बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : गुरूवार, 2 जानेवारी 2025 (07:53 IST)

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

श्रींच्या वास्तव्याने पुनीत झालेली शेगांवातील त्या स्थळांबद्दल जाणून घेऊया ज्यांचा उल्लेख पोथीमध्ये आढळून येतो-
 
श्री प्रगटस्थळ - माघ वद्य सप्तमी, शके १८०० अर्थात २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी शेगांववासियांना श्री गजानन महाराजांचे प्रथम दर्शन घडले. गजानन महाराज प्रगट झालेले स्थळ ते या भव्य वटवृक्षाखाली. ज्या स्थळी श्रींचे प्रथम दर्शन झाले ती मोटे हवेलीची जागा श्री मोटे यांनी संस्थेत विलीन केली. या ठिकाणी उभारलेली वास्तु प्रगटस्थळ म्हणून ओळखली जाते. श्रींच्या या प्रगटस्थळी श्री गजानन महाराज संस्थानद्वारा प्रगटस्थळ वास्तू उभारण्यात आली आहे. येथील मेघडंबरीमध्ये श्रींच्या पादुका स्थापित आहेत. येथे श्रींच्या प्रगट होण्याच्या प्रसंगाचे शिल्पही साकारण्यात आले आहे. याच जागी संस्थानव्दारा उभारण्यात आलेले बहुउद्देशीय सभागृह लोकोपयोगी तसेच मंगलकार्यासाठी वापरण्यात येते.
श्री बंकट सदन - संत श्री गजानन महाराजांचे परमभक्त बंकटलाल यांना श्रींचे प्रथम दर्शन घडले होते. श्रींचे वास्तवय् लाभलेले हे बंकट सदनाचा पूण्यठेवा संस्थानद्वारा नूतीनकरण करुन जतन करण्यात आला आहे. या ठिकाणी श्रींनी असंख्य अवतार लीला केल्यात. श्रींचे वास्तव्य लाभलेले हे ‘बंकट सदन‘ पुढे बंकटलालजींच्या वंशजांनी संस्थानचे हाती सुपुर्द केले. येथे श्रींची गादी व पादुका तसेच बंकटलाल यांचा आसनस्थ पुतळा व त्यांचे व्यवसायातील वस्तुंचा साहित्याची प्रतीकृती पहावयास मिळते. या ठिकाणचे पावित्र्य जोपासले जावे या उद्देशाने संस्थानने या जागेवर एक तीन मजली स्मृतीभवन बांधले असून त्यास बंकट सदन असे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी श्रींच्या पादुका व फोटो पलंगावर विराजित आहेत. प्रतिदिन सकाळ-सायंकाळ पूजा आरती केली जाते. या ठिकाणी श्रींनी चिलीम विस्तवाशिवाय प्रज्वलीत केली होती. मरणोन्मुख जानराव देशमुख यांना श्रींचे चरणतीर्थ पाजून आजारातून बरे केले. तसेच येथेच काशिक्षेत्रातून आलेल्या गोसाव्याने आणलेल्या प्रसादपुडीचा स्विकार करुन त्याची इच्छा पूर्ण केली. हे लीला प्रसंग या पुण्य भूमीत घडून आले.
 
श्री हरिहर मंदिर - महाराजांनी मोटे यांच्या महादेवाच्या मंदिरात वास्तव्य केले होते. श्रींचा जुना मठ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण श्री मोटेंनी संस्थेत विलीन केले. संस्थानने जुन्या शिवालयाचा जिर्णोध्दार करून त्या ठिकाणी उत्कृष्ठ कलाकुसरीचे संगमरवरी मंदिर बांधले असून येथे श्री विष्णुमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हे ठिकाण हरिहर मंदिर म्हणुन नावारूपास आले असून श्री शिवजी व श्री विष्णुंचे एकत्र असलेले हे भारतातील एकमेव मंदिर असावे असे ज्ञात माहितीनुसार अंदाज आहे. या मंदिरात श्री गजानन महाराजांचे बराच काळ वास्तव्य होते. येथे श्रींनी सुकलालची द्वाड गाय तसेच गोविंदबुवांच्या उनाड घोड्याला शांत केले. याच शिवमंदिराच्या सभामंडपात झालेल्या एका कीर्तन प्रसंगी गोविंदबुवा टाकळीकर यांना श्री गजानन महाराजांनी हंसगीतेचा उत्तरार्ध सांगितला, तो ऐकून गोविंदबुवांनी महाराजांची महती शेगांवकरांना ऐकवली.
 
श्री मारुती मंदिर (सितलामाता मंदिर) - हे मंदिरी अत्यंत पुरातन असून येथे बराच काळ श्रींचे वास्तव्य होते. श्री सितलामाता मंदिर ट्रस्ट हे सुध्दा संस्थानमध्ये विलीन झाले असून श्रींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या मंदिराचा संस्थानने जिर्णोध्दार करून या वास्तूमध्ये श्रींची गादी व पादुकांची स्थापना करण्यात आली आहे. याच मंदिरात पाटील बंधू यांना श्रींच्या योगसामर्थ्याचा अनुभव आल्यावर ते श्रींना शरणागत आले.