मयांक भागवत
				  
	झारखंडमधील हेमंत सोरेन सरकार पाडण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केल्याचं प्रकरण काही दिवसांपासून चांगलच गाजतंय.
				  													
						
																							
									  
	 
	सरकार पाडण्यासाठी आमदारांना पैसे देण्याप्रकरणी, महाराष्ट्रातील तीन भाजप नेत्यांची नावं पुढे आली आहेत. यात, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नावंही घेतलं जातंय.
				  				  
	 
	"मी झारखंडला कधीच गेलो नाही. माझ्याकडे आमदारांचे नंबर नाहीत. हे सर्व आरोप कपोकल्पित आहेत," असं म्हणत बावनकुळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	तर, झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार पाडण्याच्या कटामागे महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलाय.
				  																								
											
									  
	झारखंड सरकार पाडण्याचं हे प्रकरण नक्की आहे काय? महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची नावं पुढे का येत आहेत? आपण जाणून घेऊया.
				  																	
									  
	 
	सरकार पाडण्याचं कथित प्रकरण काय आहे?
	हेमंत सोरेन सरकार पाडण्याचा हा कथित कट उघडकीस आणल्याचा दावा रांची पोलिसांनी 24 जुलैला केला होता.
				  																	
									  
	 
	शहरातील एका हॉटेलवर धाड घालत पोलिसांनी अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण प्रसाद महतो यांना अटक केली.
				  																	
									  
	 
	रांची पोलिसांच्या दाव्यानुसार, "तिन्ही आरोपींनी पोलीस चौकशीत सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचं जबाबात कबूल केलं."
				  																	
									  
	 
	रांचीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात, आमदार कुमाल जयमंगल यांच्या तक्रारीवरून सरकार पाडण्याचा कट रचल्याप्रकरणी 22 जुलैला गुन्हा नोंदवण्यात आला होता.
				  																	
									  
	झारखंड पोलिसांनुसार, "अटक आरोपींनी चौकशी दरम्यान राजकीय लोकांशी संपर्क करून रोकड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असल्याची कबुली दिली."
				  																	
									  
	 
	यानंतर झारखंडमधील हेमंत सोरेन सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
				  																	
									  
	 
	वृत्तसंस्था ANI शी बोलताना झारखंडचे कॉंग्रेस आमदार नमन कोंगारी यांनी मला मंत्रीपद आणि पैशाची ऑफर दिल्याचा आरोप केला होता.
				  																	
									  
	 
	ते म्हणाले, "मला जानेवारीपासून लोकं संपर्क करत होते. काही उद्योगपतींची नावं घेऊन, भाजपने त्यांना असं करण्यासाठी सांगितलंय, असा दावा करत होते."
				  																	
									  
	 
	मी त्यांची ऑफर नाकारून, मुख्यमंत्र्यांना याची माहिती दिली, असं नमन कोंगारी पुढे म्हणाले.
				  																	
									  
	 
	रांची पोलिसांनी सुरू केला तपास
	दरम्यान, रांची पोलिसांनी झारखंड सरकार पाडण्याच्या कटाप्रकरणी तपास सुरू केलाय.
				  																	
									  
	 
	रांचीचे स्थानिक पत्रकार रवी प्रकाश बीबीसीशी बोलताना सांगतात, झारखंड सरकार पाडण्याप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू झालीये.
				  																	
									  
	 
	"रांची पोलिसांची एक टीम काही दिवसांपूर्वीच दिल्लीला तपासासाठी गेली होती," असं ते म्हणाले.
				  																	
									  
	आमदारांना पैसे देण्याप्रकरणी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही आरोप आहे. त्यामुळे, रांची पोलीस महाराष्ट्रात चौकशीसाठी येण्याची शक्यता आहे का? यावर बोलताना रवी प्रकाश म्हणाले, "येणाऱ्या दिवसात रांची पोलिसांची टीम महाराष्ट्रात चौकशीसाठी येण्याची तयारी करतेय."
				  																	
