1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

जगण्याची मैफिल अर्ध्यावर सोडून ‘सर’ गेले

- नितिन फलटणकर

PR
PR
सहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, मी आणि माझ्यासारखेच काही पत्रकार मंडळी श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या रौप्य महोत्सवी वर्षासाठी बंगलुरुत गेलो होतो. मी, अभिनय, आर्ट ऑफ लिव्हिंगचा कॉर्डिनेटर अनुप, लोकमतचे सुधीर कुलकर्णी असा आमचा छान ग्रुप जमला होता. जगण्याची कला आम्ही शिकण्यासाठी जात होतो. हे दिवस आजही आठवतात.

15 दिवसांचा सहवास होता तो. प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखे होते. या प्रवासात. सुधीर भाऊ शिकवत होते,आनंदी कसे राहावे, अनुपकडे पाहिल्यावर वाटायचे किती छान हसरा मुलगा आहे हा. आणि तिसरी व्यक्ती होती ‘अभिनय’. चालता बोलता ज्ञानकोश म्हटलं तर यात वावगं काही नाही.अभिनयला कशात रस नव्हता, कदाचित असा विषयच नसेल. वाचनापासून ते साहित्य, कला, संस्कृती, संगीत, नाटक, चित्रपट, लेखन, ब्लॉग, खवय्येगिरी, या सगळ्या जगण्याच्या कलेवर त्याचे मनापासून प्रेम होतेच, शिवाय तो एक उत्तम समीक्षकही होता.

इंदूरमध्ये आम्ही एकदा भिमराव पांचाळे यांच्या मराठी ‘गझल’मैफिलीला गेलो होतो. या मैफिलीत अभिनयने मनमुराद दाद दिली होती, की पांचाळेंनाही ही दाद आपलीसी वाटली होती. अभिनयशी चर्चा करताना नेहमीच विविध विषयांची माहिती मिळायची. मराठीतील काना, उकार, वेलांटी मी त्याच्याकडूनच शिकलोय. ऑफिसमध्ये तो माझा ‘सर’ असायचा, पण ऑफिस संपलं की मग चांगला मित्र. आज गुरुपौर्णिमेनिमित्त पुन्हा एकदा त्याची आठवण मनाला सतावत आहे. तो अजूनही आपल्यातच आहे, असे माझे मन मला सांगत आहे.

काही जणांना एखाद्या विषयावर चर्चा करण्याची सवय असते. अभिनयचंही तसेच असायचे. पण त्याच्याशी चर्चा करताना आपल्याला त्याच्याकडून बरेच काही शिकायला मिळतेय याचे मनोमन समाधान असायचे.तो केवळ चर्चाच करायचा असे नाही तर, या चर्चेच्या माध्यमातून बरेच काही शिकवायचाही.अभिनयशी झालेल्या चर्चेच्या माध्यमातून एखाद्या विषयावरचा त्याचा सखोल अभ्यास त्यातून जाणवायचा.

अभिनयला ‘वेब दुनियात’ येऊन साधारण दीड वर्षे झाली असतील. त्यानंतर मी आलो. सुरुवातीपासूनच आम्ही मराठी साईटमध्ये करावयाच्या बदलांचे प्लॅनिंग करायचो. नेहमीच नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न. अभिनय वाचकांच्या मनात डोकवायचा. काही लिहिले किंवा त्याला दाखवले की, तो वाचकांना हे पटणार नाही, असे ठासून सांगायचा. त्याच्या सांगण्यात एक वाचक दडलेला असायचा.

प्रत्येकालाच काहीतरी देण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असायचा.वेब दुनियात असताना प्रत्येक भाषेच्या व्यक्तीसोबत तो नेहमीच विविध विषयांवर चर्चा करायचा. ओरिसा, पश्चिम बंगाल, गुजरात, या राज्यातील लेखक कसे आहेत? त्यांची लेखनशैली कशी आहे? मराठी इतकेच त्यांचे साहित्य समृद्ध आहे का? तुमच्या राज्यात काय पाहण्यासारखे आहे? खाण्याचे पदार्थ, या आणि अशा विविध विषयांवर त्याची चर्चा चालायची. या माध्यमातून त्याला या राज्यांचा इतिहासही बर्‍यापैकी माहीत झाला होता.

अभिनयमध्ये जसा एक शिक्षक दडलेला असायचा तसाच त्याच्या शिक्षकाच्या पाठोपाठ त्याच्या विद्यार्थीपणाची सावली त्याच्या पाठीशी असायची. आमचा एक सहकारी विकास. त्याला टेक्निकल ज्ञान चांगले आहे. अभिनय जरी आमचा सर असला तरी, विकास किंवा इतर कोणी एखाद्या विषयाची माहिती देत असेल तर अभिनय आवर्जून ते ऐकायचा. त्याची माहिती आत्मसात करायचा.आपण या मुलांचे सर आहोत, आपण त्यांचे म्हणणे का ऐकायचे? असे त्याला कधीच वाटत नसे. चूक असणार्‍यांच्या विरोधात तो ठाम असायचा, तर बरोबर असणार्‍यांची साथही तो तितक्याच ताकदीने द्यायचा.

आज गुरुपौर्णिमा असल्याने अभिनयची जाणीव प्रकर्षाने जाणवत आहे. आज हा लेख लिहितानाही अभिनयची कमी मला जाणवत आहे. माझा प्रत्येक लेख तो वाचत, त्यातील चुका सांगत, बदल करत, आज मी लेख लिहीत आहे, पण यातील मात्रा, वेलांटी, उकार तपासणारा माझे ‘सर’ आमच्यात नाही, ही खंत आयुष्‍यभर मनाला खात राहील.