रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (20:38 IST)

शिंजो आबेंवर गोळ्या झाडणारा हल्लेखोर कोण आहे?

Shinzo Abe
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा प्रचारसभेत सुरू असलेल्या भाषणादरम्यान झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.
 
शिंजे यांच्यावरील गोळीबार आज सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला. आबे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे.
 
तेत्सुया यामागामी असं या हल्लेखोराचं नाव असून तो 41 वर्षांचा असल्याची माहिती मिळत आहे.
 
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता जपानच्या पश्चिमेकडील नारा शहरात निवडणुकीचा प्रचार करत होते. यावेळी त्यांचं भाषण सुरू असताना त्यांच्यावर मागून गोळी झाडण्यात आली.
 
गोळी लागताक्षणी आबे खाली कोसळले. यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. जखमी अवस्थेत त्यांना हेलिकॉप्टरने नारा येथील रुग्णालायत दाखल करण्यात आलं. तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. या गोळीबारात शिंजो आबे यांच्या मानेला दुखापत झाली तसेच त्यांच्या छातीत रक्तस्त्राव झाला. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तेत्सुयाला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे.
 
हल्लेखोर कोण होता?
जपानची वृत्तसंस्था NHK च्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोर शिंजो आबे यांच्यावर नाराज होता आणि त्याने आबेंना ठार मारण्याच्या उद्देशानेच गोळी झाडली होती.
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्लेखोर शिंजो आबे यांच्या कामावर नाखूष होता, त्यामुळे त्याला आबेंना जीवे मारायचं होतं, असं त्याने पोलिसांना सांगितलं.
या हल्लेखोराने ग्रे कलरचा टी-शर्ट आणि ट्राउजर घातली होती. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांचा हवाला देत एनएचकेने माहिती दिली की, "हा हल्लेखोर सेल्फ डिफेन्स फोर्सचा माजी सदस्य होता. त्याने या फोर्समध्ये 2005 पासून सलग तीन वर्षे काम केलंय. त्याने हॅन्डमेड गनमधून आबेंवर गोळी झाडली."
 
शिंजो आबे यांच्या नारा येथील सभेला उपस्थित असणारी 50 वर्षीय महिला एनएचकेने या वृत्तसंस्थेला सांगते की, "मी अबे यांचं भाषण ऐकत होते. तेवढ्यात एका हेल्मेट घातलेल्या माणसाने आबेंवर दोनदा गोळ्या झाडल्या. दुसरी गोळी लागताच आबे खाली पडले. त्या व्यक्तीला ताबडतोब अटक करण्यात आली. अॅम्ब्युलन्स तात्काळ बोलावण्यात आली आणि आबे यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. याप्रकारानंतर मी स्तब्धच झाले कारण तो हल्लेखोर अगदी माझ्या समोरच उभा होता."
 
शिन्झो आबे यांच्या डेमोक्रॅटिक लिबरल पार्टीच्या पदाधिकाऱ्याने पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, "हल्लेखोराने 10 मीटर अंतरावरून गोळी झाडली. कोणीतरी फटाका फोडल्यासारख वाटलं. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की हे सगळं माझ्यासमोर घडलं. गोळी झाडल्यावर हल्लेखोर जागीच उभा होता अगदी शांत."
 
जपानचे राष्ट्रपती फुमियो किशिदा यांनी शुक्रवारी हल्लेखोराबाबत सांगितलं की, "हल्लेखोराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल आमच्याकडे सध्यातरी कोणतीही माहिती नाही. पोलिस तपासानंतरच या सगळ्या गोष्टी कळतील."
 
शिंजो आबे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती
 
शिंजो आबे यांचा जन्म 1954 मध्ये एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिंतारो आबे हे जपानचे परराष्ट्र मंत्रीपदी राहून गेलेत.
 
शिंजो आबे यांचे आजोबा नोबुसुके किशी हे जपानचे पंतप्रधान होते. दुसऱ्या महायुद्धानंतर 2006 साली शिंजो आबे जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले.
 
मात्र त्यांनी त्याच वर्षी राजीनामा दिला. पुढे ते 2012 पासून 2020 पर्यंत जपानच्या पंतप्रधानपदी होते. आरोग्याच्या समस्यांमुळे आबे यांनी 2020 मध्ये राजीनामा दिला होता. मात्र तरीही आबे हे त्यांच्या पक्षात सर्वाधिक लोकप्रिय होते.
 
67 वर्षीय आबे यांना अनेक वर्षांपासून अल्सरेटिव्ह कोलायटिस हा आजार होता. मात्र अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती अजूनच खालावली होती.
 
शिंजो आबे यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ सप्टेंबर 2021 मध्ये संपणार होता. जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम आबे यांनी आपल्या नावावर केला होता.
 
2007 मध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिसमुळे त्यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हा मोठ्या आतड्याचा एक गंभीर आजार असून आबेंच्या तरुणपणातचं ते या आजाराच्या विळख्यात आले.
 
हायप्रोफाईल लोकांची हत्या करणं किंवा हत्येचा प्रयत्न करणं ही जपानसाठी नवी गोष्ट नाही. 1932 मध्ये जपानचे पंतप्रधान इनुकाई सुयोशी यांची एका नौदल अधिकाऱ्याने हत्या केली होती.
 
तो अयशस्वी बंडाचा एक भाग होता. बंदूक बाळगण्याबाबत अतिशय कडक कायदे असणाऱ्या देशांपैकी एक जपान आहे.
 
शिंजो आबे फेब्रुवारी 2022 मध्ये म्हटले होते की, जपानने दीर्घकाळ चालत आलेली बंधन तोडून अण्वस्त्रांसाठी सज्जता दाखवली पाहिजे.