सिंधूच्या स्वागतासाठी मुंबईची निलांबरी!
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या पीव्ही सिंधूच्या स्वागतासाठी ओपन डेकची सुविधा असलेली बेस्टची निलांबरी बस हैदराबादला रवाना झाली. निलांबरी बसला स्वागताचा मान मिळणार आहे. तब्बल 1600 किलोमीटरचा प्रवास करुन मुंबईकरांची निलांबरी सिंधूच्या स्वागतासाठी हैदराबादेत गेली आहे.
पीव्ही सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद हे भारतात परतणार आहेत. दोघांच्या स्वागतासाठी तेलंगण सरकारने जय्यत तयारी केली असून हैदराबाद विमानतळापासूनच सिंधू आणि गोपीचंद यांची विजयी मिरवणूक काढण्यात येईल.
सिंधूचा हैदराबादी बिर्याणीवर ताव मारण्याचाही मनसुबा आहे. सोबतच तिचं आवडतं आईस्क्रिमही तिला खायचं आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी तिला जिभेचे चोचले बाजुला ठेवावे लागले होते. मात्र आता देशाची मान अभिमानाने उंचावल्यावर तिला पुन्हा एकदा चटक भागवायची आहे.