चविष्ट काकडीची कोफ्ता करी
बटाटे,दुधी भोपळा,कॉर्न आणि मलईकोफ्ते आपण बऱ्याच वेळा खालले असणार परंतु काकडीचे कोफ्ते कधीच बनवले नसतील.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
कोफ्त्यासाठी साहित्य -
2 काकड्या,1/2 कप उकडलेला आणि मॅश केलेला बटाटा,2 मोठे चमचे कॉर्न फ्लोर,1 चमचा आलं मिरची पेस्ट,1/2 लहान चमचा तिखट,1/2 लहान चमचा मीठ,आणि तेल तळण्यासाठी.
करी बनविण्यासाठी साहित्य-
2 मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा,1/4 कप बारीक चिरलेले टोमॅटो,2 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर,1 लहान चमचा बारीक चिरलेले आलं,2 बारीक चिरलेल्या हिरवा मिरच्या,1/4 लहान चमचा हिंग,1/2 लहान चमचा गरम मसाला,1 लहान चमचा आमसूल पूड, 1/2 लहान चमचा तिखट,1/2 लहान चमचा जिरे,1/2 लहान चमचा हळद,1/2 लहान चमचा धणेपूड,मीठ चवी प्रमाणे,आणि 2 मोठे चमचे तेल.
कृती-
काकडी सोलून किसून त्यातील सर्व पाणी पिळून काढून टाका,हे एका भांड्यात ठेऊन त्यात मॅश केलेले बटाटे आणि कॉर्नफ्लोर मिसळा,तेल सोडून सर्व जिन्नस त्यात मिसळा आणि कणिक प्रमाणे मळून घ्या.आता या कणकेच्या गोळ्याचे इच्छित आकार देऊन कोफ्ते तयार करा.
आता एका कढईत तेल तापत ठेवा आणि त्यात हे कोफ्ते सोनेरी तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या.
आता कांदा,टोमॅटो आणि आलं हिरवी मिरची मिक्सर मध्ये वाटून घ्या.पॅन गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात तेल घालून जिरे हिंग घालून कांदा-टोमॅटो पेस्ट घालून परतून घ्या.गरम मसाला सोडून बाकीचे सर्व मसाले मिसळा.सारण तेल सोडू लागल्यावर 1 ग्लास पाणी घालून शिजवा.करी तयार आहे.या करीमध्ये कोफ्ते घालून गरम मसाला मिसळा.10 ते 15 नंतर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.