शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जुलै 2023 (22:38 IST)

अजित आगरकर: लॉर्ड्सवर शतक, वनडेत फास्टेट फिफ्टी आणि सात भोपळे

बीसीसीआयने भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवडसमिती अध्यक्षपदी अजित आगरकर यांची नियुक्ती केली आहे. क्रिकेट अॅडव्हायझरी कमिटीने यांनी अध्यक्षपदासाठी उत्सुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांच्या समितीने आगरकर यांची अध्यक्षपदी निवड केली.
 
आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीत शिवसुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच आगरकर यांनी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. आगरकर यांच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा.
 
काटक शरीरयष्टीचा फास्ट बॉलर, उपयुक्त बॅट्समन आणि उत्तम फिल्डर ही गुणवैशिष्ट्यं. साधारण दशकभराच्या कालावधीत आगरकरने 26 टेस्ट, 191 वनडे आणि 4 ट्वेन्टी-20 मॅचेसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं.
 
सदैव चर्चेत अशा टीम इंडियाच्या निवडसमितीच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित आगरकरांचे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. त्यानिमित्ताने अजित आगरकरच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा.
 
फास्ट बॉलरला साजेशी शरीरयष्टी नाही, प्रचंड वेग नाही, जादुई स्विंग नाही मात्र तरीही अचूक टप्प्यावर बॉलिंग करत बॅट्समनला पेचात पाडणारा बॉलर अशी ओळख वनडे क्रिकेटमध्ये निर्माण केली. संघाला गरज असताना बॅट हातात घेऊन टोलेबाजी केली. फिल्डर म्हणून नेहमीच योगदान दिलं.
 
मुंबईच्या मैदानांवर बॅट्समन म्हणून सुरुवात करणाऱ्या आगरकरला ज्येष्ठ प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं मार्गदर्शन लाभलं. हा मुलगा उत्तम बॉलर होऊ शकतो हे जाणलेल्या आचरेकरांनी आगरकरला बॉलिंगवर लक्ष केंद्रित करण्यास सुचवलं. पुढे जे घडलं ते सगळ्यांसमोर आहे.
 
मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, सौरव गांगुली, अजय जडेजा, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी अशा 2000च्या दशकातल्या प्रमुख भारतीय कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दुर्मीळ खेळाडूंमध्ये आगरकरचा समावेश होतो.
 
निवडसमिती अध्यक्ष तसंच सदस्य म्हणून याआधी दिलीप वेंगसरकर, किरण मोरे, चंदू बोर्डे, संदीप पाटील, अंशुमन गायकवाड, रमाकांत देसाई, नरेन ताम्हाणे या मराठमोळ्या माजी खेळाडूंनी काम पाहिलं आहे.
 
लॉर्ड्सवरचं ऐतिहासिक शतक
लॉर्ड्स मैदानाला क्रिकेटची पंढरी मानलं जातं. या मैदानावर शतक झळकावलं किंवा डावात पाच विकेट्स घेतल्या की ऑनर्स बोर्डवर नाव नोंदलं जातं.
 
इतिहास, संस्कृती आणि शिष्टाचार यांच्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर शतक झळकवावं असं अनेकांचं स्वप्न असतं मात्र मोठमोठ्या बॅट्समनचं हे स्वप्न साकार झालेलं नाही. मात्र टेलएंडर असूनही भारताच्या एका बॉलरने लॉर्ड्सवर शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. त्या भारतीय बॉलरचं नाव आहे- अजित आगरकर.
 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, एबी डीव्हिलियर्स, जॅक कॅलिस, युनिस खान अशा दिग्गजांना लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर नाव कोरता आलं नाही मात्र बॉलर असूनही उत्तम बॅटिंग करू शकणाऱ्या आगरकरने ऐतिहासिक लॉर्ड्सवर शतक साकारलं होतं.
 
टीम इंडिया 2002 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर होती. ढगाळ वातावरण आणि स्विंगला अनुकूल खेळपट्ट्या यामुळे इंग्लंडमध्ये खेळणं विदेशी बॅट्समनकरता आव्हानात्मक मानलं जातं. या दौऱ्यातली पहिली टेस्ट लॉर्डस इथं होती. इंग्लंडने टॉस जिंकून 487 धावांचा डोंगर उभारला. नासिर हुसेनने दीडशतकी खेळी केली होती.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाचा डाव 221 धावातच आटोपला. इंग्लंडने दुसऱ्या डावात 301 धावा करत भारतीय संघासमोर 568 धावांचं अशक्यप्राय लक्ष्य ठेवलं. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मायकेल वॉन आणि जॉन क्राऊले यांनी शतक झळकावलं होतं.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगला प्रतिकार करत जवळपास चारशे धावांची मजल मारली. त्याचं श्रेय अजित आगरकरच्या शतकाला जातं. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या आगरकरने 16 चौकारांसह नाबाद 109 धावांची खेळी केली.
 
