रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जुलै 2024 (10:20 IST)

माध्यमांसमोर बायडन अडखळले, कमला हॅरिस यांचा उल्लेख 'ट्रंप'; तर झेलेन्स्कींनाही म्हटलं होतं 'पुतिन'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गुरुवारी (11 जुलै) पत्रकार परिषदेत उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना उद्देशून 'उपाध्यक्ष ट्रम्प' असं म्हटल्याने पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.
 
राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निवडणुकीसाठी ते पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं दाखवण्यासाठी एका विशेष पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते.
 
पण ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आणखीन तीन डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी बायडन यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला. यामध्ये कॅलिफोर्नियाचे काँग्रेस सदस्य स्कॉट पीटर्स, इलिनॉयचे एरिक सोरेन आणि वॉशिंग्टनच्या मेरी ग्लुसेनकॅम्प पेरेझ यांचा समावेश आहे.
 
तासभर चाललेल्या या पत्रकार परिषदेत कमला हॅरिस आणि ट्रम्प यांच्या नावाबाबत केलेली चूक बायडन यांना लक्षातही आली नाही. यापूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी युक्रेनचे नेते झेलेन्स्की यांना 'राष्ट्रपती पुतिन' म्हटले होते. मात्र, नंतर त्यांनी हसून ही चूक सुधारली.
 
बायडन यांनी पत्रकारांना सांगितलं की, या निवडणुकीच्या शर्यतीत राहण्याचा निर्धार त्यांनी केला आहे आणि ते त्यांचे प्रतिस्पर्धी ट्रम्प यांचा 'पुन्हा' पराभव करण्यासाठी सज्ज आहेत.
 
पहिल्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये बायडन यांनी केलेल्या खराब कामगिरीबद्दल, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकाचं कारण दिलं होतं आणि ते म्हणाले होते की, जे झालं ते झालं आता मी आधीपेक्षा जास्त तयार आहे.
 
डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून उभे असलेले जो बायडन यांच्या प्रकृतीबद्दल सध्या त्यांच्याच पक्षातील सदस्यांमध्ये चिंता वाढत आहे. या पत्रकार परिषदेनंतर डेमोक्रॅट नेते स्कॉट पीटर्स यांनी 81 वर्षीय बायडन यांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केलं आहे.
 
याआधी, अमेरिकन संसदेच्या माजी अध्यक्ष नॅन्सी पेलोसी, डेमोक्रॅटिक पक्षासाठी निधी उभारणारे आणि सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते जॉर्ज क्लूनी यांनी देखील बायडन यांच्या प्रकृतीबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
 
याशिवाय व्हरमाँट येथील अमेरिकन सिनेटर पीटर वेल्श यांनी 'वॉशिंग्टन पोस्ट'मध्ये एक लेख लिहून बायडन यांना 'देशाच्या हितासाठी उमेदवारी सोडण्याचं आवाहन केलं होतं.
 
अमेरिकेत यावर्षी नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतायत. सध्यातरी जो बायडन विरुद्ध ट्रम्प अशी लढत होणार असल्याचं दिसत आहे. पण डेमोक्रॅटिक पक्षाचे उमदेवार जो बायडन यांच्या उमेदवारीविषयी सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे.
 
डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी बायडन यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता हॉलिवूड अभिनेते जॉर्ज क्लुनी यांनीही बायडन यांनी उमेदवारीचा पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे.
 
डेमोक्रॅटिक पक्षासाठी निधी उभा करणाऱ्या प्रमुख लोकांमध्ये अभिनेते जॉर्ज क्लुनी यांचा समावेश होतो. बायडन यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या लढाया जिंकल्या आहेत पण एक लढाई ते जिंकू शकत नाहीत ती म्हणजे काळाविरुद्धची लढाई."
 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्याआधी दोन उमेदवारांमध्ये आमने-सामने प्रेसिडेन्शियल डिबेट होतात. यापैकी पहिल्याच डिबेटमध्ये जो बायडन यांच्या कामगिरीवर शंका व्यक्त करण्यात आली आहे.
 
