रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (16:36 IST)

न्यूरालिंक: मस्क यांच्या मेंदूच्या तंत्रज्ञानाने जग बदलू शकतं का?

मंगळावर वसाहत निर्माण करण्याच्या योजनांपासून ते मोठ्या शहरांच्या पोटातून दळणवळणाच्या वेगवान सुविधा निर्माण करण्याच्या त्यांच्या स्वप्नांपर्यंत - इलॉन मस्क हे कायम धाडसी दाव्यांसाठी ओळखले जातात.
 
जगातील या सर्वात श्रीमंत व्यक्तीने या आठवड्यात आणखीन एक घोषणा केली आहे. त्यांच्या ‘न्यूरालिंक’ कंपनीने माणसाच्या मेंदूमध्ये एका कृत्रिम चिपचं यशस्वी रोपण केलंय.
 
भविष्याचा विचार करता हे तंत्रज्ञान मानवजातीला वाचवण्यास मदत करू शकतं, हा त्यांचा दावा खरा आहे का?
 
मेंदूच्या टिश्यूंमध्ये इलेक्ट्रोड्स चिकटवणे ही खरंतर नवीन गोष्ट नाही.
 
1960 आणि 70 च्या दशकात मांजरींना डिवचण्यासाठी किंवा आक्रमकतेला आळा घालण्यासाठी विद्युतीय उत्तेजनांचा वापर केला जायचा. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला माकडांनी स्वत: विचार करून संगणकाच्या स्क्रीनवर कर्सर फिरवावा यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात येत होतं.
 
"हे कादंबरीतलं लिखाण नाही, पण रोपण करण्यायोग्य तंत्रज्ञान परिपक्व होण्याआधी बराच कालावधी जावा लागतो आणि मग ते अशा टप्प्यावर येऊन पोहोचतं जिथे कंपन्यांकडे कोड्यांचे वेगवेगळे तुकडे असतात आणि त्यांचा एकमेकांशी संबंध जोडण्यास सुरुवात करता येते," असं लंडन येथील किंग्ज महाविद्यालयात ॲक्टिव्ह इम्पांटेबल मेडिकल डिव्हाइसेसच्या प्राध्यापक ॲन व्हॅनहोस्टेनबर्ग म्हणतात.
 
 
न्यूरॉलिंक ही वेगाने वाढणा-या कंपन्यांपैकी एक आहे आणि या तंत्रज्ञानात सुधारणा घडवून आणि शेवटी त्याचं व्यावसायिकीकरण करण्यासाठी विद्यापीठातील विभाग प्रयत्नशील आहेत. सुरुवातीला निदान अर्धांगवायू आणि मेंदूच्या जटिल परिस्थितींमधील उपचारांच्या वापरावर लक्ष्य केंद्रीत करण्यात येतंय.
 
मानवी मेंदूमध्ये सुमारे 86 अब्ज न्यूरॉन्स असतात, चेतापेशी एकमेकांशी सिनॅप्सद्वारे जोडलेल्या असतात. प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला हालचाल करायची असते, एखादी गोष्ट अनुभवायची असते किंवा विचार करायचा असतो, तेव्हा एक सूक्ष्म विद्युत लहर निर्माण होते आणि ती अद्भूत वेगाने एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये पाठवण्यात येते.
 
डोक्यावर ठेवलेल्या नॉन-इनव्हेसिव्ह कॅपचा किंवा मेंदूतच रोपण केलेल्या तारांचा वापर करून अशाप्रकारचे सिग्नल शोधू शकणारी उपकरणं शास्त्रज्ञांनी विकसित केली आहेत.
 
ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) म्हणून ओळखल्या जाणा-या या तंत्रज्ञानावरील संशोधनासाठी आजघडीला कोट्यवधी डॉलर्सचा निधी खर्च केला जात असल्याचं पाहायला मिळतंय.
 
नाण्याच्या आकाराचं न्यूरालिंकचं हे उपकरण, सूक्ष्म तारांच्या मदतीने कवटीत बसवण्यात येतं, जे न्यूरॉनच्या हालचाली वाचू शकतं आणि रिसिव्हिंग युनिटला वायरलेस सिग्नल पाठवू शकतात. कंपनीने डुकरांवर चाचण्या केल्या आहेत आणि असा दावा केलाय की, या तंत्रज्ञानामुळे माकडं पाँग या व्हीडिओ गेमची प्राथमिक आवृत्ती खेळू शकतात.
 
