बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019 (15:28 IST)

नव्या विधानसभेत २३ महिला आमदार करणार मतदारसंघाच प्रतिनिधित्व

राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागांचे निकाल स्पष्ट झाले असून यात महिलांचा टक्का यावेळीही कमीच असून त्यात ११ विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
 
मावळत्या विधानसभेत २२ महिला आमदार होत्या. त्यात यावेळी एका आमदाराची भर पडताना दिसत आहे. राज्यातील सर्व २८८ जागांवर यावेळी निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३ हजार २३७ उमेदवार उतरले होते. त्यात २३५ महिला उमेदवारांना विविध राजकीय पक्षांनी मैदानात उतरण्याची संधी दिली होती.
 
यंदाच्या निवडणुकीत ज्या विद्यमान आमदार पुन्हा विजयी झाल्या आहेत त्यामध्ये  मंदा म्हात्रे (बेलापूर) मनीषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), माधुरी मिसाळ (पर्वती), मोनिका राजळे (शेवगाव), भारती लव्हेकर (वर्सोवा), यांचा समावेश आहे. या आठही भाजपच्या आमदार आहेत.
 
तर कॉंग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) यशोमती ठाकूर (तिवसा) आणि वर्षा गायकवाड (धारावी-मानखुर्द) यांनी पुन्हा एकदा आपापल्या मतदारसंघातून विजय मिळवत विधानसभेत दाखल झाल्या आहेत.
 
प्रथमच विधानसभेत निवडून जाणाऱ्या महिला आमदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे (देवळाली), शिवसेनेच्या लता सोनावणे (चोपडा) आणि यामिनी जाधव (भायखळा), भाजपच्या मुक्ता टिळक (कसबा पेठ), श्वेता महाले (चिखली), मेघना बोर्डीकर (जिंतूर), नमिता मुंदडा (केज), काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (वरोरा) व सुलभा खोडके (अमरावती) यांचा समावेश आहे. गीता जैन (मिरा भाईंदर) आणि मंजुळा गावित (साक्री) या दोन अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत.