‘यूपीए’च्या काळात झालेच नाही सर्जिकल स्ट्राइक: माजी डीजीएमओ
नवी दिल्ली- यूपीए शासनाच काळात कोणतेही सर्जिकल स्ट्राइक झालेले नाही, अशी माहिती तेव्हाचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांनी दिली आहे. भाटिया यांच्या या माहितीमुळे यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक कारवाया करण्यात आल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राइक कारवाई ही पहिल्यांदाच करण्यात आली आहे. यापूर्वी अशी कारवाई केव्हाही झालेली नाही, असेही भाटिया यांनी स्पष्ट केले आहे.
सर्जिकल स्ट्राइक कारवाईबाबत बोलताना भाटिया पुढे म्हणाले, की पाकिस्तानने आमच्या संयमाची सीमा तोडली होती. त्यांनी लक्ष्मणरेषाच तोडली आणि त्याचे फळ त्यांना भोगावे लागले.
यूपीए सरकारच्या काळात सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते असा दावा काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच केला होता. मात्र, यूपीए शासनकाळात जे झाले होते ते सर्जिकल स्ट्राइक नसून नियंत्रण रेषा ऑपरेशन होते, अशी माहिती देत माजी डीजीएमओ विनोद भाटिया यांनी काँग्रेसचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.