मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (20:02 IST)

वेब सीरिजचं वेडः 'सहज करुन पाहायचा' म्हणून केला खून

murder girl
एक मुलगी... ट्रू क्राइम ड्रामाची वेडी. सतत कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यांवर आधारित वेब सीरिज आणि सिनेमे पाहायची, पुस्तकं वाचायची.
 
गुन्हेगारीच्या विचारांमध्ये ती इतकी गुंतली की तिला स्वतःला एक खून करायची इच्छा झाली... सहजच... फक्त करुन पाहायचा म्हणून.
 
ही गोष्ट आहे जुंग यू-जुंग हिची. दक्षिण कोरियात राहणाऱ्या 23 वर्षांच्या जुंग हिने अनेक क्राईम शोज पाहून ठेवले होते, तिच्या वेब सर्च हिस्ट्रीमध्येही सतत अशाच गोष्टी असायच्या.
 
खून कसा करायचा, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, वगैरे.
 
ती तिच्या आजोबांसोबत राहायची, त्यामुळे बोलायला फार कुणी नव्हतं. अशात ती ऑनलाईन अशा लोकांना शोधू लागली जे त्यांच्या स्वतःच्या घरी तिला शिकवू शकतील.
 
50 पेक्षा जास्त लोकांशी संपर्क साधल्यानंतर ती अखेर 26 एका वर्षीय महिलेच्या संपर्कात आली, जी आग्नेय कोरियामधील बुसानमध्ये राहायची.
 
तिने त्या महिलेशी संपर्क साधला, आणि एका शाळेतील मुलीचा गणवेश ऑनलाईन विकत घेत तिच्या घरी इंग्लिशच्या शिकवणीसाठी गेली.
 
अखेर संधी साधून त्या शिक्षिकेचा खून केला. जुंगने तिच्यावर 100 पेक्षा जास्त वार केले, नंतर तिच्या शरीराचे तुकडे करून एका बॅगमध्ये भरले, आणि एका कॅबमधून दूर जंगलात जाऊन ती बॅग फेकून आली.
 
'हे सारंकाही फक्त खून करून पाहायचंय, म्हणून'
रक्ताने माखलेली बॅग जंगलात फेकून देण्यासाठी जुंगने एक कॅब बुक केली. पण एका कॅब ड्रायव्हरला संशय आला. शेवटी त्याने जुंगविषयी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तिला अटक करण्यात आली.
 
आधी तिनं कारणं सांगितली, की कुणीतरी दुसऱ्यानेच त्या महिलेला मारलं आणि आपण फक्त त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, किंवा अचानक झालेल्या भांडणातून रागाच्या भरात हे सारंकाही घडलं.
 
पण पोलिसांना तिच्यावर भरवसा नव्हता, शिवाय तिची इंटरनेट सर्चची हिस्ट्री दुसरीच साक्ष देत होती.
 
पोलिसांनी सांगितलं की जुंग अगदीच हलगर्जीपणाने हे सारंकाही करत होती, मृत महिलेच्या घरच्या CCTVमध्ये ती रेकॉर्ड होतेय, याची तिने जरासुद्धा काळजी घेतलेली नव्हती.
 
जुंगने कोर्टात असंही सांगितलं की ती मानसिकदृष्ट्या आजारी असून, तिला हॅल्युसिनेशन्स होत होते.
 
पण पोलिसांनी किंवा कोर्टाने तिचं अजिबात ऐकलं नाही. आणि हे थंड डोक्यानं केलेलं कृत्य असल्याचं म्हटलं.
 
अखेर जून महिन्यात जुंग यू-जुंग हिने गुन्ह्याची कबुली दिली. आपल्याला सहज एक खून करून पाहायचा होता, असं तिने स्वतः बुसान जिल्हा न्यायालयात सांगितलं आणि मग कोर्टाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 
सरकारी वकिलांनी तर तिच्या मृत्युदंडाची शिफारस केली होती, पण कोर्टाने तिला जन्मठेपेची शिक्षाच सुनावली.
 
24 नोव्हेंबर 2023 रोजी न्यायाधीशांनी तिला शिक्षा सुनावताना म्हटलं की अशा कृत्यामुळे “समाजात दहशत निर्माण झालीय की कुणाचाही विनाकारण जीव जाऊ शकतो” आणि एकंदरच समाजात “अविश्वासाची भावना” यामुळे निर्माण झाली आहे.
 
दक्षिण कोरियात मृत्युदंडाची तरतूद आहे, पण 1997 पासून कुणालाही ही शिक्षा प्रत्यक्षात झालेली नाही