अमेरिकन संसदेच्या माजी अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनीही बायडन यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केले असून, त्या म्हणाल्या की, 'प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध अडखळल्यानंतर आता 81 वर्षांच्या जो बायडन यांच्याकडे वेळ कमी आहे. ते या स्पर्धेत राहतील की नाही हे त्यांना लवकर ठरवलं पाहिजे.
 
राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी पुन्हा पुन्हा हे स्पष्ट केलं आहे की येत्या नोव्हेंबर महिन्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून ते डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणार आहेत.
 
अभिनेते जॉर्ज क्लुनी यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये असं लिहिलं की, 'हे सांगताना अतीव वेदना होत आहेत' पण तीन आठवड्यांपूर्वी एका फंडरेझिंग (निधी उभारणी)च्या कार्यक्रमात जेव्हा ते जो बायडन यांना भेटले तेव्हा ते '2010चे बायडन नव्हते, एवढंच काय तर तो 2020चे' बायडन देखील नव्हते.
 
क्लुनी यांनी लिहिलं की, "प्रेसिडेन्शिएल डिबेटमध्ये आपण सगळ्यांनी ज्या बायडन यांना पाहिलं, त्यात काहीच बदल झालेला नव्हता."
 
क्लुनी यांनी लॉस एंजेलिसमध्येमध्ये आयोजित केलेल्या निधी उभारणीच्या कार्यक्रमात बायडन यांच्या प्रचारासाठी एका रात्रीत 30 मिलियन अमेरिकन डॉलर्सचा निधी उभारला गेला.
 
या कार्यक्रमात क्लुनी यांच्यासोबत ज्युलिया रॉबर्ट्स आणि बार्बरा स्ट्रीसँड या अभिनेत्री देखील उपस्थित होत्या. एका रात्रीत उभारलेल्या निधीचा हा विक्रम होता.
 
क्लुनी यांच्या या विधानानंतर बायडन समर्थकांकडून क्लुनी यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
 
एका निनावी सूत्राने अमेरिकन माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, 'त्या निधी उभारणीच्या कार्यक्रमात (फंडरेजर) जो बायडन यांनी तीन तासांपेक्षा अधिक वेळ घालवला पण जॉर्ज क्लुनी तिथे आले, त्यांनी फोटो घेतला आणि ते लगेच तिथून निघून गेले.'
 
राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या समर्थकांनी हेही सांगितलं की जो बायडन थेट इटलीवरून लॉस एंजेलिसच्या कार्यक्रमासाठी आले होते. ते इटलीला जी-7 परिषदेसाठी गेले होते.
 
क्लुनी यांनी त्यांच्या लेखात लिहिलं की, 'आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आता हे सांगणं थांबवलं पाहिजे की आम्ही जे काही बघितलं ते 5.1 कोटी लोकांनी बघितलं नसेल.'
 
क्लुनी यांनी पुढे म्हटलं आहे की, "इथे फक्त वाढत्या वयाचा मुद्दा आहे बाकी काही नाही. तरीही नोव्हेंबर महिन्यात याच राष्ट्राध्यक्षांसह आमचा विजय निश्चित आहेत."
 
क्लुनी यांनी लिहिलं आहे की त्यांना जी चिंता वाटतेय तशीच चिंता ते ज्या ज्या काँग्रेस सदस्यांशी बोलले त्यांना सतावत आहेत.
 
बायडन यांच्या यंत्रणेला क्लुनी यांच्या आक्षेपांबाबत विचारले असता त्यांनी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी डेमोक्रॅटिक सदस्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्राचा दाखला दिला, ज्यात असं लिहिलेलं होतं की डोनाल्ड ट्रंप यांचा आगामी निवडणुकीतला पराभव आणि त्यांची उमेदवारी या दोन्ही बाबतीत ते 'वचनबद्ध' आहेत.
 
वॉशिंग्टनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नाटो परिषदेचं यजमानपद भूषविणाऱ्या बायडन यांच्या उमेदवारीबाबत त्यांच्याच पक्षात असणाऱ्या नाराजीत वाढ होताना दिसत आहे.
 
