बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. लिटिल चॅम्प्स
Written By अभिनय कुलकर्णी|

आर्याचा आशाताईंसारख्या अष्टपैलुत्वासाठी ध्यास

WDWD
लोक ऑटोग्राफ मागतात. तेव्हा छान वाटते. पण जबाबदारीची जाणीवही होते, ही आर्या आंबेकरची सुरवातीची प्रतिक्रियाच तिच्यातली 'सिन्सिअरिटी' दाखवून देणारी आहे. म्हणूनच 'लिटिल चॅम्प्स'च्या कार्यक्रमाने मिळालेलं यश, दिगंत कीर्ति या सगळ्यांकडे आर्या अपेक्षांचं ओझ्यापेक्षा जबाबदारी म्हणून पाहते. त्यामुळेच आतापर्यंत केलेले कष्ट वाया जाऊ न देता, आत्ता गाठलेली उंची वाढविण्याचा प्रयत्न करण्याचा तिचा मानस आहे.

या सहा महिन्यांच्या प्रवासात बरंच काही शिकायला मिळालं असलं तरी बरंच काही शिकायचं राहिलं आहे, हेही तिला माहित आहे. परिपूर्णता अजूनही आलेली नाही. ती गाठण्यासाठी अविश्रांत मेहनत घ्यायची तिची तयारी आहे. आपल्यातल्या चुका घालविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ती सांगते.

'सारेगमप'च्या सहा महिन्यांच्या प्रवासात गाणं खूप समृद्ध झाल्याचे आर्याचे मत आहे. ती म्हणते, गाणं तर मी आधीपासूनच शिकत होते. पण त्याहीव्यतिरिक्त असलेल्या अनेक गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून कळाल्या. गाण्यात एक्स्प्रेशन कसे द्यायचे, खटके, फिरक्या कशा घ्यायच्या. त्याचे तंत्र काय असते हेही कळाले.

लिटिल चॅम्प्सच्या व्यासपीठावर अनेक मान्यवर आले आणि त्यांनी या सगळ्यांचे कौतुक करण्याबरोबर गाण्याच्या टिप्सही दिल्या. या सगळ्यांचाच मोठा प्रभाव तिच्यावर पडला. पण ह्रदयनाथ मंगेशकरांकरांनी 'शुरा मी वंदिले' या विशेष भागाच्या माध्यमातून जे काही शिकवले ते तिच्यासाठी अविस्मरणीय आहे. शब्दोच्चार कसे करावे, गाणं पाठ कसं करावं हे सांगतानाच त्यांनी एकेक ओळ पाचपाच वेळा आमच्याकडून म्हणवून घेतली हेही ती सांगते. याशिवाय शंकर महादेवन, हरिहरन यांनीही खूप टिप्स दिल्याचे आर्या सांगते.

आर्यावर आशा भोसलेंचा प्रभाव खूप आहे. तिने आतापर्यंत खूप गाणी गायली असली तरी आशाताईंसारखं अष्टपैलुत्व आपल्या गाण्यात यावे हा तिचा ध्यास आहे. त्यासाठीच ती मेहनत करते आहे. पण त्याचबरोबर माणिक वर्माही तिला खूप आवडतात.

या सहा महिन्यांनी आर्याला खूप काही दिलं. गाण्याच्या दृष्टिकोनातून तर दिलंच, पण शमिका भिडे, अवंती पटेल, शाल्मली सुखटणकर यासारख्या जीवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या हीसुद्धा आर्यासाठी मोठी कमाई आहे. म्हणूनच या तिघी एकामागोमाग एक स्पर्धेतून बाहेर गेल्या तेव्हा आर्याला स्वतःला सावरणे कठीण झाले होते.

'लिटिल चॅम्प' मुळे या मुलांकडे 'सेलिब्रेटी' म्हणून लोक पहात असले तरी या मुलांना मात्र, आपण आजही पूर्वीसारखेच आहोत, असे वाटते. पण सगळे लोक ओळखू लागल्याने काही गोष्टी करण्यावर बंधने येतात, असे वाटते. आर्या सांगते, एकदा मी पाणीपुरी खायला गेले होते. त्यावेळी सगळे माझ्याकडे बघत होते. अर्थात, मला त्रास काही झाला नाही. पण लोकांचे प्रेम खूप आहे हे कळते. ते पाहून संकोचायला होते.

आता आर्याची तयारी आहे ती शास्त्रीय संगीताचा पाया पक्का करण्याची. आईकडूनच ती गाणे शिकते. आता ते अधिक समृद्ध करण्यासाठी ती प्रयत्न करणार आहे.