बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 30 जानेवारी 2022 (16:21 IST)

उत्तर कोरियाने केली क्षेपणास्त्र चाचणी; 2017 नंतरची सर्वात मोठी चाचणी

उत्तर कोरियानं एक क्षेपणास्त्र चाचणी केली असून 2017 नंतरची ही सर्वात मोठी चाचणी असल्याचं मानलं जात आहे.
ही चाचणी रविवारी (30 जानेवारी) स्थानिक वेळेनुसार 07.52 (22:52 GMT) वाजता उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावर झाली असल्याचं दक्षिण कोरियानं म्हटलं आहे.
 
जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या सर्वांनीच या चाचणीवर टीका केली आहे. ही या महिन्यातली त्यांची सातवी चाचणी आहे.
 
संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियावर बॅलेस्टिक आणि अण्वस्त्रांच्या चाचणी करण्याबाबत बंदी घातलेली आहे. तसंच त्यांच्यावर कठोर निर्बंधही लादले आहेत.
मात्र या देशानं वारंवार हे निर्बंध नाकारले असून किम जोंग उन यांनी देशाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे.
 
रविवारी झालेली चाचणी ही मध्यम पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाईल (IRBM)ची होती असं, दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं म्हटलं आहे. नोव्हेंबर 2017 नंतरची ही सर्वात मोठी क्षेपणास्त्र चाचणी असल्याचं सांगितलं जात आहे.
जपान आणि दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार हे क्षेपणास्त्र 2000 किमीपर्यंत उंचीवर गेल्यानंतर सुमारे 30 मिनिटं हवेत होतं आणि 800 किमीचं अंतर पार करत ते जपानच्या समुद्रात कोसळलं.
 
अमेरिकेनं इंडो पॅसिफिक कमांडच्या माध्यमातून एक निवेदन जारी केलं असून उत्तर कोरियानं अशा अस्थिरता निर्माण करणाऱ्या कृत्यांपासून दूर राहावं, असं म्हटलं आहे.
 
जानेवारी महिन्यात उत्तर कोरियानं समुद्रात काही आखूड पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. त्यामुळं या दृष्टीनं उत्तर कोरियासाठी जानेवारी हा महिना अत्यंत व्यस्त महिना ठरला.
 
उत्तर कोरियात अलिकडच्या काळात झालेल्या क्षेपणास्त्र चाचण्या या 2017 मध्ये निर्माण झालेल्या तणावाची आठवण करून देणाऱ्या होत्या, असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन यांनी म्हटलं. त्यावेळीही उत्तर कोरियानं काही अण्वस्त्र चाचण्या केल्या होत्या तसंच त्यांच्या सर्वात मोठ्या क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. त्यापैकीदेखील काही क्षेपणास्त्र जपानवरून गेली होती.
 
2018 मध्ये किम जोंग उन यांनी अण्विक शस्त्रं आणि त्यांच्या सर्वात लांब पल्ल्याच्या इंटरकाँटिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल (ICBMs)वर स्थगिती आणल्याचं जाहीर केलं होतं.
 
मात्र, 2018 मध्येच त्यांनी या स्थगितीला ते बांधील नसल्याचं म्हटलं होतं.
 
यापूर्वीच्या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं उत्तर कोरियावर जानेवारीच्या सुरुवातीला आणखी काही निर्बंध लादले होते. जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही देशांमधली चर्चा सध्या रखडली आहे.