शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By वेबदुनिया|

एका आईचं मुलाला पत्रं...

प्रिय बाळ, 
कसा आहेस? खरं तर हे विचारायलाच नको. तू नेहमी प्रमाणेच आनंदीच असशील. आम्ही इथे सुखरूप पोहचलो. येताना वाटेत बाबांना थोडा त्रास झाला. घाबरण्यासारखं काही नाही. ते बरे आहेत. कालच तुझी खूप आठवण आली. तुझा वाढदिवस होता काल, आणि आम्हाला इकडं यावं लागलं.

सारं काही आठवत होतं. ते दिवस, तुझं बालपण, तुला आठवतं तो लहानपणी तुला लाल रंगाचा टीशर्ट खूप आवडायचा. तो मी इथे आणलाय माझ्यासोबत. मला माहितीय. तुला याचा राग येईल. पण तेवढीच रे तुझी आठवण म्हणून तो आणला.

तू आता मोठा झालास, पण तरीही ते छोटं झबलं पाहिलं की, मला तुझं बालपण आठवतं. या छोट्याशा झबल्यात तुझ्या अनेक आठवणी उराशी कवटाळून आम्ही इथे आलोत. वाटलं होतं काल तुझा फोन येईल म्हणून, पण नाही आला. तू नेहमी प्रमाणे कामात असशील म्हणून बाबांनीही मग फोन लावला नाही.

बाळा मागील आठवड्यात तुला चांगलाच ताप भरला होता. तब्येतीला जपत जा आता. काळजी घे. आम्ही येत राहू अधून-मधून तिकडे. चालेल ना? मुक्काम नसेल आमचा, पण तुझी भेट घेण्यासाठी म्हणून येत राहू.

old age home
बाकी इकडे क्षेम. तू म्हटल्या प्रमाणे या वृद्धाश्रमात साऱ्या सुखसोयी आहेत. बाबांना ताप आला तर अर्ध्यातासात डॉक्टर आले देखील. सकाळी उठल्यावर इथे प्रार्थना होते. माझे देव मी तिथेच सोडून आलेय. सकाळचा नाश्ता असतो. तुझ्या आवडीचाच मिळतो तोही. मग तेच खाता-खाता तुझी आठवण होते. 

जेवणात काही खास नसतं, पण आमच्या सारख्या म्हाताऱ्यांना पचतील असेच पदार्थ असतात. अरे येताना सांगायचं राहून गेलं. तू भेटला नाहीस म्हणून तुझ्या ड्रॉवरमध्ये बाबांनी मनिऑर्डरचे पैसे ठेवलेत. मुद्दाम तुझा वाढदिवस होता म्हणून. तसंच लाल रंगाचं तुला आवडणारं शर्ट घेशील.

तुझी आई....