आता पाकिस्तानातही नोटबंदी
काळ्या पैशावर नियंत्रणासाठी भारताने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे अनुकरण आता पाकिस्तानातही होणार आहे. पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाच हजाराची नोट बंद करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेत बहुमताने पारित करण्यात आला आहे.
पाकिस्तान मुस्लीम लीगचे उस्मान सैफुल्लाह खान यांनी हा प्रस्ताव मांडला असल्याचे डॉन वृत्तपत्रात म्हटले आहे. पाच हजाराची नोट चलनातून रद्द केल्याने काळ्यापैशावर नियंत्रण आणणे सोपे होणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. तसेच अशा प्रकारांची नोटाबंदी दर तीन ते पाच वर्षांनी करण्यात यावी असेही सुचविण्यात आले आहे.
नोटबंदीमुळे बँक अकाऊंटचाही वापर वाढण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे. असे असले तरी पाकिस्तानचे कायदा मंत्री झाहिद हमीद यांनी, या निर्णयामुळे बाजारात आणि देशशत आर्थिक आपत्ती निर्माण होईल आणि पाच हजाराची नोट उपलब्ध नसल्याने परकीय चलानाचा वापर वाढेल, असे म्हटले आहे.
बाजारात सध्या 3.4 लाख कोटींच्या नोटा चलनात असून यामध्ये 1.02 लाख कोटी पाच हजारांच्या नोटांचे स्वरूपात असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.