गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2019 (14:17 IST)

ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, साकारणार स्वप्नील जोशीच्या आईची भूमिका

‘जीसिम्स’ निर्मित श्रावणी देवधर दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी होणार प्रदर्शित
 
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’मध्ये हिंदी व मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी या स्वप्नील जोशीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
 
नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नील जोशीच्या खंबीर आईची भूमिका नीना कुळकर्णी साकारत आहेत.
 
आज या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले, पोस्टर मध्ये स्वप्नील जोशी आपल्या आईच्या म्हणजेच नींना कुळकर्णी बरोबरचा लुक, आणि आपुलकीच्या नात्यात गुंतलेली ओढ’ अशी सुंदर वाक्य लिहिले आहे जे आई आणि मुलामधील मायेचे जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करत आहे. 
 
नीना कुळकर्णी सांगतात, “मी सेटवर काम करत असताना खुश होते कारण या चित्रपटाची दिग्दर्शिका श्रावणी माझी जुनी मैत्रीण आहे. स्वप्नील जोशीबरोबर पुन्हा १४ वर्षांनी काम करायला मिळालं, चंद्रकांत कुलकर्णी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे ह्यांच्या बरोबर पुन्हा काम करायला मजा आली. 'मोगरा फुलाला' ही एक सुंदर, संवेदनशील कथा आहे. या कथेमधील माझं पात्र साकारताना मला खूप समाधान मिळालं. या चित्रपटाचे निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांचादेखील विशेष उल्लेख करेन. त्यांचे विशेष आभार." 
 
या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी याच्याबरोबर साई देवधर, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. 
 
नीना कुळकर्णी या ज्येष्ठ अभिनेत्री, स्तंभलेखिका, निर्माती, दिग्दर्शिका असून त्यांनी मराठी व्यावसायिक नाटकांपासून १९७० साली आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. नीना  कुळकर्णी या 'पॉंडिचेरी' चित्रपटातदेखील प्रेक्षकांना भेटणार आहेत. त्याचबरोबर 'ये है मोहबत्ते' या मालिकेतदेखील त्या आहेत. 
 
‘जीसिम्स’च्या अर्जुनसिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जीसिम्स फिल्म्स’ने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात फुगे, तुला कळणार नाही, रणांगण यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे, स्टार प्रवाह वरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेची निर्मिती त्याचबरोबर ‘भिकारी’ या चित्रपटची प्रस्तुती देखील ‘जीसिम्सने केली आहे. तसेच भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपन्यांमधील एक अग्रणी कंपनी असलेल्या ‘पॅनोरमा स्टुडिओज’ने ‘मोगरा फुलला’च्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे.
 
प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांमध्ये लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ‘मोगरा फुलला’ला स्वतःचा असा वेगळा ‘टच’ देण्यास त्या सज्ज झाल्या आहेत.