शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By

एक हास्य: लाख मोलाचे

"का हो, कशी दिसतेय मी?" अल्काने समोर पेपर वाचत बसलेल्या अमोघला विचारले.
"सुंदर... नेहमीसारखी... काही विशेष?"
"अहो! मल्लिका येणार न आज! आमच्या महिला मंडळच्या गणेशोत्सवा साठी. सार्‍या गावाला माहिती आहे, तुम्ही आपले त्या पेपरातच डोकं घालुन राहाता. तुम्हाला काही ...!!" 
"कोण मल्लिका?" अमोघने तिला मध्येच थांबवत थंडपणाने विचारले.
"अहो मल्लिका!!! तुम्ही कमालच करता! ती नाही का? मी मालिका बघते रोज रात्री...त्या मालिकेतली नायिका! " अल्काचा उत्साह आकाशात मावत नव्हता..
"बरं...मग? काय विशेष करणार आहे ती मल्लिका?"
"ती आजच्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी आहे. अहो! आज तिच्या हातुन आरती होणार, महाप्रसाद वाटला जाणार, तीने होकार दिला आहे सर्वांशी बोलेल, सेल्फी काढेल! मला पण असं होतय कधी मी तिच्या बरोबर सेल्फी काढते" अल्काच्या चेहर्‍यावर प्रचंड आनंद होता.
"किती मानधन घेतलय तुमच्या मल्लिकेने, आपल्या गावात येण्यासाठी?"
"फक्त पन्नास हजार! तुम्ही पण चला न हो. जोड्याने सेल्फी घेऊ की..!"
"चललो असतो. पण..तुला आठवतं, गेल्यावर्षी माझा मित्र सीमेवर दहशतवादी हल्ल्यात हुतात्म्या झाला, आज मी त्याच्या मुलांना गणपतीची झांकी दाखवण्यासाठी नेणार आहे. येताना पिज्जा आणि आईस्क्रीम पार्टी आणि हो सेल्फीतर असणारच. 
हज्जारों खर्च करून खोटी आपुलकी आणि हास्य कमाविण्यापेक्षा त्या मुलांचे नैसर्गिक निरागस गोड हास्य माझ्यासाठी लाख मोलाचे असणार."
 
-ऋचा दीपक कर्पे