गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी साहित्य संमेलन-०८
Written By वेबदुनिया|

सांगलीतील झळाळती नक्षत्रे

PRPR
सांगली गाव तसं छोटंसंच. पण या गावाने देशाला अनेक प्रतिभावंत व्यक्ती दिल्या. सांगलीचे कर्तेकरविते म्हणून ओळखले जातात ते राजेसाहेब अर्थात सांगलीचे तत्कालीन शासक, पद्मभूषण चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन. सांगलीला खर्‍या अर्थाने घडवले ते राजासाहेबांनीच.१४ फेब्रुवारी १८९० रोजी जन्मलेल्या राजासाहेबांनी सांगली, सातारा आणि सोलापूर या विभागातील शेतकर्‍यांना जणू नवसंजीवनीच दिली. त्यांनी त्या काळात त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जमिनीवर वैज्ञानिक संशोधनही केले होते. त्यांनी सांगलीचा सर्वांगाने विकास केला. सांगलीतलं शिक्षणाची स्थिती सुधारली. उद्योगधंद्याच्या वाढीसाठी प्रोत्साहन दिलं. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

नाटकाची जननी सांगल
सांगलीचा उल्लेख डोळ्यासमोर येतात ते मराठी रंगभूमीचे जनक विष्णूदास भावे. त्यांनीच 1843 ला पहिल्यांदा सीता स्वयंवर हे मराठी नाटक रंगमंचावर सादर केल. येथूनच मराठी नाटकांच्या वाटचालीस प्रारंभ झाला. ब्रह्मदेवाने जर या सृष्टीची निर्मिती केली असेल तर सांगलीतील ब्रह्म (विष्णूदास भावे), विष्णू (कृष्णाजी खाडिलकर), आणि महेश (गोविंद बल्लाळ देवल) या तिघांनी मराठी रंगभूमीची सेवा केली. नटवर्य देवल हेही सांगलीचेच. भावेंसोबतच त्यांनी सांगलीत नाटकांचे अनेक प्रयोग केले. त्यांच्या लिखाणाने तत्कालीन मराठी मनांवर संस्कार केले.
दुर्गा, संशयकल्लोळ ही त्यांची नाटके अजरामर झाली.

एकीकडे सांगलीकरांवर विविध नाटकांच्या माध्यमातून संस्कार होत असताना दुसरीकडे दादासाहेब वेलणकर नावाचे गृहस्थ सांगलीचं रूप पालटण्याचं स्वप्न उराशी बाळगून औद्योगिक विकासाच्या ध्येयाने ते सांगलीकरांना पुढे नेत होते. १९०८ मध्ये त्यांनी पहिली सूतगिरणी सुरू केली आणि पाहता-पाहता सांगलीचे औद्योगिक महत्त्व वाढले. १९३५ मध्ये ते जपानाला जाऊन आले. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांनी 'वल्कली' नावाचा नवीन कपडा बाजारात आणला.

नानासाहेब रामचंद्र पाटील अर्थात उभा महाराष्ट्र ज्यांना क्रांतीसिंह नाना पाटील या नावाने ओळखतो तेही सांगलीचेच. इंग्रजांना सळो की पळो करून सोडणार्‍या नानांनी तब्बल चारवर्ष 'पत्री सरकार' या नावाने समांतर राज्यकारभारही चालवला. त्यांना आपल्या कार्यकालात अनेकदा भूमिगतही व्हावे लागले. पण इंग्रजांपुढे त्यांनी कधी हार मानली नाही. 'देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपण लढा सुरूच ठेवू' असे ठासून सांगणारा हा लढवय्या नेता सांगलीकरांचे भूषण आहे.

'ययाती' या आपल्या कादंबरीने अजरामर झालेल्या विष्णू शिवराम खांडेकर अर्थात वि स खांडेकर याचा जन्मही सांगलीतलाच. खांडेकरांनी मराठी लेखकांना एक नवा दृष्टिकोन दिला. साहित्यातला सर्वोच्च सन्मान समजला जाणारा ज्ञानपीठ हा पुरस्कार प्राप्त करणारे मराठीतील ते पहिले लेखक.

जेव्हा शिक्षण सर्वोच्चस्थानी होते, तेव्हा एखाद्या खेळावर लक्ष केंद्रित करणे कठीण काम होते. याही काळात एक अशी व्यक्ती सांगलीत जन्माला आली. या व्यक्तीने, खेळाविषयीचे सारे गैरसमज बदलण्यास भाग पाडले. या व्यक्तीचे नाव होते विजय हजारे. ११ मार्च १९३५ ला सांगलीत त्यांचा जन्म झाला. ते जसे क्रिकेटपटू होते, तसेच उत्तम फुटबॉलपटूही होते. त्यांच्या कारकिर्दीत ६ हजार ३२१ धावा त्यांनी फटकावल्या. त्यात २२ शतके आहेत. रणजी सामन्यात त्यांनी २९१ बळीही घेतले.

केवळ चौथी पास असलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकारणात प्रभाव पाडला. वसंतदादाही मूळचे सांगलीचेच. त्यांचा जन्म १९१७ मध्ये सांगलीत झाला. शिक्षणानंतर त्यांचा रस शेतीमध्ये वाढला होता. परंतु १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. त्यांना इंग्रजांनी तुरुंगात डांबले. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यानंतर त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग सोडून आक्रमक मार्ग वापरण्याचे ठरविले. त्यांच्या या कारवायांनी इंग्रजांना चांगलेच जेरीस आणले होते. त्यांच्यावर इंग्रजांनी 1000 रुपयांचे इनामही ठेवले होते. त्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. तिथेही ते स्वस्थ बसले नाहीत. तुरुंगातून पळून जाताना त्यांना दुखापत झाली आणि ते पकडले गेले. त्यांना 13 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पुढे 1946 ला त्यांची तुरुंगातून सुटका झाली. सांगलीत त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. या नंतर त्यांनी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रीत केले. १९७६ ते १९८५ या काळात ते चार वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

संगीत क्षेत्रातही सांगलीचे योगदान महत्त्वाचे आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचे हे गाव. दिनानाथ मंगेशकर आणि कुटुंबीय 14 वर्षे सांगलीत वास्तव्यास होते. त्यांच्या बळवंत नाटक मंडळीला येथे मानाचे स्थान होते. आशा, उषा, हृदयनाथ या भावंडांचा जन्म इथलाच. या सार्‍यांनीच संगीत क्षेत्रात देशाचे नाव उत्तुंग केले.

सांगली ही अशा गुणवंतांची खाण आहे. इथल्या मातीतच पुण्याईचा गंध आहे.