गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018 (08:46 IST)

वास्तूप्रमाणे प्रत्येक केलाचा एक छंद असतो....

वास्तुशास्त्रानुसार घर बांधणे एक शास्त्रीय काम आहे. त्याला कलेचे अधिष्ठान आहे. प्रत्येक कलेचा एक छंद असतो. छंद म्हणजे पद्यमय रचना. शास्त्रीय संगीतात छंद योजना, सुर, स्वर, लय यापासून रागाची उत्पत्ती होते व त्याचा रसपूर्ण आनंद आपल्यालामिळतो. वेगवेगळ्या छंदांपासून वेगवेगळ्या रागाची निर्मिती होते. त्याचप्रमाणे घरबांधणीतही प्रत्येक घर एक वेगळ्याच छंदात आकार घेते. 
 
यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे घराची आतली रचना, मुख्य दरवाजा, ब्रह्मस्‍थळे झोपायची खोली, देवघर, स्वंपाकघर हे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच घराचे बाह्यरूप (Front Elevation) ही तेवढेच महत्वाचे आहे कारण यावरून घराचे चरित्र, राहणार्‍याची मानसिकता, विचार व वास्तुतज्ज्ञाची समयसूचकता दिसते. 
 
वास्तुशास्त्रानुसार 6 प्रकारचे छंद असतात. 1. मेरू 2. खंडमेरू 3. पताका 4. सूची 5. उद्दीष्ट 6. नष्ट. या नावानुसार त्याची (घराची) आकृती असते. जसे मेरू हा याच नावाच्या पर्वताप्रमाणे, खंडमेरू अर्ध्या पर्वताप्रमाणे किंवा खंडित पर्वताप्रमाणे असतो. पताका छंद पताकांसारखा समान एका रेषेत असतो. रूची छंदात वास्तू एकाआड एक सूचीत असते. उद्दिष्ट व नष्ट हे छंद स्थापत्यशास्त्रज्ञ आपल्या विचाराने छंदांना एकत्र करून बनवतो. 
 
वास्तुतज्ज्ञाची लक्षणे :-
समरांगण सूत्रधारानुसार एका स्थापत्याला शास्त्र, कर्म, क्रिया, प्रज्ञाशील तसेच आचरणाने शीलवान असावे लागते. याच्या विश्लेषणावरून हे लक्षात येईल की वास्तुतज्ज्ञाला शास्त्र माहीत हवे. कर्म म्हणजे घर बांधण्याचे प्रयोजन, वास्तु-नियोजन, पदविन्यास याच्या प्रमाणांची माहिती हवी. तसेच प्रज्ञा म्हणजे स्वत:चा विवेकही त्याने वापरावा. शास्त्रांचे व्यावहारीक ज्ञान, शीलवान म्हणजे त्याचे आचरण शुद्ध असून तो राग, लोभ, मद, मोह, मत्सरापासून मुक्त हवा. यानुसार वास्तुतज्ज्ञ ज्योतिष, शिल्प, यंत्र-कर्म-विधी आणि वास्तुशास्त्राच्या इतर अंगांची योग्य माहिती असणारा हवा. या बरोबरच त्याला, आलेख, चित्रकला, काष्ठकला, चुना, धातुविद्याही यायला हवी.
 
वास्तुतज्ज्ञाचे गुण :-
हल्ली वास्तू बांधतांना सौंदर्य आणि टिकाऊपणा यांचा विचार जास्त केला जातो यात नैसर्गिक गोष्टींचा विचार कमी होतो. म्हणूनच आधुनिक वास्तुतज्ञाला आधुनिक घरबांधणीशास्त्राबरोबर स्थापत्यवेदातले वास्तुविषयक नियम, ‍सिद्धांत याचीही पूर्ण माहिती हवी कारण बांधलेल्या घरात राहणार्‍यांना सुख, संपन्न व आरोग्य लाभायला हवे.