गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 6 फेब्रुवारी 2020 (10:20 IST)

काय म्हणता, प्रदूषणामुळे चक्क रस्त्यांवर गुलाबी रंगाचा थर साचला

डोंबिवलीमध्ये  महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील (एमआयडीसी) रस्त्यांचा रंग प्रदूषणामुळे चक्क बदलला आहे. एमआयडीसीला लागून असणाऱ्या या रस्त्यांवर गुलाबी रंगाचा थर साचल्याचे दिसत आहे. यावेळी रस्त्यालगत असणाऱ्या गटारांमध्येही मोठ्याप्रमाणात रसायने (केमिकल) आढळून आली. संपूर्ण परिसरात या रसायनांचा दर्प पसरला आहे. त्यामुळे नागरिकांना डोळे चुरचुरण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 
 
यापूर्वी डोंबिवलीत रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे रासायनिक पाऊस पडल्याचा प्रकारही घडला होता. आता निर्जीव वस्तूंवरही प्रदुषणाचा परिणाम व्हायला लागल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासन आता काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्याची गंभीर दखल घेतल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्री सुभाष देशमुख आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.