गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जून 2019 (12:19 IST)

स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला ‘मोगरा फुलला’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आई-मुलाचे, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणारा, एक कौटुंबिक संदेश देणारा बहुप्रतीक्षित ‘मोगरा फुलला’ चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित झाला असून त्याला संपूर्ण महाराष्ट्रात तिकीट खिडकीवर रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दिग्दर्शिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्राबणी देवधर यांचे बऱ्याच कालावधीनंतर झालेले पुनरागमन, आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी याचा वेगळ्या लुकमधील नायक, सुमधुर संगीत आणि ‘जीसिम्स’ सारख्या दर्जेदार बॅनरची निर्मिती यांमुळे चित्रपटाबद्दल असलेली उत्कंठा कसोटीवर अगदी पुरेपूर उतरल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळत आहे.
 
“मोगरा फुलला' या सिनेमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून सिनेमाचे समीक्षकांनीदेखील खूप कौतुक केले आहे. मुंबई,पुणे,ठाणे येथील शहरांमधील प्रेक्षक ही घराघरातील कौटूंबिक गोष्ट अनुभवण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सिनेमाने १४ जून पहिल्या दिवशी शुक्रवारी ३७.५ लाख इतकी कमाई केली त्यानंतर दुसऱ्या शनिवार १५ जुन रोजी ५६.२ लाख तर १६ जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान असा रंगात सामना असूनदेखील प्रेक्षकवर्ग ‘मोगरा फुलला’ पाहण्यासाठी सिनेमागृहात पोहचला होता आणि तिसऱ्या दिवशी ५१.५ लाख इतकी कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाने एकूण पहिल्या तीन दिवसात १ करोड ४५ लाख इतकी कमाई केली आहे . त्याचबरोबर प्रेक्षकवर्गाचा चांगला प्रतिसाद बघून मोगरा फुलला सिनेमाच्या शोज मध्ये वाढ करण्यात आली आहे .
 
‘नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा’ या टॅगलाईनसह प्रदर्शित झालेला ‘मोगरा फुलला’ स्वप्नील जोशी, सई देवधर, नीना कुळकर्णी,चंद्रकांत कुलकर्णी, आनंद इंगळे, संदीप पाठक आदींच्या दमदार अभिनयाने नटला आहे. नीना कुळकर्णी यांच्या रूपाने बऱ्याच काळाने पडद्यावर एक हृदयाला भिडणारी आई रसिकांना पाहायला मिळते, तर दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रकांत कुलकर्णी स्वप्नीलच्या काकाच्या भूमिकेत वेगळी छाप पाडून जातात. अशा अनेक हळुवार नात्यांची “पैशांनी श्रीमंत होणं सोप्पं,नात्यांनी समृद्ध होणं कठीण” या टॅगलाइनमधील गुंफण प्रत्यक्ष पडद्यावर अनुभवता येते.
 
चित्रपटातील गाणी अभिषेक कणखर यांनी लिहिली असून रोहित राऊतने संगीत दिले आहे. शंकर महादेवन, बेला शेंडे, जसराज जोशी यांच्या आवाजातील गाणी उत्तम जुळून आली आहेत.
 
उत्तम कथा, कलाकारांचा दमदार अभिनय, चांगली संकल्पना आणि सुमधुर संगीत यांच्यामुळे ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील यात काही शंका नाही.