गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. बाबा आमटे
Written By वेबदुनिया|

बाबांचं आनंदवन

बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंदवन उभारलं. पण हे आनंदवन आहे तरी काय?

MH GovtMH GOVT
बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचे ठरविले, त्यावेळी त्यांनी त्या कार्यासाठी सरकारकडे जमीन मागितली होती. १९५१ मध्ये त्यांना सरकारने एक पडीक जमीन दिली. जमीनही अशी की नैसर्गिक साधनसंपत्तीची तिथे बिलकुल कमतरता नव्हती. साप आणि विंचू अगदी विपुल प्रमाणात होते. त्यामुळे सुरवातीला त्यांचा बंदोबस्त हेच एक काम होऊन बसले. पण काहीही नसण्यापेक्षा जमीन मिळाली याचाच आनंद बाबांनी मानला आणि काम सुरू केले.

१९५१ च्या जूनमध्ये बाबांनी आनंदवनात रहायला सुरवात केली, त्यावेळी त्यांच्याबरोबर एक गाय, कुत्रा, चौदा रूपये यांच्यासह पत्नी साधना व दोन मुले विकास व प्रकाश होती. शिवाय बाबांचे कुष्ठरोगी होतेच. बाबा अतिशय सकारात्मक होते. त्याचबरोबर विजिगीषू वृत्ती त्यांच्यात ठासून भरली होती. म्हणून बाबांनी आपल्या या प्रकल्पाला कोणतेही रूग्णविषयक, रोगविषयक नाव न देता, आनंदवन असे त्याचे नामाभिदान केले.

मग आनंदवनात आनंद शोधण्यासाठी बाबांनी जोरदार काम सुरू केलं. त्यांना त्यांच्या कुष्ठरोग्यांनीही तितकीच तोलामोलाची साथ दिली. त्यांच्याच अथक प्रयत्नाने या वाळवंटी जागेत हिरवाई वस्तीला आली. ही किमया घडवली ती अपंग म्हणविल्या जाणार्‍या कुष्ठरोग्यांनी. सुरवातीला रहाण्यासाठी बांबूच्या सहाय्याने दोन झोपड्या उभारण्यात आल्या. पण त्याला भिंतीच नव्हत्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी जंगली प्राणी येण्याची भीती होती. जंगली प्राण्यांपासून रक्षण व्हावे यासाठी आणलेले चारही कुत्रे जंगली प्राण्यांनी एकामागोमाग एक गट्ट्म केले. मग त्यांनी तेथे विहीर खोदण्याचे ठरविले. त्यासाठी लागणारी पुरेशी हत्यारेही त्यांच्याकडे नव्हती. तरीही त्यांनी ते काम शिरावर घेतले आणि पूर्ण केले.

MH GovtMH GOVT
सुरवातीचे हे दिवस फारच हलाखीचे होते. आर्थिक चणचण प्रकर्षाने जाणवायची. आपल्याला कुणावर अवलंबून रहायला नको, यासाठी प्रयत्न करण्याचे मग बाबांनी ठरविले. मग त्यातून शेतीची कल्पना पुढे आली. आनंदवनाच्या जागेतच ते भाज्या पिकवायला लागले. नंतर बाजरी, ज्वारीची पिके घ्यायला लागले.

पुढच्या तीन वर्षात आनंदवनात आमटे कुटुंबाचा चांगलाच विस्तार झाला. त्यात साठ कुष्ठरोगी आले. त्यांनी मिळून सहा विहरी खणल्या. शिवाय पिके घेण्यासाठी आवश्यक ती जमीन तयार केली. त्यावर पिके व भाजीपाला घेतला जाऊ लागला. पण नंतर एक नवाच प्रश्न उभा राहिला. आनंदवनात तयार झालेली पिके, भाजीपाला गरजेपेक्षा जास्त होऊ लागला. त्यानंतर तो वरोर्‍यात विक्रीसाठी पाठविण्यात येऊ लागला. पण लोक त्याला हात लावायलाच तयार नसायचे. आता काय करायचे?

MH GovtMH GOVT
योगायोगाने त्यावेळी आनंदवनात काम करण्यासाठी ३६ देशातील सुमारे पन्नास स्वयंसेवक आले होते. त्यांनी आनंदवनात रहायला, तेथील अन्न खायला सुरवात केल्यानंतर गावातल्या लोकांनाही आश्चर्य वाटले. मग तेही हळू हळू आश्रमात येऊ लागले. तेथील स्वच्छता पाहून तेही भारावले. कुष्ठरोग्यांनी पिकवलेले अन्न खाऊन आपल्याला कुष्ठरोग होणार नाही, हे त्यांनाही पटले आणि त्यानंतर मग आनंदवनाताली शेतमालाला कुणीही नाके मुरडेनासे झाले.

पुढे कुष्ठरोग बरा झाल्यानंतरही लोक आनंदवनातून जायला तयार नसायचे. ते मग बाबांबरोबरच काम करायला लागायचे. पडेल ते काम करायचे. त्यांच्या सहयोगाने अनेक कामे सुरू झाली. अनेक उत्पादने आनंदवनात तयार व्हायला लागली. त्यामुळे आनंदवन स्वयंपूर्ण झाले. ही स्वयंपूर्णताही एवढी की आनंदवनवासियांना बाहेरून फक्त मीठ, साखर आणि पेट्रोल विकत घ्यावे लागायचे. बाकी सर्व गोष्टींचे उत्पादन तेथेच व्हायचे. त्यामुळे आणखी एक फायदा झाला. विविध उत्पादनात तेथे बर्‍या झालेल्या कुष्ठरोग्यांचा समावेश असल्याने त्यांना आश्रमाबाहेर पडल्यानंतर स्वतःचा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी मनोबळ मिळाले.

आनंदवनातील शेतमालाच्या उत्पादनानेच अखेर तेथे शेतकी कॉलेज स्थापन झाले. पुढे अंधांसाठी प्राथमिक शाळा, मूकबधिरांसाठी शाळा आणि एक अनाथालयही सुरू झाले. बाबांच्या या कामामुळेच त्यांना पुढे दिगंत किर्ती मिळाली. परदेशी लोकांनाही या प्रकल्पाला भेट देऊन मदत केली.