गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 20 जून 2018 (17:12 IST)

रेल्वे चक्क १५ किमी उलट दिशेने धावली

जगन्नाथपुरीहून भोपाळमार्गे बैतूलला जाणाऱ्या तीर्थ दर्शन स्पेशल रेल्वेमधील रेल्वे एरिया कंट्रोलरच मार्ग विसरल्याने मालखेडी स्थानकावरून बीना स्टेशनमार्गे भोपाळला न जाता ही स्पेशल रेल्वे चक्क १५ किमी उलट दिशेने झाशीमार्गावर वळली. हे बघताच हादरलेल्या प्रवाशांनी अटेंडंटला गाठले. त्यानंतर कुठे भलत्याच मार्गावर गेलेली ही रेल्वे अपेक्षित मार्गावर वळवण्यात आली. सुदैवाने झाशीमार्गावर दुसरी रेल्वे नव्हती .
 
ही घटना मंगळवारची असून बीना स्थानकाजवळील मालखेडी स्थानकातील आहे. सकाळी ८.४६ वाजता ही स्पेशल तीर्थ रेल्वे मालखेडी स्थानकात पोहचली होती. बीना मार्गे ती भोपाळला जाणार होती. पण ऐनवेळी एरिया कंट्रोलरने मालखेडी स्थानकाचे रेल्वेमास्तर हरिओम शर्मा यांना एक मेसेज पाठवला. त्यामुळे शर्मा यांनी रेल्वे झाशी मार्गावर वळवली. मालखेडी पासून १५ किलोमीटर दूर अंतर गेल्यानंचर रेल्वे आगासौद स्थानकात पोहचली. दरम्यान, बीना स्थानक न येता विरुद्ध मार्गावरील स्थानक आल्याचे बघून रेल्वे चुकीच्या दिशेने धावत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. यामुळे हवालदिल झालेल्या प्रवाशांनी तात्काळ रेल्वे अंटेंडंटला गाठले व विचारणा केली. त्यानंतर एरिया कंट्रोलरकडून झालेली चूक अंटेंडंटच्या लक्षात आली.त्याने संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले. त्यानंतर चुकीच्या मार्गावर गेलेली रेल्वे पुन्हा मागे आणत मालखेडी स्थानकावर आणण्यात आली.