आगरकर शतकाजवळ असताना भारतीय संघाची स्थिती 370/9 अशी होती. अकराव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या आशिष नेहराने आगरकरला चांगली साथ दिली. राहुल द्रविड, वसिम जाफर, व्हीव्हीव्हीएस लक्ष्मण यांनी त्या डावात अर्धशतकी खेळी केल्या होत्या. भारतीय संघाने ती कसोटी गमावली मात्र आगरकरचं शतक कायमस्वरुपी लक्षात राहणारं ठरलं.
 
लॉर्ड्सवर मंकड, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ, रवी शास्त्री, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि अजिंक्य रहाणे या भारतीय फलंदाजांनाच शतक झळकावता आलं आहे.
 
आगरकरची कसोटी कारकीर्द मर्यादित राहिली. हे त्याचं कसोटीतलं पहिलं आणि शेवटचं शतक ठरलं. आगरकरने उर्वरित कसोटी कारकीर्दीत अर्धशतक देखील झळकावलं नाही. ते झळकावण्यासाठी तेवढ्या संधीही मिळाल्या नाहीत.
 
अॅडलेडच्या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार
विदेशी भूमीवर कसोटी जिंकणं हे कोणत्याही संघासाठी आव्हानात्मक असतं. त्यातही भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकणं हे खडतर मानलं जायचं. 2002-03 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने अॅडलेड कसोटी थरारक विजय मिळवला. या विजयाचा आधारस्तंभ होता राहुल द्रविड. द्रविडच्या बरोबरीने आगरकरने विजय साकारण्यात मोलाची भूमिका बजावली.
 
ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 556 रन्सचा डोंगर उभारला. भारतीय संघाने 523 रन्स करत जशास तसे प्रत्युत्तर दिलं. राहल द्रविडने 233 रन्सची मॅरेथॉन खेळी केली. लक्ष्मणने 148 रन्स केल्या.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 196 रन्समध्येच आटोपला. याचं श्रेय आगरकरला जातं कारण त्याने फक्त 41 रन्सच्या मोबदल्यात सहा बॅट्समनना माघारी धाडलं. भारताला विजयासाठी 230 रन्सचं लक्ष्य मिळालं. पाचव्या दिवशी हे लक्ष्य पार करणं अवघड होतं. द्रविडच्या संयमी खेळीच्या बळावर भारताने लक्ष्य गाठलं आणि ऐतिहासिक विजय साकारला.
 
वनडेत फास्टेट फिफ्टी
भारतीय बॅट्मसनतर्फे वनडेत सगळ्यांत कमी बॉलमध्ये अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आजही अजित आगरकरच्या नावावर आहे. 14 डिसेंबर 2000 रोजी राजकोट इथं झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या वनडेत आगरकरने 21व्या बॉललाच अर्धशतकाची नोंद केली.
आगरकरने त्या मॅचमध्ये 25 बॉलमध्ये 67 रन्सची खेळी केली. यामध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्या मॅचमध्ये आगरकरने 3 विकेट्सही घेतल्या होत्या. ऑलराऊंड कामगिरीसाठी आगरकरला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
 
यानंतर एकापेक्षा एक भारतीय बॅट्समननी आंतररष्ट्रीय स्तरावर देदिप्यमान कामगिरी केली. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली हे अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. पण यांच्यापैकी कोणालाही आगरकरचा विक्रम मोडता आलेला नाही.
 
वनडेत वेगवान 50 विकेट्स
वनडे क्रिकेटमध्ये कमीत कमी (23) मॅचेसमध्ये 50 विकेट्सपर्यंत पोहोचण्याचा विक्रम आगरकरने नावावर केला होता. 30 सप्टेंबर 1998 रोजी हरारे इथे झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडेत आगरकरने हा विक्रम नावावर केला. आगरकरने त्या मॅचमध्ये अॅलिस्टर कॅम्पबेल आणि क्रेग विशार्ट यांना आऊट केलं होतं. आगरकरने डेनिस लिली यांचा विक्रम आगरकरने मोडला होता.
 
