रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (21:27 IST)

ऑन स्क्रीन वाचनामुळे डोक्यावर काय परिणाम होतो?

अंजली दास
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले होते की, 'वाचनामुळे त्यांना स्वतःवर विश्वास ठेवायला आणि ते कोण आहेत हे समजायला मदत झाली.'
 
वाचनाच्या सवयीमुळे ताण-तणाव कमी होतो, मेंदू सक्रिय राहतो आणि तुमच्या संवेदनेचा स्तर देखील सुधारतो. शिवाय पुस्तकात असलेली माहिती तुम्हाला मिळतेच.
 
न्यूयॉर्कमधील द न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्चच्या मते, पुस्तकं वाचल्याने व्यक्तीच्या तत्वांमध्ये बदल होतो.
 
पण आज कागद किंवा पुस्तक आधारित वाचन मागे पडून कॉम्प्युटर, टॅबलेट, मोबाईल अशा डिजिटल उपकरणांवर वाचन सुरू झालं आहे. विशेषत: कोरोना साथरोगानंतर त्यात मोठी वाढ झाली आहे.
 
ऑन स्क्रीन वाचण्याचे फायदे
"स्मार्टफोनवर छोट्या बातम्यांचे अपडेट्स वगैरे आरामात वाचता येतात. पण जर भावनिक आणि समजण्यास कठीण असलेल्या गोष्टी तुम्ही स्मार्टफोनवर वाचत असाल तर तुमची समजून घेण्याची क्षमता कमी होते," असे प्राध्यापिका एन मेंगेन म्हणाल्या.
 
तसं तर डिजिटल माध्यमातून वाचण्याचे काही फायदे आहेत. जसं की पुस्तकाची प्रत विकत घ्यायला गेलं की ती महाग मिळते पण तेच पुस्तक ऑनलाईन कमी किमतीत वाचायला मिळतं. पण अनेक संशोधनांनुसार त्याचेही तोटे आहेत.
 
बीबीसी रिलवर प्रकाशित झालेल्या 'व्हॉट डज रीडिंग ऑन स्क्रीन डू टू ऑर ब्रेन' गोष्टीनुसार, डिजिटलायझेशनच्या परिणामांवर संशोधन करण्यासाठी 30 हून अधिक देशांतील तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ एकत्र आले.
 
या संशोधनात त्यांना काय आढळलं? यावर नॉर्वेमधील स्टॅव्हॅन्जर विद्यापीठातील प्राध्यापक आणि लेखिका अॅनी मॅनगेन म्हणतात, "आम्हाला असं आढळलं की स्मार्टफोनवर आपण वाचू शकतो अशा अनेक गोष्टी आहेत. जसं की, छोट्या बातम्यांच्या अपडेट्स आहेत. पण स्क्रीनवर वाचलेली माहितीची समज पुस्तकाच्या तुलनेत कमी आहे."
 
अमेरिकन स्वयंसेवी संस्था 'सेपियन लॅब्स'ने नुकत्याच दिलेल्या एका अहवालानुसार, लहान वयात मुलांना स्मार्टफोन दिला तर त्याचे परिणाम तरुणपणात दिसून येतात.
 
सायंटिफिक अमेरिकानाच्या मते, जेव्हा आपण कागदापेक्षा स्क्रीनवर वाचतो तेव्हा आपला मेंदू अधिक संसाधनं वापरतो आणि आपण स्क्रीनवर जे वाचतो ते दीर्घकाळ लक्षात ठेवणं देखील कठीण जातं.
 
त्यामुळे आपण कोणत्या माध्यमातून वाचतो यापेक्षा आपण काय आणि किती वाचतो हे महत्त्वाचं आहे. कारण वाचनाचा परिणाम मानवी मनावर होत असतो. यामुळे तुमच्या मनात तयार होणारं दृश्य, भाषा, भावना जोडल्या जातात.
 
'मुलांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरणं टाळावं'
अश्विका भट्टाचार्य ही इयत्ता 9 वीची विद्यार्थिनी आहे. वर्गात नेहमी पहिली येणारी अश्विका पुस्तकं वाचायची, पण आज इलेक्ट्रॉनिक स्क्रीनकडे तिचा ओढा वाढलाय.
 
तसं तर तिच्या आईवडिलांनी तिला वाचनासाठी किंडल टॅबलेट दिला आहे. पण तरीही तिने पुस्तकं वाचावीत असं त्यांना वाटतं.
 
अश्विकाची आई असिमा सांगतात, "आम्ही सतत ऐकतोय की गॅजेट्सच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर अनेक दुष्परिणाम होतात, त्यामुळे मला माझ्या मुलीला पुस्तकं वाचायला लावायची आहेत."
 
तेच आश्विकाची मैत्रिण आद्या सांगते की तुम्ही रोज थोडा थोडा वेळ वाचू शकता.
 
ती सुचवते, "तुमच्या मित्रांना आणि शिक्षकांना चांगल्या पुस्तकांबद्दल विचारा आणि तुमच्या आवडीनुसार पुस्तकं वाचा."
 
ग्रंथालयातून घेता येतील पुस्तकं
ब्रिटीश कौन्सिल ग्रंथालयाची सदस्य असलेली आद्या सांगते, "प्रत्येक पुस्तक विकत घेऊनच वाचलं पाहिजे असं गरजेचं नाही. तुम्ही शाळेत किंवा तुमच्या जवळच्या ग्रंथालयाचे सदस्यही होऊ शकता."
 
