शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑक्टोबर 2017 (16:43 IST)

शिक्षणमंत्री तावडेंना बडतर्फ करा; नवाब मलिक यांची मागणी

मुंबई विद्यापीठाकडून तारीख पे तारीख हा उद्योग सुरु आहे. ऑनलाईन निकाल लावण्याच्या नादात ११ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या. जगभर ख्यातनाम असलेल्या मुंबई विद्यापीठाचे वाटोळे झाले. या पार्शवभूमीवर काल कुलगुरू संजय देशमुख यांची ज्याप्रमाणे हकालपट्टी केली, तशीच या खात्याचा पदभार सांभाळणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे  यांनाही बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबई विद्यापीठात काय घोळ आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यातच विद्यार्थ्यांच्या गुणत्तेवर शिक्षकांना वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या पद्धतीने मुंबई विद्यापीठाची दशा पाहता, शिक्षण खात्याचा कारभार न सांभाळू शकणाऱ्या तावडे यांना पदावर राहण्याचा काही अधिकार नाही, असा घणाघाती आरोपही मलिक यांनी केला.
'शिवरायांचे नाव घेऊन राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक'
ज्याप्रमाणे मुंबई विद्यापीठासंदर्भात तारीख पे तारीख चा खेळखंडोबा झाला, तसेच आता शेतकरी कर्जमाफीबाबतही सुरु आहे. कर्जमाफीची घोषणा अंगलट आल्यानंतर सरकारने दिवाळीच्या तोंडावर घाईघाईत प्रमाणपत्रे वाटली. पण काही दिवसातच सरकरचे पितळे उघडे पडले. डिजीटल कारभार म्हणजे निव्वळ बोगसपणा असून ही कर्जमाफी नियोजनशून्य असल्याची टिका नवाब मलिक यांनी केली. सरकारमध्ये अजूनही कर्जमाफी देण्याची कुवत नाही. त्यामुळे या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका मलिक यांनी केली.
शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्यांमध्ये ग्रामीण भागात इंग्रजी भाषेतील याद्या पाठवण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा ब्रिटिश राजवटीची आठवण झाली, अशा शब्दात मलिक यांनी सरकारला कोपरखळी मारली.