बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जून 2020 (11:23 IST)

रशिया निर्मित औषधाने 4 दिवसात रुग्ण करोनामुक्त, 11 जूनपासून एविफेविरने उपचार

रशियाने करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारे एक औषध विकसित केले आहे. एविफेविर या नावाने औषधाची नोंदणी झाली आहे. 11 जूनपासून रशियामध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांवर या औषधाचा वापर सुरु होणार आहे. रशियाच्या आरोग्य यंत्रणेने हे औषध वापरण्यास मंजुरी दिली आहे. रशियाच्या आरडीआयएफ प्रमुखाने रॉयटर्सला ही माहिती दिली. 
 
एविफेविर औषध बनवणारी कंपनी महिन्याला ६० हजार रुग्णांवर उपचार करता येतील, इतक्या प्रमाणात औषध बनवणार आहे. या नव्या औषधामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. 
 
एविफेविर हे औषध फॅव्हीपीरावीर म्हणून ओळखले जाते. फॅव्हीपीरावीर हे मूळचे जपानी औषध आहे. 1990 साली जपानी कंपनीने या औषधाची निर्मिती केली होती. जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते. जपानमध्ये ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर केला जातो.
 
रशियन शास्त्रज्ञांनी यात काही बदल केले आहेत. पुढच्या दोन आठवडयात रशियाकडून बदल करुन बनवण्यात आलेल्या या औषधाबद्दल जगाला माहिती दिली जाईल असे आरडीआयएफच्या प्रमुखांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे रशियात करोनाची लागण झालेल्या 330 रुग्णांवर या औषधाच्या चाचण्या घेण्यात आल्या. बुहतांश केसेसमध्ये रुग्ण हे चार दिवस पूर्णपणे बरे झाल्याचे दिसून आले. चार दिवसात रुग्ण करोनामुक्त झाल्याचा निष्कर्ष असल्याचे कळून येत आहे. हे यशस्वी ठरल्यास संपूर्ण जगाला याचा फायदा होणार.