इन्फोसिस समूहाच्या संचालिका आणि लेखिका सुधा मूर्ती यांचेही म्हणणे आहे की, मुलांना पुस्तकं वाचण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे.
 
त्या म्हणतात, "आज मुलांचं लक्ष विचलित करण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. जसं की इलेक्ट्रॉनिक गॅझेट. मला असं वाटतं की, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समुळे मुलांच्या डोळ्यांना होणारी हानी टाळली पाहिजे."
 
पद्मश्री सुधा मूर्ती जयपूर साहित्य संमेलनात म्हणाल्या होत्या की, "मुलांना किमान 14 वर्षं वयापर्यंत पुस्तकं वाचण्याचा आग्रह धरा.
 
या काळात पालकांनी मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅझेटपासून पूर्णपणे दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुले 16 वर्षांची झाली की, त्यांना पुस्तके वाचायची आहेत की नाही हे त्यांच्यावर सोडून द्या."
 
वाचनाचे तीन चमत्कारिक फायदे
बीबीसीचे सहकारी डॅनियल निल्स रॉबर्ट्स यांच्या 'व्हॉट डज रीडिंग ऑन स्क्रीन डू टू ऑर ब्रेन' या रिलमध्ये ब्रिटिश लेखिका क्रेसिडा कॉवेल सांगतात की वाचनामुळे सर्जनशीलता, ज्ञान आणि सहानुभूती असे तीन अद्भुत गुण अंगी येतात.
 
त्या सांगतात, "एखाद्या मुलाला वाचनाची आवड असेल तर त्याचे दोन फायदे होतात. एक म्हणजे त्याच्या ज्ञानाचा आवाका वाढत जातो आणि दुसरा म्हणजे तो भविष्यात आर्थिकदृष्ट्याही यशस्वी होऊ शकतो."
 
वाचनाचे चमत्कारिक फायदे
 
सर्जनशीलता, ज्ञान आणि सहानुभूती वाढते.
 
मेंदूत दृश्य, भाषा आणि भावनिक तर्क तयार होतात.
 
वाचनामुळे ज्ञान आणि आर्थिक व्याप्ती वाढते.
 
पुस्तके वाचल्याने तुमचे मन शांत होते आणि तणाव कमी होतो.
 
स्क्रीनवर वाचलेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात ठेवणे अवघड असते.
 
वाचनाची सुरुवात कधीपासून झाली?
'व्हॉट डज रीडिंग ऑन स्क्रीन डू टू ऑर ब्रेन' या बीबीसीच्या रीलमध्ये अभ्यासक मारियान वुल्फ म्हणतात की, वाचन ही एक कला आहे जी सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आली.
 
त्या सांगतात, "आपल्याकडे किती वाइन किंवा मेंढ्या आहेत याची मोजणी करण्याने याची सुरुवात झाली. जेव्हा वर्णमाला तयार झाली, तेव्हा माणसाने काहीतरी वाचून लक्षात ठेवण्याची आणि माहिती मिळवण्याची कला आत्मसात केली."
 
पुस्तकं का वाचावीत?
कला आणि मानववंशशास्त्र विभागाच्या सहयोगी संचालक डॉ. एमिली बुलॉक, सर्जनशील लेखनाचे व्याख्याते डॉ. जोआन रीर्डन आणि ब्लॅक गर्ल्स बुक क्लबच्या संस्थापक नताली कार्टर बीबीसीच्या 'व्हॉट डज रीडिंग ऑन स्क्रीन डू टू ऑर ब्रेन' रीलमध्ये सांगतात की, प्रत्येकाने पुस्तकं वाचली पाहिजेत.
 
त्या सांगतात, "पुस्तकं आपल्याला जीवनाचा अनुभव देतात. ती माहितीने परिपूर्ण असतात. ती आपल्याला समाजाबद्दल सांगतात."
 
नताली म्हणते, "मला वाटतं भविष्यात आपल्याला लघुकथांचे आणखी संग्रह पाहायला मिळतील आणि पुस्तकांचा आकार आणखी लहान होईल. जर पुस्तकं नसतील तर आपण मरून जाऊ, आयुष्य खूप कंटाळवाणं होईल."
 
बिब्लियोथेरपिस्ट एला बार्थोड म्हणतात, "पुस्तकं नसती, तर आज आपण जसे आहोत तसे नसतो. मानवी जीवनातील सर्वांत मोठा बदल म्हणजे 'अग्नी निर्माण करण्याची शक्ती' आणि 'वाचन कौशल्य'."
 
बिब्लियोथेरपीद्वारे (Bibliotherapy) व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर उपचार केले जातात. यामध्ये इतर पारंपारिक उपचार पद्धतींसह पुस्तकांचंही वाचन करायला लावतात.
 
एला बार्थोड म्हणतात, "चांगल्या गोष्टी वाचणं मनोरंजनापेक्षा जास्त चांगलं आहे. वाचनाचा उपचारात्मक परिणाम होतो."
 
एक उदाहरण देताना एला सांगतात, "एखाद्या बंद जागेत घुसमटल्यासारखं वाटणं, थकवा येणं आणि राग येणं यासारख्या गोष्टींसाठी 'झोर्बा द ग्रीक' हे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला जातो."
 
त्या सांगतात, "यामध्ये तुमचं मन ध्यानस्थ अवस्थेत जाते. ही अशी प्रक्रिया आहे जी हृदयाचे ठोके संतुलित करते, ती तुम्हाला शांत करते आणि तुमच्या मनातील चिंता कमी करते."