शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

गाथा मैत्री आणि संघर्षाची

'दोस्तगिरी' हा नावाप्रमाणेच मैत्रीवर आधारित चित्रपट आहे. विजय शिंदे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. संकेत पाठक, विजय गीते, अक्षय वाघमारे, पूजा मळेकर, पूजा जैस्वाल, शुभांगी लाटकर, शरद पोंक्षे, राहुलराज डोगरे असे कलाकार या चित्रपटात आहेत. संतोष पानकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पण महिन्याभरापूर्वीच संतोष यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी चित्रपटाची पूर्ण टीम झटते आहे. कथा प्रवीण वाडकर यांची आहे तर रोहन-रोहन यांचं संगीत आहे. 'दोस्तगिरी' ही सॅम, शिव, सिद आणि पूर्वा अशा चार जणांची कहाणी आहे. एकाच कॉलेजमध्ये शिकणार्‍या या चौघांचं आयुष्य अगदी आनंदात जात असतं. मजा, मस्ती, धमाल असं सगळं ते अनुभवत असतात. पण कॉलेजच्या एका कार्यक्रमादरम्यान एक घटना घडते आणि त्यांचं आयुष्यच बदलून जातं. काय असते ही घटना? या प्रसंगाला हे मित्र कसे सामोरे जातात? हे सगळं  'दोस्तगिरी'मध्ये पाहता येणार आहे. 
 
'ट्रकभर स्वप्न'हा आणखी एक चर्चेतला चित्रपट. नितीन चंद्रकांत देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रमोद पवार याचे दिग्दर्शक आहेत. मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, आदिती पोहनकर,मुकेश ऋषी, यतीन कार्येकर, स्मिता तांबे, सुरेश भगत असे कलाकार या चित्रपटात आहेत. 'ट्रकभर स्वप्न' ही सर्वसामान्य मुंबईकराची, त्याच्या संघर्षाची कथा आहे. प्रशांत खेडेकर यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. या जोडप्याचा संघर्ष यात दाखवण्यात आला आहे. मकरंद यात सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसेल तर क्रांती सर्वसामान्य गृहिणी आहे. पती-पत्नी आणि दोन मुलं असलेल्या या कुटुंबाच्या स्वप्नांची कथा यात पाहायला मिळणार आहे. सर्वसामान्यांची स्वप्नं फार मोठी नसतात. स्वतःचं घर, कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवणं, कुटुंबासोबत अधूनमधून फिरायला जाणं एवढीच स्वप्नं ते बघतात. क्रांती आणि मकरंदही हेच स्वप्न पाहतात आणि ते पूर्ण करण्यासाठी झगडतात. या चित्रपटात सर्वसामान्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब दिसणार आहे. त्यामुळे 'ट्रकभर स्वप्न' सर्वसामान्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाईल यात शंका नाही.
 
आरती देशपांडे