									  
	 
	चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव पुढे कसं आलं?
	इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पोलीस चौकशीत तीन पैकी दोन आरोपींनी झारखंडमधील तीन आमदारांना सरकार पाडण्याबाबत चर्चेसाठी दिल्लीला नेण्यात आल्याची माहिती दिली.
				  																	
									  
	 
	सरकार पाडण्यासाठी भाजप नेत्यांसोबत दिल्लीत झालेली ही कथित मीटिंग 15 जुलैला झाल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितलं. हे आमदार दिल्लीत महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना भेटले, अशी माहिती आरोपींनी दिली होती.
				  																	
									  
	 
	आरोपींनी चौकशीदरम्यान महाराष्ट्राचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच नाव घेतल्यामुळे सोरेन सरकार पाडण्याप्रकरणी बावनकुळे यांचं नाव चर्चेत आलं.
				  																	
									  
	तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी, "पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये, चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव आहे," असं म्हटलंय.
				  																	
									  
	 
	याबाबत रांचीचे वरिष्ठ पत्रकार रवी प्रकाश म्हणतात, "रांचीच्या वृत्तपत्रांमध्ये पोलीस सूत्रांच्या नावाने, चंद्रशेखऱ बावनकुळे आणि भाजपच्या इतर नेत्यांची नावं छापण्यात येत आहेत. पण, पोलिसांनी अधिकृतरित्या या नावांना दुजोरा दिलेला नाही."
				  																	
									  
	 
	'मी झारखंडमध्ये पायही ठेवला नाही'
	हेमंत सोरेन सरकार पाडण्याच्या कथित कटाप्रकरणी प्रतिक्रिया देताना माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.
				  																	
									  
	 
	"मी महाराष्ट्र भाजपचा एक साधा कार्यकर्ता आहे. ही कपोकल्पित कहाणी आहे. मी झारखंडचा नेता नाही किंवा झारखंड राज्याचा प्रभारी नाही."
				  																	
									  
	 
	ते पुढे म्हणाले, झारखंडच्या 81 आमदारांपैकी माझ्याकडे कोणाचा नंबर नाही. त्या आमदारांकडेही माझा नंबर नाही. मी झारखंड आणि रांचीला कधीच गेलो नाही. हे भाजपला बदनाम करण्यासाठी रचण्यात आलेलं षडयंत्र आहे.
				  																	
									  
	 
	कॉंग्रेसचे झारखंडचे नेते म्हणतात, असं कोणतंही प्रकरण झालेलं नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला.
				  																	
									  
	 
	झारखंड सरकार पाडण्याचा हेतू नाही. कोणीही सरकार पाडण्याच्या विचारात नाही, असं ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
				  																	
									  
	 
	'महाराष्ट्र सरकार तपासात सहकार्य करणार'
	झारखंड सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. पैसे देऊन झारखंडमध्ये आमदार फोडण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलाय.
				  																	
									  
	 
	राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक म्हणतात, "या प्रकरणातील एक आरोपी अभिषेक दुबेनं त्याच्या जबाबात बावनकुळेंचं नाव घेतलं. बावनकुळे आमदारांसोबत चर्चा करून डील करत होते असं त्याने जबाबात म्हटलंय."
				  																	
									  
	 
	त्याचसोबत भाजपच्या दोन आमदारांचंही नाव घेण्यात आलंय, असा दावा नवाब मलिक यांनी केलाय.
				  																	
									  
	 
	या प्रकरणाच्या चौकशीसाठी "महाराष्ट्रात येणाऱ्या झारखंड पोलिसांच्या टीमला संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे," असं नवाब मलिक पुढे म्हणाले.
				  																	
									  
	 
	झारखंडमध्ये सत्तासमीकरण काय?
	 
	झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार स्थापन झालं. झारखंड विधानसभेत 81 आमदार आहेत.
				  																	
									  
	 
	झारखंड मुक्ती मोर्चा, कॉंग्रेस, राजद, भाकप आणि राष्ट्रवादीचे मिळून 51 आमदार आहेत.