- अमृता कदम
लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे कल हाती यायला लागल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर 'अनाकलनीय' हा एकच शब्द लिहून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
निवडणुकीमध्ये आपला एकही उमेदवार उभा नसतानाही राज ठाकरेंनी प्रचारसभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या प्रचाराचं स्वरुपही अतिशय हटके होतं. मोदींची आश्वासनं, त्यांनी जाहीर केलेल्या योजना यांची आजची परिस्थिती काय आहे, याचं व्हीडिओ प्रेझेंटेशनच राज ठाकरे आपल्या सभांमधून द्यायचे.
अमरावतीतल्या ज्या हरिसालची डिजिटल गाव म्हणून प्रसिद्धी करण्यात आली होती, त्याचं मनसेनं केलेलं 'स्टिंग ऑपरेशन' राज ठाकरे यांनी सादर केलं. स्वच्छ भारत योजना, सैनिकांच्या जीवावर मागितलेली मतं अशा विषयांवर राज ठाकरे सभांमध्ये बोलायचे.
राज यांच्या सभांमधलं 'लाव रे तो व्हीडिओ' हे वाक्य प्रचारादरम्यान गाजलं, सोशल मीडियावर त्याचे अनेक मीम्स बनले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्या सभांचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला मतांच्या रुपानंही बसणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.
निवडणूक निकालांचे कल हाती येऊ लागल्यावर मात्र मतदारांनी भाजपलाच कौल दिल्याचं स्पष्ट होऊ लागलं. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने गेल्या निवडणुकीतली कामगिरी कायम ठेवली. त्यामुळे राज ठाकरेंचा हायटेक प्रचार निष्प्रभ ठरल्याची चर्चा सुरू झाली.
राज ठाकरेंनी महाराष्ट्रात नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, महाड, खडकवासला, पनवेल, भांडुप, दक्षिण मुंबई आणि नाशिकमध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले तर साताऱ्यात उदयनराजे भोसले. राज ठाकरेंनी सभा घेतलेला खडकवासला हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला. साताऱ्यामध्ये उदयनराजेंचा वैयक्तिक करिष्मा मोठा आहे तर बारामती हा पवार घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे राज यांच्या सभांचा या दोन्ही उमेदवारांच्या यशाशी संबंध जोडणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न विश्लेषकांनी उपस्थित केलाय.
मावळ मतदारसंघात येणाऱ्या पनवेलमध्येही राज यांनी सभा घेतली होती. मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं पार्थ पवार यांना उमेदवारी दिली होती. मावळमधून शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला.
राज ठाकरेंनी जिथे जिथे सभा घेतल्या आणि तिथे तिथे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळालेली मतं यांचा विचार करता राज ठाकरेंचं प्रचारतंत्र किती प्रभावी ठरलं, याबद्दल बीबीसी मराठीनं पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांची मतं जाणून घेतली.
मोदींचा वैयक्तिक करिष्मा मोठा
"मोदींचा वैयक्तिक करिष्मा हा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यातही त्याचं प्रत्यंतर आलं आहे. तिथल्या राजकारणात रुजलेली जातीची समीकरणं मोदींनी पूर्णपणे मोडीत काढली. महाराष्ट्रातही हेच दिसून आलं आहे. खरं तर महाराष्ट्रात विरोधकांमध्ये जी पोकळी निर्माण झाली होती, ती राज ठाकरे यांनी भरून काढली होती.
काँग्रेस आणि शिवसेनेलाही ते जमलं नव्हतं. लोकांनी त्यांच्या सभांना गर्दी केली, त्याचं कौतुक केलं. ते सरकारी योजनांवर बोलत होते, फॅक्ट चेक करत होते. पण त्याचं मतांमध्ये परिवर्तन झालं नाही. कारण मोदींनी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर मतदानाचं आवाहन केलं आणि मतदारांनी त्याला प्रतिसाद दिला. आणि त्यामुळेच राज ठाकरेंच्या सभांचा कोणताही फायदा दिसला नाही," असं मत पत्रकार सुजाता आनंदन यांनी व्यक्त केलं.
