शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जुलै 2021 (23:14 IST)

आलं व सुंठीतील फरक समजून घ्या!

हे कंद जेव्हा ओला असतो तेव्हा त्याला आलं, अदरक असे म्हणतात. तोच कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. दोन्ही मूलत: एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे.
 
आलं हे कटु, उष्ण, तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारे आहे. म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात त्याचा वापर मुद्दाम जास्त करावा.
 
आलं हे अग्निदीपक आहे. भूक लागत नसेल, अजीर्ण झाले, तोंडाला चव नसेल तर आले द्यावे. जेवणापूर्वी 1/2 तास अगोदर आल्याचा तुकडा मिठासोबत खावा किंवा आल्याचा रस एक चमचा आणि थोडेसे काळे मीठ टाकून घ्यावे. यामुळे भूक लागते.
 
पडसे, खोकला असताना आल्याचा रस पिंपळीपूर्ण व मधासोबत द्यावा. हा प्रयोग दिवसातून तीन वेळा करावा.
 
आल्याचा रस मधासोबत दिल्याने उचकीसुद्धा कमी होते. संपूर्ण अंगावर सूज येत असेल तर आले गुळासोबत खाल्लयाने फायदा होतो.
 
आल्यापासून आल्याचा कीस, सुपारी, पाक बनविता येतात. आल्याचा पाक करताना आल्याच्या रसात विलायची, जायफळ, लवंग, पिंपळी, काळी मिरी, हळद, साकर टाकावी. यामुळे आलेपाक जास्त गुणकारी बनतो.
 
सुंठीवाचून खोकला गेला ही म्हणं असली तरी खरोखरचा खोकला हा सुंठीशिवाय जात नाही हेच त्यातून स्पष्ट होते.
 
आल्याचा कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण, स्गिन्ध असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. मधुर असल्यामुळे तिचा वापर दौर्बल्यात होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामुळे आलेल्या अशक्तपणात सुंठीचा शिरा देतात. चांगल्या तुपात भाजून साखर टाकून केलेला हा शिरा बलवृद्धी करतो. या शिर्‍यामुळे आम्लपित्तसुद्धा कमी होते.
 
सुंठ पावडर रात्रभर एरंडेल तेलात भिजवावी. सकाळी हे सर्व मिश्रण पीठात टाकून त्याच्या पोळ्या खायला द्याव्या. यामुळे आमवात निश्चितपणे कमी होतो.
 
याशिवाय सुंठही खोकल्यावरील रामबाण औषध आहे. सुंठीची काळी राख किंवा सुंठ पावडर मधासोबत दिल्याने खोकला कमी होतो. तसेच पडसे असताना सुंठ, दालचिनी व खडीसाखरेचा काढा करून द्यावा. खोकला व पडशामुळे डोके दुखत असेल तर सुंठ पावडरचा गरम लेप डोक्यावर व छातीवर लावावा. याने डोकेदुखी थांबते व खोकलाही कमी होतो. सुंठीचे अनेक फायदे असले तरी सुंठ ही पित्ताचे व त्वचेचे विकार असणार्‍यांनी वापरू नये. तसेच सुंठ उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात वापरू नये.