फडणवीस अडचणीत, 23 वर्षाच्या पुतण्याच्या लस घेतानाचे फोटो व्हायरल, काँग्रेसनं घेरलं
रेमडेसिविर व ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून भाजपा सतत महाविकास आघाडीला घेरत असताना नवीन वादाला तोंड फुटलं आहे. येत्या एक मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेण्याची मुभा मिळाली आहे. परंतु विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 23 वर्षीय तरुण पुतण्याने आधीच लस घेतल्यामुळे अडचणीत वाढ होण्याचे चित्र दिसत आहे
देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस लस घेतानाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे टीकेची झोड उठली आहे. तन्मय फडणवीस यांनी लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नंतर काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले.
नियमाबाहेर तन्मय फडणवीस याला लस कशी काय दिली गेली?, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे.
काँग्रेसनं या निमित्तानं काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.
तन्मय फडणवीस
४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का?
फ्रंटलाइन वर्कर आहे का?
आरोग्य कर्मचारी आहे का?
जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी गेली?
भाजपकडे रेमडेसिविरप्रमाणे लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?
असा खोचक टोलाही काँग्रेसनं हाणला आहे.