शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 जुलै 2024 (16:07 IST)

मोदींच्या रशिया दौऱ्याकडे जग कसं पाहतं? मोदी-पुतिन भेटीत नेमकं काय होणार?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉस्को दौऱ्यावर जात आहेत. 8 आणि 9 जुलैला ते रशियाच्या दौऱ्यावर असणार आहेत.
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत.त्याचबरोबर तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे.
पाश्चात्य देशांचा दबाव असतानासुद्धा रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याबाबत भारतानं आपला जुना मित्र असलेल्या रशियावर स्पष्टपणे टीका केलेली नाही. मात्र रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्याचं आवाहन भारत सातत्यानं करतो आहे.

पंतप्रधान मोदींच्या या रशिया दौऱ्याचा हेतू, रशिया आणि चीनमधील वाढत्या मैत्रीच्या पार्श्वभूमीवर रशिया-भारत संबंधांचं महत्त्व दाखवणं आणि पाश्चात्य देशांबरोबर असलेल्या संबंधांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करणं आहे, यावर भारतीय प्रसारमाध्यमं आणि विश्लेषक भर देत आहेत.
रशियातील वृत्तपत्रांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदींचा हा दौरा दाखवून देतो की 'रशियाला एकटं पाडण्याच्या पाश्चात्य देशांच्या प्रयत्नांना' भारतानं हाणून पाडलं आहे.

पंतप्रधान मोदींचा हा दौरा किती महत्त्वाचा?
लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. मागील महिन्यातच जी-7 शिखर परिषदेतील आउटरीच सत्रात सहभागी होण्यासाठी ते इटलीला गेले होते. मात्र तिथे अनेक देशांचा सहभाग होता. द्विपक्षीय दौऱ्यात फक्त दोनच देशातील राष्ट्राध्यक्ष किंवा प्रतिनिधिंचा सहभाग असतो.
 
आपल्या पहिल्या दोन्ही कार्यकाळात निवडणुकीतील विजयानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी परदेश दौऱ्यासाठी शेजारील राष्ट्रांची निवड केली होती.मात्र, यावेळेस ते रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या या दौऱ्याला सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या भूराजकीय वास्तवाची पार्श्वभूमी आहे.प्रसार माध्यमांमधील वृत्तांनुसार भारत आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये 2021 नंतर शिखर परिषद आयोजित झालेली नाही.

सप्टेंबर 2022 मध्ये उझबेकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ)ची शिखर परिषद झाली होती. त्या परिषदेच्या वेळेस पंतप्रधान मोदींनी जगात 'मुसद्देगिरी आणि संवादाच्या' महत्त्वावर भर देत पुतिन यांना सांगितलं होतं की, 'हा काळ युद्धाचा नाही.'भारताच्या पंतप्रधानांनी भारत-रशिया संबंध 'अतूट मैत्रीचे' असल्याचं सांगितलं होतं.
 
जेव्हापासून रशिया-युक्रेन युद्धाची सुरूवात झाली आहे, तेव्हापासून रशियाला एकटं पाडण्यासाठी पाश्चात्य देश भारतावर देखील दबाव टाकत आहेत. मात्र रशियाबरोबरची आपली मैत्री लक्षात घेत भारतानं पाश्चात्य देशांच्या दबावाला भीक घातली नाही. भारत आपल्या देशांतर्गत हितांचा संदर्भ देत रशियाकडून स्वस्त दरानं कच्च्या तेलाची आयात करतो आहे.मोदींनी 2019 मध्ये व्लाडिवोस्टॉकमध्ये ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी रशियाचा दौरा केला होता.
 
रशिया दौऱ्याचा अजेंडा काय?
दोन जुलैला रशियानं म्हटलं होतं की 'दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात' आहे, तर 28 जूनला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं म्हटलं होतं की 'आगामी द्विपक्षीय शिखर परिषदेची तयारी सुरू आहे.'
 
रशियन प्रवक्ते दमित्री पेस्कोव्ह यांनी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, दोन्ही नेते प्रादेशिक, जागतिक सुरक्षा, द्विपक्षीय संबंध आणि दोन्ही देशांतील व्यापारावर चर्चा करतील.
 
प्रसारमाध्यमांमध्ये भारत सरकारच्या सूत्रांच्या आधारे म्हटलं आहे की, दोन्ही देशांमध्ये संरक्षण, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू या विषयांवर प्रामुख्यानं चर्चा होईल.
प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार संरक्षण उपकरणांसाठी अनेक दशके भारत रशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहिला आहे. त्यामुळेच रशियाचा चीनकडे जास्त कल वाढू नये असंच भारताची इच्छा असेल. याला भारत-चीन संबंधांमधील तणावाची पार्श्वभूमी आहे.
 
'द हिंदू' या महत्त्वाच्या वृत्तपत्रानं लिहिलं आहे की, युक्रेन युद्ध, व्यापार, रशियावर पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी कोणत्या पद्धतीनं किंवा कोणत्या चलनाद्वारे पैसे मोजावेत, संरक्षण उपकरणे आणि सुट्या भागांचा पुरवठा, प्रस्तावित चेन्नई-व्लाडिवोस्टॉक मॅरिटाइम कॉरिडॉरमधी गुंतवणूक आणि प्रमुख लष्करी लॉजिस्टिक्स करार या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
 
रशिया-युक्रेन युद्धात रशियाकडून भारतीय लढत आहेत. या संवेदनशील मुद्दयावरसुद्धा या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
 
रशियन सैन्यात या प्रकारे होणारी भरती थांबवण्याची मागणी भारतानं सातत्यानं केली आहे. या बाबतीत भारताची भूमिका आहे की, 'या प्रकारच्या घडामोडींमध्ये दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या संबंधाच्या अनुरुप ठरणार नाहीत.'
 
भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये काय म्हटलं जात आहे?
भारतीय प्रसारमाध्यमं आणि विश्लेषकाचं म्हणणं आहे की, रशियाचा चीनकडे वाढत चाललेला कल भारताच्या दृष्टीनं संतुलित करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा रशिया दौरा होतो आहे.
 
रशियातील भारताचे माजी राजदूत वेंकटेश वर्मा यांनी 'द हिंदू' या वृत्तपत्राला सांगितलं, "कोरोनामुळे आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीत वेगानं होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर नियमितपणे होणाऱ्या रशिया-भारत द्विपक्षीय शिखर परिषदेत खंड पडला होता.
 
मात्र बदलत्या परिस्थितीत दोन्ही देशांमधील संबंध आणि मैत्री पूर्वीसारखी दृढ राहिलेली नाही ही आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेली धारणा चुकीची ठरवणं आवश्यक झालं होतं. अर्थात दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीला पुन्हा बळ देण्याची देखील आवश्यकता होती."
तीन जुलैला 'फर्स्टपोस्ट' वेबसाइटवरील एक लेखात म्हटलं होतं की, "एकीकडे रशिया आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव आणि दुसरीकडे रशियाचं चीनवरील वाढतं अवलंबित्व आणि वाढती मैत्री, अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांच्या रशिया दौऱ्याचं टायमिंग महत्त्वाचं आहे."
 
'नवभारत टाइम्स' या हिंदी वृत्तपत्रात 30 जूनला छापण्यात आलेल्या एका लेखात म्हटलं होतं की "मोदींना माहित आहे की पाश्चात्य जग या दौऱ्याकडे बारकाईनं पाहतं आहे. त्यामुळेच त्यांनी पाश्चात्य देशांबरोबरच्या संबंधाचा ताळमेळ साधण्यासाठी रशिया बरोबरचा दौरा एक दिवसापुरता मर्यादित ठेवला आहे."
 
या लेखात पुढे म्हटलं आहे की, "या दौऱ्याचं फलित हे आहे की भारत अजूनही मध्यम मार्ग किंवा तटस्थता अंगिकारण्यास तयार आहे आणि कोणाच्याही दबावाखाली येणार नाही किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही एका गटामध्ये सामील होणार नाही. भारतानं स्पष्ट केलं आहे की तो अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांशी चर्चा करेल."
 
रशियन प्रसारमाध्यमांमध्ये काय चर्चा होते आहे?
रशियन वृत्तपत्रांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदींनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच द्विपक्षीय दौऱ्यासाठी रशियाची निवड केली आहे. यातून भारताची 'धोरणात्मक स्वायत्तता' दिसून येते.
 
नेवाविसिमाया गॅझेटा या एका खासगी वृत्तपत्रानं म्हटलं की, "रशियाला एकटं पाडण्याच्या पाश्चात्य देशांच्या प्रयत्नांना भारतानं हाणून पाडलं आहे."
 
यामध्ये एलेक्सेई कुप्रियानोव या राजकीय विश्लेषकाचा संदर्भ देत म्हटलं आहे की रशिया आणि भारत यांच्यात व्यापारासंदर्भात काही बाबतीत मतभेद आहेत. मात्र त्यांच्यात कोणताही राजकीय वाद नाही.
कुप्रियानोव यांनी या आगामी दौऱ्याला 'मोठं यश' म्हटलं आहे.
वेदोमोस्ती 'बिझनेस डेली'नं लिहिलं आहे की, युक्रेन युद्ध भारतासाठी हानिकारक आहे आणि या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षण-तंत्रज्ञान सहकार्य, भारताला रशियाकडून होणारा हायड्रोकार्बनचा (कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू) पुरवठा, आंतरराष्ट्रीय राजकीय आणि आर्थिक रचनेतील सुधारणा या मुद्द्यांवर विशेष चर्चा होईल.
 
कोमेरसेंट या आणखी एका महत्त्वाच्या बिझनेस दैनिकानं लिहिलं आहे की, पुतिन यांची भेट घेऊन मोदी 'भारताची धोरणात्मक स्वायत्तता' आणि 'बिगर पाश्चात्य जगाचे नेते' या गोष्टींबाबतची आपली महत्त्वाकांक्षा दाखवत आहेत.
 
अति उजव्या विचारसरणीची रशियन प्रसारमाध्यमं आणि विश्लेषक यांनी हा दौरा म्हणजे अमेरिकेच्या मुसद्देगिरीचं अपयश असल्याचं म्हटलं आहे.
 
अति उजव्या टारग्रेड टीव्ही चॅनलनं या दौऱ्याला 'अत्याधिक आनंदाचा' आणि 'अमेरिकनना रशियाचा शेवटचा दणका' म्हटलं आहे. त्याचबरोबर ग्लोबल साउथ (विकसनशील देश आणि मागासलेले देश) देशांचा अमेरिकेऐवजी रशियाकडे कल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
 
यूरी पोदोल्याका या प्रसिद्ध ब्लॉगरनं एका टेलीग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, रशियाप्रमाणेच भारतसुद्धा जागतिक पातळीवर अमेरिकेच्या मक्तेदारीच्या विरोधात आहे, हे मोदींना दाखवायचं आहे. या पोस्टला 15 लाख व्ह्यूज आहेत.
(सँड्रो ग्विंडाडजे यांच्या अतिरिक्त इनपुटसह)
 
Published By- Priya Dixit