रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

यात्रांमध्ये लोकांची करमणूक करणारा कुणीतरी विदूषक लागतोच...

भाजपा अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते आ. हेमंत टकले यांची खोचक टीका केली आहे. 
 
महाराष्ट्रात #विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर काढण्यात आलेल्या #महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या समवेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे  सहभागी झालेत. अशा यात्रांमध्ये लोकांची करमणूक करणारा कुणी एक विदूषक लागतोच, अशी खिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले यांनी उडवली आहे. रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष असताना विदुषकाची भूमिका निभावत होते. तीच भूमिका केंद्रिय मंत्री झाल्यानंतर देखील निभावत असल्याचे पाहून आम्ही धन्य झालो, असा टोला टकले यांनी लगावला आहे. 
 
राजकारणात विरोधी पक्षांसंदर्भात किती खालच्या स्तरावर जाऊन बोलावे याचे भान नसल्याने तसेच सत्तेमुळे अंगात आलेल्या मस्तीमुळे ते विरोधी पक्षांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करत असल्याचे टकले म्हणाले. एखाद्या पक्षाची यात्रा मतदारांच्या जागृतीसाठी निघते. मात्र, विरोधकांच्या यात्रेची प्रेतयात्रा म्हणून संभावना करणे, एखाद्या कार्यकर्त्यालासुद्धा अशोभनीय असताना इथे तर ज्यांच्या हाती सूत्रे आहेत तेच असे बरळत आहेत. त्यामुळे अशी बेताल वक्तव्ये आणि केलेली तुलना तर्काच्या विरोधात आहे. असे विदुषकी चाळे जगासमोर आल्याने केवळ यांची अपवित्र मानसिकताच समोर येते, असेही ते म्हणाले.