सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जून 2023 (20:37 IST)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी वेळेतच खुले होणार

eknath shinde
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत  विमानतळ सुरु व्हावे, यासाठी आजची पाहणी आहे. सुरु असणाऱ्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
 
आज उलवे येथे प्रत्यक्ष विमानतळाची हेलिकॅप्टरद्वारे पाहणी केल्यानंतर अदानी समुहाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. श्रीरंग बरणे, खा. श्रीकांत शिंदे, आ. महेश  बालदी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, एमएआरडीएचे संचालक डॉ. संजय  मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सिडकोचे सहसंचालक कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.
 
नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते विमानतळाचे भूमीपूजन झाले होते. आणि उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होईल. विमानतळ उभारणीत चांगले आणि वेगाने काम सुरु आहे यांचा आनंद आहे. हा प्रकल्प  लवकरच लोकांसाठी खुला होईल यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत असेही  शिंदे यांनी सांगितले.
 
नवी मुंबई विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरु असून हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ असेल अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०२४ पर्यंत हे विमानतळ सुरु करण्याचा प्रयत्न असेल. यादृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला गती द्यावी हा आजच्या पाहणीचा उद्देश असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असल्याने हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल. मुंबईला विमानतळाच्या माध्यमातून एक चांगली भेट देणार असल्याचे ही श्री. फडणवीस म्हणाले.
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील २२ किलोमीटरचा सी-लिंक महत्त्वाचा दुवा ठरेल. दरवर्षी ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल. म्हणूनच मोठ्या शहारासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी परवानगीची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून ४२ विमाने उभी राहतील. ५५०० क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ ११.०४ किलोमिटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्या असतील.
 
विमानतळाच्या उभारणीबाबत अडचणी तत्काळ दूर कराव्यात आणि २०२४ मध्ये प्रवासी वाहतूक सुरु करावी, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल्या.
Edited by : Ratnadeep Ranshoor