बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (10:43 IST)

सलमानच आहे... फक्त सातारचा आहे! 'सातारच्या सलमान' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र भक्तिमय,उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असतांनाच, हा आनंद द्विगुणित करण्यासाठी लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे घेऊन येत आहेत 'सातारचा सलमान' या चित्रपटाचा टिझर. दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माते प्रकाश सिंघी आणि सुयोग गोऱ्हे यांनी गणेशगल्लीच्या राजाचे दर्शन आणि आशीर्वाद घेत चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला. सुयोग गोऱ्हेची प्रमुख भूमिका असलेल्या 'सातारचा सलमान' या चित्रपटाचे पोस्टर आणि हटके नाव यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आता टिझर पाहिल्यावर या उत्सुकतेत अधिकच भर पडणार आहे.
 
'सातारचा सलमान' चित्रपटाचा टिझर हा निव्वळ सुयोगवर केंद्रित आहे. 'ए हिरो' हाकेवर सुयोगची होणारी दमदार एन्ट्री आणि पडद्यामागून येणारा आवाज मनाला भिडणारा आहे. सुयोगची वेगवेगळी रूपं या टिझर मध्ये आपल्याला दिसत आहेत. स्वप्न बघणाऱ्या आणि छोट्या गावातून येणाऱ्या एका सामान्य मुलाला जेव्हा त्याजी लाईफच हिरो बनवते, तेव्हा नक्की काय होते हे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
 
याशिवाय या टिझरमध्ये अजून एक सुखद धक्का देणारी गोष्ट आहे. टिझर सुरु झाल्यावर ऐकू येणारा आवाज ओळखीचा वाटतोय ना? तर हा आवाज आहे आपल्या सर्वांच्याच लाडक्या अमेय वाघचा.
 
अमेय वाघने देखील त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून 'सातारचा सलमान' चित्रपटाचा टिझर शेअर करत चित्रपटाला आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' हा आगामी चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कलाकृतीत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या हेमंत ढोमे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. ११ ऑक्टोबरला तयार राहा या सातारच्या सलमानला भेटण्यासाठी..