गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 एप्रिल 2022 (21:34 IST)

किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्याचे निर्देश राज्य सरकारला द्या

झेड दर्जाची सुरक्षा असूनही भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ले होत असल्याने डॉ. सोमय्या यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ढिलाई होऊ नये यासाठी राज्य सरकारला निर्देश द्यावेत , अशी विनंती करणारे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले. या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, खा. गोपाळ शेट्टी, आ. सुनील राणे व स्वतः सोमय्या यांचा समावेश होता.
या निवेदनात म्हटले आहे की, 23 एप्रिल रोजी डॉ. सोमय्या यांच्या वाहनावर शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात सोमय्या यांच्या वाहनाची काच फुटून ते जखमी झाले. एवढी गंभीर घटना घडूनही बांद्रा पोलीस स्थानकात पोलीस उपायुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमय्या यांची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे बांद्रा पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी  डॉ. सोमय्या यांच्या नावाने बनावट प्राथमिक माहिती अहवाल दाखल करून घेतला. मुंबई पोलीस आयुक्तांनी हा बनावट एफआयआर प्रसार माध्यमांना वितरीत केला. या विरोधात डॉ. सोमय्या यांची तक्रारही दाखल करून घेतली गेली नाही.हा बनावट एफआयआर तत्काळ रद्द करावा व या संदर्भातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.