शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (23:05 IST)

मुंबईतील 'या' परिसरातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी खंडित

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागातील परळ, काळेवाडी, नायगांव इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुव्यवस्थित करण्याकरिता काही तांत्रिक कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कामे योग्यप्रकारे होण्याच्या दृष्टीने मंगळवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत परिसरातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी खंडित करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
 
पाणीपुरवठा बंद असण्याच्या कालावधीत कालावधीत गोलंजी टेकडी जलाशयाच्या आतील परिसरातील ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे व ४५० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्यात येणार असून ४५० मिलीमीटर व्यासाच्या २ जलवाहिन्या निष्कासित करण्यात येणार आहेत. त्यामुळे  पाणीपुरवठा खंडित करण्यात येणा-या परिसरातील रहिवाशांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन BMC प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.
 
पालिकेने प्रसिद्ध केलेली सविस्तर माहिती
अ) परळ गांव येथील गं. द. आंबेकर मार्ग ५० टेनामेंटपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळ गांव मार्ग, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळिंभे मार्ग, एस. पी. कंपाऊंड या परिसरांना दररोज दुपारी १.४५ ते सायंकाळी ४.४५ या कालावधी दरम्यान पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.  
 
ब) काळेवाडी येथील परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी (भाग) साईबाबा मार्ग, मिंट वसाहत, राम टेकडी या परिसरांना दररोज रात्री ८.३० ते ११.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.  
 
क) नायगांव येथील जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रींग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेट्ये बाजार, भोईवाडा गांव आणि हाफकिन या परिसरांना दररोज सकाळी ७.०० ते १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.