शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (16:09 IST)

शिंजो आबें यांचं 'मुंबई कनेक्शन' माहित आहे का?

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर जपानच्या नारा शहरात प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर काही तासांतच त्यांचं निधन झालं. हल्लेखोराने आबे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या आणि ते कोसळले. शिंजो आबेंचे भारताशी तसंच महाराष्ट्राशी जवळचे संबंध होते.
 
देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. व्यासपीठावर शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदी बसलेले असताना फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले, "पंतप्रधान महोदय, आपण बुलेट ट्रेनचा पाया अहमदाबादमध्ये घातलात, पण मला हे माहीत आहे की हे काम आपण लवकरच पूर्ण करू आणि जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा उद्घाटनासाठी तुम्ही याच ट्रेनमध्ये बसून मुंबईत यावं अशी माझी विनंती आहे."
 
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन आणण्यात शिंजो आबेंचं महत्त्वाचं योगदान होतं. 2017 साली नरेंद्र मोदी, शिंजो आबे या दोन पंतप्रधानांनी बुलेट ट्रेन प्रकल्प घोषित केला. अहमदाबादमध्ये या प्रकल्पाचं उद्घाटन झालं, आता बुलेट ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी मुंबईत या असं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं.
 
शिंजो आबे पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले 2007 सालच्या ऑगस्ट महिन्यात. तेव्हा त्यांनी संसदेत भाषणही दिलं होतं. आबेंचा भारत दौरा म्हणजे दोन समुद्रांचा मिलाफ असं त्यांनी म्हटलं होतं. 2014 सालच्या प्रजासत्ताक दिनाला आबे प्रमुख पाहुणे होते.
 
पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात शिंजो आबेंनी दोन वेळा भारताला भेट दिली.
 
या दोघा नेत्यांमध्ये घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले होते. आबेंच्या 2015 सालच्या दौऱ्यावेळी द्विपक्षीय बैठक पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघात झाली होती. आबेंसाठी वाराणसी शहर सजवलं गेलं होतं. दोघा नेत्यांनी गंगेच्या घाटावर अनेक गोष्टींवर चर्चा केली. या दोघा नेत्यांच्या पुढाकारातून काशी - क्योटो करार झाला आणि या दोघा शहरांना पार्टनर सिटीचा दर्जा दिला गेला. काशीला क्योटोप्रमाणे विकसित करण्याचा निर्धार यावेळी केला गेला.
 
2017 साली शिंजो आबे पुन्हा एकदा भारत भेटीवर आले. यावेळी या दोघा नेत्यांची भेट पंतप्रधानांच्या स्वतःच्या राज्यात, गुजरातमध्ये झाली. अहमदाबादमध्ये एका भव्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान आबे यांनी मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा केली.
 
(Visit to Kyoto in Japan ) पंतप्रधान मोदींचा दक्षिण आशियाबाहेरचा पहिला विदेश दौरा जपानला होता. सप्टेंबर 2014 मध्ये मोदींनी जपानचा दौरा केला होता. शिंजो आबेंनी नरेंद्र मोदींसाठी यामानाशी मधल्या आपल्या पिढीजात घरात दावत दिली होती. पहिल्यांदाच एखाद्या विदेशी पाहुण्यांना हा सन्मान दिला गेला.
2017 साली शिंजो आबेंनी क्वाड ही संघटना पुनरुज्जिवित करण्याची संकल्पना मांडली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान अशा चार देशांचा सहभाग असलेल्या या संघटनेत हे चार देश अनेक मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करतात.
 
2020 साली शिंजो आबेंनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांना दीर्घ काळापासून असलेल्या अल्सरेटिव्ह कोलायटिस आजाराने डोकं वर काढल्याने त्यांनी धकाधकीच्या राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. त्यांच्यानंतर योशिहिडे सुगा यांनी जपानचे पंतप्रधान म्हणून सूत्रं हातात घेतली.
 
67 वर्षांच्या शिंजो आबे यांच्यावर जपानच्या नारा शहरात गोळीबार झाला. हल्लेखोराने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या, त्यातली एक त्यांच्या छातीत लागली. त्यांच्या हल्लेखोराला लगेचच अटक करण्यात आली. हल्ल्याचं वृत्त समजताच पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून आबेंप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या.