जवळपास अकरा वर्ष हा विक्रम आगरकरच्याच नावावर होता. आता हा विक्रम श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसच्या नावावर आहे. त्याने 19 वनडेत 50 विकेट्सची नोंद केली होती.
 
पिंच हिंटर
आगरकरमधील बॅटिंग क्षमता ओळखून त्याला पिंच हिंटर म्हणून पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. 6 नोव्हेंबर 2002 रोजी जमशेदपूर इथं झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये आगरकरला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात आलं.
 
संघात युवराज सिंग, मोहम्मद कैफ, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण असतानाही आगरकरला बढती देण्यात आली होती. आगरकरने 102 बॉलमध्ये 11 चौकार आणि 2 षटकारांसह 95 रन्सची दमदार खेळी केली होती.
 
सात भोपळ्यांचाही विक्रम
लॉर्ड्सवर देखणं शतक झळकावलं असलं तरी आगरकरच्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड आहे. कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग सात वेळा शून्यावर बाद होण्याचा नामुष्की विक्रम आगरकरच्या नावावर आहे.
 
अडलेड, मेलबर्न, सिडनी, मुंबई अशा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटीत मिळून आगरकर सातवेळा शून्यावर बाद झाला. डॅमियन फ्लेमिंग (1), ब्रेट ली(2), मार्क वॉ (2), ग्लेन मॅकग्रा (1), शेन वॉर्न (1) यांनी आगरकरला एकेरी धावेचीही नोंद करू दिली नाही.
 
आयपीएल कारकीर्द
अजित आगरकर 2008 ते 2013 कालावधीत आयपीएल स्पर्धेत खेळला. आगरकरने दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व केलं.
आगरकरच्या नावावर या स्पर्धेत 29 विकेट्स आहेत. कोलकाता किंवा दिल्ली संघांनी आगरकरच्या बॅटिंगचा म्हणावा तसा उपयोग करून घेतला नाही. वनडेत छोट्या आणि उपयुक्त खेळी करणाऱ्या आगरकरला वरच्या क्रमांकावर पाठवून त्याच्या कौशल्यांचा उपयोग करून घेता आला असता. मात्र तसं झालं नाही.
 
ट्वेन्टी-20 विश्वविजेत्या संघाचा भाग
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-20 विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. आगरकर त्या संघाचा भाग होता. पाकिस्तानविरुद्धच्या लीग मॅचमध्ये आगरकरने 14 धावा केल्या आणि ओपनर सलमान बटची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
न्यूझीलंडविरुद्ध आगरकरच्या बॉलिंगवर 40 धावा कुटण्यात आल्या. बॅटिंग करताना तो झटपट माघारी परतला. सर्वसाधारण कामगिरीमुळे पुढच्या मॅचमध्ये आगरकरऐवजी जोगिंदर शर्माला अंतिम अकरात संधी मिळाली.
 
जोगिंदर पुढच्या सगळ्या मॅचेस खेळला. वर्ल्डकपचा क्लायमॅक्स असलेली शेवटची ओव्हर आणि शेवटचा बॉल त्यानेच टाकला. अनुभवी आगरकर विश्वविजेत्या संघाचा भाग होता हे दुर्लक्षून चालणार नाही.
 
मुंबईचा कर्णधार
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा संघ दादा मानला जातो. वयोगट स्पर्धांपासून मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा अजित संघाचा अविभाज्य घटक झाला. 2013 मध्ये मुंबईने रणजी करंडक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं.
 
पहिल्या सत्रात मुंबईच्या कामगिरीत सातत्य नव्हतं. दुसऱ्या सत्रात आगरकरने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये दमदार प्रदर्शनासह संघासमोर आदर्श ठेवला.
2010 मध्ये मुंबई आणि कर्नाटक यांच्यात म्हैसूर इथे रंगलेल्या चुरशीच्या फायनलमध्ये आगरकरने टाकलेला जबरदस्त स्पेल आजही क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहे. कर्नाटकसमोर 338 रन्सचं लक्ष्य होतं. आगरकरने पाच विकेट्स घेत कर्नाटकच्या डावाला खिंडार पाडलं. कर्नाटकचा 331 मध्ये ऑलआऊट झाला.
 
खेळाडू म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानंतर मुंबई संघाच्या निवडसमितीचे प्रमुख म्हणून आगरकर यांनी काम पाहिलं आहे.
 



Published By- Priya Dixit