शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (10:45 IST)

पंजशीरवर ताबा मिळवल्याचा तालिबानचा दावा, झेंडा फडकवतानाचा व्हीडिओ पोस्ट

तालिबानने पंजशीर प्रांतावर पूर्ण विजय मिळवला असल्याचा दावा केला आहे. या प्रांतात आपला झेंडा फडकवत असल्याचा व्हीडिओसुद्धा तालिबानने सोमवारी (6 सप्टेंबर) ऑनलाइन पोस्ट केला.
 
अर्थात, पंजशीरमधील नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट (NRF) ने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या सर्व जागांवर आपली उपस्थिती असल्याचं सांगताना संघर्ष अजूनही सुरूच असल्याचं म्हटलंय.
 
NRF चे नेते अहमद मसूद यांनी सोशल मीडियावर एक ऑडिओ मेसेज प्रसिद्ध केला आहे. या मेसेजमध्ये त्यांनी तालिबानला मान्यता देण्यासोबतच त्यांना सैन्य आणि राजकीय समर्थन देणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुदायावर टीका केली आहे.
त्याचबरोबर मसूद यांनी अफगाणी नागरिकांना राष्ट्रीय बंडाचंही आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, " तुम्ही कोठेही असा, पण आपल्या देशाच्या सन्मान, स्वातंत्र्य आणि समृद्धीसाठी तुम्ही बंड करावं असं मी आवाहन करतो."
 
सोमवारीही तालिबानने पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा केला होता.
तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, अफगाणिस्तानचा शेवटचा बालेकिल्ला जो त्यांच्या ताब्यात नव्हता आता तो ही काबीज करण्यात आला आहे.मात्र तालिबानविरोधात लढणाऱ्या नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटने (एनआरएफ) हा दावा फेटाळला आहे.एनआरएफचे प्रवक्ते अली मैसम यांनी बीबीसीला सांगितले की, "हे खरं नाही, तालिबानने पंजशीरवर ताबा मिळवलेला नाही. मी हे दावे फेटाळतो."
 
परंतु सोशल मीडियावर दिसणाऱ्या छायाचित्रांमध्ये तालिबानचे लढाऊ सैनिक प्रांतीय गव्हर्नरच्या कंपाऊंड दरवाजासमोर उभे असल्याचे दिसून आले होते. बीबीसीनं स्वतंत्रपणे याची पुष्टी केली नाही.
तालिबानची लष्करी कारवाई थांबवण्यासाठी शांतता चर्चेस आपण उत्सुक असल्याचे विरोधी गटाचे अफगाण नेते अहमद मसूद यांनी रविवारी (5 सप्टेंबर) सांगितलं होतं.

अफगाणांना आता शांततापूर्ण सुखी जीवन, स्वातंत्र्याचा आनंद आणि बंधुत्व मिळेल, असं तालिबानने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.तीन आठवड्यांपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं. 15 ऑगस्टला त्यांनी राजधानी काबुलवर ताबा मिळवला.