नॅन्सी पेलोसी या डेमोक्रॅटिक पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्या आहेत. बायडन यांनी निवडणूक लढविण्याच्या केलेल्या निर्धाराबाबत नॅन्सी यांनी नापसंती व्यक्त केली आहे.
 
एमएसएनबीसी मॉर्निंग या कार्यक्रमात बोलताना नॅन्सी पेलोसी यांना विचारलं गेलं की बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवली पाहिजे की नाही?
 
यावर बोलताना पेलोसी म्हणाल्या की, "निवडणूक लढवायची की नाही हा सर्वस्वी राष्ट्राध्यक्षांचा प्रश्न आहे. तो निर्णय लवकरात लवकर घेण्यासाठी आम्ही सगळे नेते त्यांना प्रोत्साहन देत आहोत कारण आता फारच कमी वेळ राहिला आहे."
 
नाटो शिखर परिषदेदरम्यान अध्यक्षांच्या मागण्या मान्य करून, पेलोसी यांनी एमएसएनबीसीला सांगितलं की, "मी सगळ्यांना म्हणाले की आता काहीकाळ आपण थांबूया."
 
"हा आठवडा कसा जातो हे बघितल्याशिवाय तुम्ही काहीही ठरवू शकत नाही. सध्या तुम्ही जो कोणता विचार करत असाल तो खाजगीत व्यक्त करा पण सार्वजनिक मंचावर सध्या चर्चा न झालेली बरी. पण मला माझ्या राष्ट्राध्यक्षांचा खूप अभिमान वाटतो."
 
सुमारे डझनभर डेमोक्रॅटिक सदस्यांनी अशी टीका केली आहे की, 27 जून रोजी डोनाल्ड ट्रंप यांच्यासोबत झालेल्या डिबेटनंतर बायडन यांनी प्रचार मोहिमेत सक्रिय सहभाग घेतलेला नाही.
 
कोलोरॅडोचे मायकेल बेनेट यांनी मंगळवारी रात्री, सार्वजनिकरित्या याबाबत नाराजी व्यक्त केली. उघडपणे बायडन यांच्यावर असणाऱ्या नाराजी प्रकट करणारे ते पहिले सिनेटर आहेत.
 
मायकेल बेनेट यांनी बायडन यांच्या उमेदवारीवर थेट प्रश्न उपस्थित केला नसला तरी ते म्हणाले की हे जर असंच सुरू राहिलं तर डोनाल्ड ट्रंप विक्रमी मताधिक्याने निवडून येतील.
 
व्हरमाँटचे डेमोक्रॅटिक सिनेट सदस्य पीटर वेल्च यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये लेख लिहून बायडन यांनी देशाच्या भल्यासाठी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली पाहिजे अशी मागणी केली.
 
कनेक्टिकटचे डेमोक्रॅटिक सिनेटर रिचर्ड ब्लुमेन्थल यांनी पत्रकारांना सांगितलं की जो बायडन यांच्या निवडणूक जिंकण्याच्या क्षमतेबद्दल ते 'खूप चिंतित' आहेत.
 
न्यू यॉर्कमधील काँग्रेसचे सदस्य पॅट रायन यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं की, "आपल्या देशाच्या भल्यासाठी, माझ्या दोन लहान मुलांसाठी, मी जो बायडन यांना निवडणुकीतून माघार घेण्याचं आवाहन करत आहेत."
 
या सगळ्या मागण्या आणि आरोपांना प्रत्युत्तर देताना बायडन मोहिमेकडून सतत राष्ट्राध्यक्षांच्या एका विधानाचा दाखला दिला जातोय आणि ते विधान म्हणजे, "मी ही शर्यत संपेपर्यंत धावणार आहे."
 
डेमोक्रॅटिक हाऊसचे अल्पसंख्याक नेते हकीम जेफ्रीस यांनी अनेक काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या चिंतांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारपर्यंत जो बायडन यांच्यासोबत एक बैठक घेणार असल्याचं सांगितलं आहे.
 
असं असलं तरी अजूनही निवडून आलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांमध्ये बायडन यांना मोठं समर्थन असल्याचं दिसून येतं.
 