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून मे 2023 मध्ये याला मानवावरील चाचण्यांसाठी मंजुरी मिळाली आहे.
 
आम्हाला हे कळलंय की पहिल्या रुग्णामध्ये त्याचं रोपण करण्यात आलंय. पण, अजून खूप गोष्टी स्पष्ट व्हायच्या बाकी आहेत. मस्क यांनी फक्त एवढंच म्हटलंय की, त्या व्यक्तीची तब्येत हळूहळू सुधारतेय आणि प्रारंभिक परिणामांतून न्यूरॉनसंबंधी आश्वासक गोष्टी समोर येतायत.
 
कदाचित ही विज्ञान कथा वाटू शकते. पण, काही अंशी न्यूरालिंक त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करत आहे.
 
बिल गेट्स आणि जेफ बेझोस यांच्याद्वारे नियंत्रित केल्या जाणा-या गुंतवणूक कंपनीचे आर्थिक पाथबळ लाभलेल्या ‘सिंक्रोन’ नावाचं स्टार्टअप हा त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांपैकी एक असून त्यांनी यापूर्वीच 10 रुग्णांमध्ये स्टेंटसदृश उपकरणाचं रोपण केलंय.
 
डिसेंबर 2021 मध्ये, मोटार न्यूरॉन प्रकाराच्या आजारासह जगणा-या फिलिप ओ'कीफे या 62 वर्षीय वृद्ध व्यक्तीने कर्सर नियंत्रित करण्यासाठी फक्त आपले विचार वापरून पहिलं ट्विट तयार केलं.
 
आणि स्वित्झर्लंडमधील लॉझन विद्यापीठातील संशोधकांनी दाखवून दिलं की, सायकलिंगच्या अपघातामुळे अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर विविध उपकरणांचं रोपण केल्यास तो पुन्हा चालू शकतो.
 
या वर्षी प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं की, मेंदूतील एका उपकरणातून त्याच्या मणक्याच्या सर्वात खालच्या टोकावर रोपण केलेल्या उपकरणापर्यंत सिग्नल आणला जाऊ शकतो, ज्यामुळे त्याच्या हातपायांची हालचाल होऊ शकते.
 
मणक्याच्या दुखापतींसह जगणा-या काही लोकांच्या मनात या नवीन प्रकारच्या तंत्रज्ञानाबद्दल साशंकता आहे.
 
2017 मध्ये मोटारसायकल अपघातात अर्धांगवायू झालेल्या आणि आता स्पाइनल इंज्युरीज असोसिएशनसाठी सार्वजनिक घडामोडी पाहणारे ग्लीन हेस म्हणतात, “अशा यशस्वी प्रयोगांची वेळोवेळी घोषणा केली जाते आणि पुढे काहीच होताना दिसत नाही.
 
“जर मला काही परत हवं असेल, तर मला पुन्हा चालण्याची क्षमता नकोय. त्यापेक्षा मज्जातंतूच्या वेदना कमी करणं, किंवा आतडं, मूत्राशय आणि लैंगिक कार्य सुधारण्याच्या संशोधनावर अधिक पैसे खर्च करायला हवेत.”
 
'प्रजाती-स्तराचं महत्त्व’
पण इलॉन मस्क यांच्यासाठी, मेंदू आणि मणक्याच्या दुखापतींचं 'निराकरण' करणं ही न्यूरालिंकची फक्त पहिली पायरी आहे.
 
त्यांचं दीर्घकालीन उद्दिष्ट “मानव/एआय यांच्याचील सहजीवन” हे आहे, ज्याचं त्यांनी “प्रजाती-स्तराचं महत्त्व" असं वर्णन केलंय.
 
खरी मजा तेव्हा येईल जेव्हा एक अशाप्रकारची प्रणाली विकसित केली जाईल जी मेंदूकडून येणाऱ्या सिग्नलचे अतिशय अचूक अर्थ लावू शकेल किंवा भाषांतर करू शकेल. जर आणि जेव्हा केव्हा असं घडेल तेव्हा कदाचित संगणकासोबत आणि आजमितीला समजण्यासाठी कठीण असलेल्या इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसोबत माणूस संवाद साधू शकेल.
 
