शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By वेबदुनिया|

स्वामी विवेकानंदांच्या साहित्यातून

हिंदूंच्या बुद्धीच्या प्रखर शस्त्राला मखमलीच्या आवरणा-प्रमाणे वेढून असलेली त्यांची एक मन:शक्ती म्हणजे कविप्रतिभा. हिंदूंचा धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र हे सर्व कविप्रतिभेच्या पुष्पासनावर शोभत आहे. ज्या भाषेत हे सर्व निर्माण झाले, त्या भाषेचे नाव ‘संस्कृत’ म्हणजे ‘परिपूर्ण’ असे आहे.

या विविध विषयांची प्रतिमासृष्टी संस्कृतमध्ये जेवढी उत्तमरितीने व्यक्त झाली आहे, तेवढी अन्य भाषांमध्ये होऊ शकली नसती. अगदी गणितासारख्या रुक्ष विषयालाही सुस्वर संख्यापाठाने रुची प्राप्त करून दिली आहे.

ही विचक्षण मन:शक्ती आणि द्रष्टय़ा प्रतिभेची भरारी ही हिंदू मनाच्या जडणघडणीची दोन प्रमुख वैशिष्टय़े आहेत. ही दोन मिळून हिंदू राष्ट्रीय चारित्र्याच्या प्राणस्वर निर्माण झाला आहे. बुद्धी आणि प्रतिभेचे हे असे रसायनच एखाद्या वंशाला इंद्रियज्ञानाच्या पलीकडे झेपावण्याची शक्ती देते. लोहछेदील अशी धारदार आणि तरीही लवविली तर मंडलाकार होईल, इतकी लवचिक अशी ही प्रज्ञाच विश्वरहस्याचा वेध घेते.

त्यांनी सोन्यारुप्याच्या अक्षरांत काव्य लिहिले, रत्नांच्या स्वरगीतिका रचल्या, संगमस्वरातून सौंदर्याचे चमत्कार घडविले, रंगांची माया उभी केली आणि स्वप्नसृष्टीतच आढळेल असे तलम पोत आपल्या पार्थिव हातांनी विणले. या सर्वाच्या मागे सहस्त्रावधी वर्षाचा हा बुद्धिप्रतिभेचा दुपदरी हिंदू प्राणस्वर होता.

कला आणि शास्त्रे यांच्यामुळे अगदी घरगुती जीवनातील गोष्टींवरसुद्धा काव्यकल्पनांची आभा झळाळू लागली. इंद्रियस्पर्शच अतिंद्रिय झाले आणि रूक्ष व्यवहारही स्वप्नसृष्टीच्या स्वप्नील रंगांनी शोभू लागला.