जॉर्ज क्लुनी यांनी बायडन यांच्या जागी संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांचं नाव पुढे केलं ते कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूजम यांनी मात्र बायडन यांनाच त्यांचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे.
 
अलेक्झांड्रिया ओकासिओ कॉर्टेझ सारख्या प्रमुख पुरोगामी सदस्यांचा समावेश असलेल्या काँग्रेशनल ब्लॅक कॉकस या सुमारे 60 नेत्यांच्या गटाने, बायडन यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे.
 
मंगळवारी, सिनेटमधील आघाडीचे डेमोक्रॅट नेते चक शूमर म्हणाले की, "मी जो यांच्यासोबत आहे." मात्र, ॲक्सिओसने दिलेल्या बातमीनुसार शुमर यांनी देणगीदारांना खाजगीत असं सांगितलं आहे की तर बायडन यांची साथ सोडण्यास तयार आहेत.
 
बीबीसीचे अमेरिकेतील भागीदार सीबीएस न्यूजशी बोलताना दोन अज्ञात ज्येष्ठ डेमोक्रॅटीक नेत्यांनी असं सांगितलं की, "मागच्या 24 तासांत निवडून आलेले डेमोक्रॅटिक सदस्य, देणगीदार आणि बायडन समर्थक गटांमध्ये बायडन यांच्या उमेदवारीबाबत एक अभिसरण सुरू आहे."
 
एका सूत्राने असं सांगितलं की बायडन यांनी पुढे काय करावे याबाबत आता 'जवळपास एकमत' झालं आहे.
 
वॉशिंग्टन डीसीमध्ये सुरू असलेल्या नाटो शिखर परिषदेतही डेमोक्रॅटिक पक्षाच्या मोहिमेबाबत प्रश्न विचारले जात होते.
 
नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणाले की त्यांना विश्वास आहे की, अमेरिका नाटोचा एक प्रमुख भाग राहील.
 
व्हाईट हाऊसमध्ये कुणीही बसलं मग ते जो बायडन असोत किंवा नाटोबाबत साशंक असणारे डोनाल्ड ट्रम्प असोत, अमेरिका या संघटनेबाबत वचनबद्ध असेल असा विश्वास जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी व्यक्त केला आहे.
 
एका पत्रकार परिषदेत, बीबीसीने स्टोल्टनबर्ग यांना विचारलं की, 'बायडन यांच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चेनंतरही नाटोतील इतर 32 सदस्य देशांनी असाच आशावाद व्यक्त केला आहे का?'
 
यावर बोलताना स्टोल्टनबर्ग म्हणाले की, "मी असं म्हणत नाहीये की तुम्ही नेहमीच सुरू असलेल्या चर्चेकडे दुर्लक्ष करू शकता. पण हे जग जेवढं जास्त असुरक्षित आणि धोकादायक होत जाईल तेवढीच नाटोची गरज वाढणार आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "आपण सगळ्यांनी आपल्याच भल्यासाठी एकत्र राहिलं पाहिजे. अमेरिकाही याला अपवाद ठरू शकत नाही."
 
गुरुवारी बायडन माध्यमांना संबोधित करतील. सोमवारी एनबीसी न्यूजला ते एक मुलाखत देतील जी त्यादिवशी संध्याकाळी प्रसारित केली जाईल.
 
स्विंग स्टेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेनसिल्व्हेनियामधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदारांशी बीबीसी न्यूजने संवाद साधला त्यावेळी हे मतदार बायडन यांच्या उमेदवारीबाबत संमिश्र भावना व्यक्त करत होते.
 
हॅरिसबर्गमधील कॅरेन गिलख्रिस्ट म्हणाल्या की त्या बायडन यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणार आहेत कारण 'ते काय बोलतात हे त्यांना नीट ठाऊक आहे.'
 
पण एलिझाबेथटाउनमध्ये, एका कॅफेत लॅपटॉपवर काम करत बसलेल्या मेलिसा नॅश म्हणाल्या की, "मी निराश आहे कारण मला डोनाल्ड ट्रंप फारसे आवडत नाहीत पण देशाचं नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला एका मजबूत नेत्याची गरज आहे."