'लोकांनी राज ठाकरेंना ऐकलं, राज ठाकरेंचं ऐकलं नाही'
राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी ही ठाकरी शैलीला ऐकण्यासाठी व्हायची. लोक केवळ राज ठाकरेंना ऐकायला यायचे, त्यांचं ऐकायला नाही, अशी मार्मिक प्रतिक्रिया लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक यदु जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली.
यदु जोशी यांनी म्हटलं, "की मुळात ठाकरे घराण्याची ओळखच काँग्रेस विरोध ही आहे. मनसे ही पण शिवसेनेतून बाहेर पडलेली उपशाखाच आहे. त्यामुळे ठाकरे घराण्यातील एखादी व्यक्ती काँग्रेससाठी मतं मागते ही गोष्टच त्यांच्या समर्थकांना पटणारीच नव्हती. त्यातही त्यांच्या भूमिकांमधला आश्चर्यकारक बदलही मतदारांना बुचकळ्यात टाकणारा होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते मोदींना मतं द्या, असं म्हणत होते आणि यावेळेस मोदी-शाहांना हरवा अशी भूमिका घेतली होती. 'कथनी आणि करणी'मधला हा भेद लोकांनी स्वीकारला नाही.
"राज ठाकरेंचा मतदारच मुळात कमी आहे. त्यांचं elective merit ढासळतंय. जे स्वतःचे उमेदवार निवडून आणू शकत नाहीत, ते दुसऱ्यांच्या उमेदवारांना कसे निवडून आणतील असा प्रश्न मतदारांनाही पडू शकतो. शिवाय एकदा पर्याय म्हणून मतदारांनी मनसेला संधी दिली होती. तेव्हा काही भरीव न करता आता राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जायला सांगतात तेव्हा लोक नक्कीच विचार करणार," असंही यदु जोशी यांनी म्हटलं.
राज ठाकरे आपल्या सभांमधून जे व्हीडिओ दाखवले होते, ते सोयीस्कररित्या एडिट केलेले होते. भाजप-शिवसेनेनं सोशल मीडियावरून मूळ व्हीडिओ दाखवले तसंच राज ठाकरें शरद पवारांच्या इशाऱ्यावर बोलतात, हे मतदारांच्या मनात ठसविण्यामध्येही भाजप-शिवसेनेला यश मिळाल्याचं यदु जोशींनी सांगितलं.
'आता गरज आत्मचिंतनाची'
राज ठाकरेंच्या सर्व प्रचारसभांकडे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी म्हणून पाहिलं जात होतं. पण लोकसभेच्या निकालांची आकडेवारी पाहता राज ठाकरे विधानसभेला गर्दीचं रुपांतर मतात करू शकतील का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. याबद्दल बोलताना यदु जोशीं यांनी सांगितलं, "राज ठाकरेंनी विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःच्या पक्षाच्या विस्तारावर भर द्यावा. राज ठाकरेंना आत्मचिंतन करण्याची गरज आहे."
"मनसेच्या सभांमधील गर्दी मतांमध्ये किती परिवर्तित होईल ही शंका होतीच. शिवाय या निवडणुकीमध्ये मुद्दा एकच होता- तो म्हणजे मोदी हवेत की नकोत. निवडणुकीपेक्षाही हे सार्वमतच होतं. मतदारांनी मोदी हवेत या बाजूनं कौल दिला," असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
'निकालांचं विश्लेषण करणं गरजेचं'
नेमकं मतदान कसं झालंय, विधानसभा मतदारसंघनिहाय मतांची टक्केवारी काय आहे, या सगळ्या आकडेवारींचं विश्लेषण केल्यानंतरच राज ठाकरे यांच्या सभांचा किती परिणाम झाला, हे सांगता येईल अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
आमचा विरोध हा मोदी आणि अमित शाह यांच्या कार्यपद्धतीला होता. प्रचारसभांच्या माध्यमातून मतदारांचं प्रबोधन करणं हा आमचा उद्देश होता. त्यामुळं विभागवार मतांचं मार्जिन कळल्यानंतरच मनसेच्या यशापयशाचं मूल्यमापन करणं शक्य होईल, असं शिदोरे यांनी म्हटलं.