प्रेम करा...विश्वासघात नाही !
प्रेमावर शिंतोडे उडवणारी घटना हरियाणात घडली आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा मुलगा चंद्रमोहनचा प्रेमविवाह म्हणजे 'प्रेमासाठी वाट्टेल ते' ची कथा आहे. चंद्रमोहनचे अनुराधा बाली या तरूणीशी प्रेम जमले. तिच्याशी लग्न करण्यासाठी तो धर्म बदलून चांद मोहम्मद बनला. अनुराधा बालीनेही मुस्लिम धर्म स्विकारला. मुस्लिम धर्म स्विकारल्याने अनुराधाच्या वडीलानी तिच्याशी असलेले नाते तोडून टाकले.
हे प्रकरणही जुने झाले असताना आता अचानक चांद मोहम्मद अचानक रहस्यमयरित्या बेपत्ता झाला आहे. त्याची पत्नी फिजा उर्फ अनुराधा बालीने त्याचे अपहरण झाल्याचा आरोप केला आहे. पतीच्या अपहरणासाठी तिने त्याचा सख्खा भाऊ कुलदीप विश्नोईला जबाबदार धरले आहे. पतीच्या अपहरणाचा फिजाच्या मनावर मोठा परिणाम झाला असून तिने अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन केले आहे. सध्या ती चंडीगड येथील रूग्णालयात उपचार घेत आहे. एकमेकासोबत जीवन मरणाच्या आणाभाका खाल्लेल्या, साताजन्माच्या प्रवासाला निघालेल्या चंद्रमोहन व अनुराधाची अवघ्या दोन महिन्यातच ताटातूट झाल्याचे दिसत आहे. यात गुन्हा कोणाचा? असा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारे कायद्यात पळवाटा काढून होणारे विवाह थांबविता येणार नाहीत का असा प्रश्न विचारला जात आहे.
केवळ एकमेकांशी लग्न करण्यासाठी म्हणून धर्म बदलणारे हे दोघे खरोखरच एकमेकांवर प्रेम करताहेत काय. केवळ प्रेमासाठी दोघांनीही आपल्या कुटुंबियांना सोडून दिले आहे. आपली जबाबदारी टाळून हे दोघे एकत्र आले आहेत. त्याची तीव्र प्रतिक्रिया समाजात उमटत आहे.
भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीकडून घाला घालण्याचे काम सुरू आहे. पाश्चात्य संस्कृतीचे सर्रास अंधानुकरण केले जात आहे. समाजात असेही प्रेमी युगल आहेत ज्यांनी आधी अपत्याला जन्म देऊन सप्तपदी घातली आहे.
भारतीय विवाह परंपरा आदर्श मानून हल्ली अनेक परदेशी जोडपे भारतात येतात आणि लग्न करतात. असे का होते. दुसरीकडे चांद मोहम्मद व फिजासारखी प्रेमी जोडपीही आहेत. आपल्या पवित्र भारतीय संस्कृतीवर घाला घातला जात आहे.