रावणाची पूजा करा अन्यथा....
- अनिरुद्ध जोशी
श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या या भागात आम्ही आपल्याला आज घेऊन जाणार आहोत मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील चिखली या गावात. दसर्याच्या दिवशी रावणाची पुजा केली नाही तर संपूर्ण गाव जळून बेचिराख होईल अशी येथील गावकर्यांची समजूत आहे. म्हणूनच दसर्याच्या दिवशी गावात रावणाची पुजा तर केलीच जाते, परंतु त्याचसोबत या दिवशी राम- रावण युद्धाचे आयोजनही केले जाते. रावणाच्या पुजेनिमित्त या दिवशी या गावात जत्राही भरते. बाबूभाई हे पुजारी रावणाची पुजा करतात. रावणाची पुजा केल्याने त्यांचे नावही बाबूभाई रावण असे पडले आहे. रावणाची आपल्यावर कृपा असल्याचा त्यांचा दावा आहे. गावावर कोणतेही संकट ओढवते त्या दिवशी आपण उपवास करतो. गावात दुष्काळ पडला असेल तर आपल्या उपवासानंतर गावात जोरदार पाऊस पडतो असाही बाबूभाईंचा दावा आहे. सरपंच कैलाशनारायण व्यास यांनी रावणाची पूजा करण्याची येथील प्रथा अत्यंत जुनी आहे, असे सांगितले. एकदा गावात कधीकाळी रावणाची पूजा कोणीच केली नाही, आणि जत्राही भरवण्यात आली नाही. त्यामुळे गावात मोठी आग लागल्याचे व्यास यांचे म्हणणे आहे. पद्मा जैन या स्थानिक महिलेने दिलेल्या माहितीनुसार गावात यापूर्वी दोनदा आग लागली आहे. एकदा तर जत्रा न भरवता आणि रावणाची पुजा न करता गावात आग लागते का पाहण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. परंतु यादिवशी गावात आलेल्या वादळात सारे काही उडून गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रावणाची पुजा शेजारच्या श्रीलंकेतही केली जाते. परंतु, उत्तर भारतात तशी कुठे प्रथा नाही. उलट रावण हा दुष्ट प्रवृत्तीचा मानला जातो. पण मग रावणाची पूजा करण्याच्या प्रकाराला काय म्हणावे श्रद्धा की अंधश्रद्धा?