान्हवी खंडुला (23) ही भारतीय विद्यार्थिनी गेल्या वर्षी जानेवारीत सिएटल नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठात शिकत होती. गेल्या वर्षी एका रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला.पोलिसांच्या एका गाडीने धडक दिल्याने ती 30 मीटर दूर फेकली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
 
सिएटल टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार या अपघाताची चौकशी करणारे पोलीस अधिकारी डॅनिअल अड्रेअर त्यांच्याकडे असलेल्या बॉडी कॅमेऱ्यावर जान्हवीबद्दल आक्षेपार्ह बोलले.
“ती अगदी सामान्य व्यक्ती होती. तिच्या आयुष्याला फारसा अर्थ नव्हता,” असं ते विनोदाने म्हणाले.
 
सिएटल टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार डॅनिअल अड्रेअर यांनी केलेलं वक्तव्य अपमानजनक आणि निंदनीय होतं असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
 
बॉडी कॅमेऱ्यावरील विधानं
23 वर्षीय जान्हवी खंडुला विद्यार्थिनी होती. ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना तिला पोलिसांच्या एका गाडीने धडक मारली. ती गाडी 119 किमी प्रतितास या वेगाने जात होती. या धडकेमुळे ती 30 मीटर दूर फेकली गेली असं अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांनी सांगितलं.
 
डॅनिअल अड्रेअर या अपघाताचा तपास करण्यासाठी आले. ते हसले आणि त्यांनी म्हटलं की, जान्हवी ही एक सामान्य व्यक्ती होती आणि तिच्या नावाने फक्त एक चेक लिहा.
 
डॅनिअल या अपघाताबद्दल ही वक्तव्यं करत असताना त्यांच्या बॉडी कॅमेऱ्यावर हे रेकॉर्ड झालं.
फुटेजमध्ये डॅनिअल हसताना दिसताहेत.
 
“ती मेली आहे. अगदी सामान्य दिसतीये कोणीतरी. तिच्या नावे एक चेक लिहा. ही मुलगी फक्त 26 वर्षांची होती. तिला 11 हजार डॉलर्स मिळतील. तिच्या आयुष्याला तसाही काही अर्थ नव्हता.”
 
हा व्हीडिओ व्हायरल झाला. लोकांनी डॅनिअल यांच्यावर प्रचंड टीका केली.
 
पोलिसांची अस्वस्थ करणारी कृती- चौकशी समिती
बुधवारी (17 जुलै) सिएटल पोलिसांचे अंतरिम प्रमुख सुए राहर यांनी इमेलद्वारे जाहीर केलं की, डॅनिअल यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे.
 
डॅनिअल यांच्या या कृत्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे असं त्यांनी म्हटलं.
 
ते म्हणाले की, डॅनिअल याचं ते हास्य राक्षसी होतं. त्यामुळे जान्हवीच्या कुटुंबियाना जे दु:ख झालं आहे आणि कॉन्स्टेबल समुदायाची जी प्रतिमा मलीन झाली आहे त्याचं काहीच मोजमाप होऊ शकत नाही
“ते पोलिसात राहिले तर पोलिसांची प्रतिमा आणखी मलीन होईल यामुळे मी त्यांना नोकरीवरून काढत आहे,” असं त्यांनी म्हटलं.
 
डॅनिअल यांचा व्हीडिओ व्हायरल झाला आणि त्याची चौकशी सुरू आहे.
 
या अपघाताच्या तपासात केलेला भेदभाव आणि वागणूक यामुळे डॅनिअल यांना पोलीस सेवेतून काढून टाकावं अशी शिफारस 'द ऑफिस ऑफ पोलीस अकाउंटिबिलिटी' या संस्थेने केली. पोलिसांची वागणूक आणि व्यवहार यावर ही संस्था लक्ष ठेवून असते.
 
Published By- Priya Dixit