कल्पना करा की तुम्ही विचार करताच टेकअवे ऑर्डर करता येईल, इंटरनेटवर काहीही शोधता येईल, किंवा फक्त विचार केल्यास डोक्यातल्या डोक्यातच एक भाषा दुस-या भाषेत अनुवादीत करता येईल.
 
मस्क यांनी स्वत:च यापूर्वीच भविष्यकथन केलंय की, त्यांच्या उपकरणांद्वारे लोकांना वेगवान टायपिस्ट आणि लिलाव करणा-यांपेक्षा जलद गतीने फोन किवा कॉम्प्युटरशी संवाद साधता येईल.
 
“हे ब्लॅक मिररच्या एखाद्या भागासारखं आत आत जाणारं वाटत असलं”, तरी यापूर्वी त्यांनी असंही म्हटलंय की, आठवणी जतन करणं आणि पुन्हा त्याच काळात जाऊन जगणंही शक्य आहे.
 
इतर लोकं याबाबत अधिक साशंक आहेत: “लोकांना यांचा नक्की किती फायदा होईल, हे मी सध्या ठरवू शकत नाहीये. लोक खरंच इतक्या किचकट शस्त्रक्रियेचा धोका पत्करतील का?,” असं प्राध्यापक वानहोस्टेनबर्ग विचारतात.
 
"तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की, फोनवरून पिझ्झा ऑर्डर करण्यासाठी तुम्ही तुमच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्याचा धोका पत्कराल का?"
 
त्याऐवजी त्यांना असं वाटतं की, याचे ठरावीक फायदे नसले आणि संशोधन प्रारंभिक टप्प्यावर असलं तरी याचा वापर सर्वप्रथम अशा लोकांसाठी व्हायला हवा ज्यांना नैराश्यासारख्या मेंदूच्या समस्यांवर मात करणं शक्य होत नाहीये. स्मृतिभ्रंश, त्याचप्रमाणे झोपेच्या विकारांसारख्या काही समस्यांना तोंड देण्यासाठी मेंदूला उत्तेजन देण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो.
 
 
कार्डिफ विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे मानद संशोधक फेलो डॉ. डीन बर्नेट असंही म्हणतात की, न्यूरालिंकला मुख्य धारेतील लोकोपयोगी उत्पादन होण्यासाठी प्रचंड व्यावहारिक अडचणी आहेत.
 
"प्रत्येकाचा मेंदू वेगळा असतो. तुमच्याकडे फक्त एकच चिप असू शकत नाही जी सर्वांना बसते आणि तंतोतंत तेच काम करते. ही अतिशय बारकाईने करण्याची प्रक्रिया आहे,” असंही ते म्हणाले.
 
"तंत्रज्ञान प्रगत होत जातं, त्यामुळे दर पाच वर्षांनी तुम्हाला नवीन चिप बसवावी लागेल का? हे म्हणजे, तुमच्या डोक्यात जुना नोकिया फोन असण्यासारखं असेल का, ज्याची एकेकाळी गंमत वाटायची आणि आता त्याचा विशेष उपयोग नाहीये?”
 
या क्षेत्रातील जवळजवळ प्रत्येक तज्ज्ञ एका गोष्टीशी सहमत आहे की, अशाप्रकारचं अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्या घराजवळच्या सर्वोत्तम ब्रेन सर्जनकडे येण्यासाठी अजून अनेक दशकांचा कालावधी जावा लागेल.
 
इलॉन मस्क यांनीही म्हटलंय की, टेकवे ऑर्डरची प्रक्रिया अती जलद करणं हे यामागचं उद्दिष्ट नसून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या जोखमीतून मानवतेचं अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण करणं हे आहे, ज्याचं त्यांनी यापूर्वी "अस्तित्वाला धोका" (मानवी) म्हणून वर्णन केलं होतं.
 
माणूस आणि संगणकाच्या मेंदूच्या एकित्रीकरणाचा विचार केल्यास एक प्रजाती म्हणून आपली “पीछेहाट” होण्याची शक्यता खूप कमी आहे.
 
“सर्वोत्तम वेग आणि मेंदू-मशीनच्या इंटरफेससह आपण तंत्रज्ञानाच्या हातात हात घालून सैर करू शकतो,” असा युक्तिवाद ते करतात.
 
Published By- Priya Dixit