नीरव मोदीचा बंगला स्फोटकांनी उडवून जमीनदोस्त केला
पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावत परदेशात पसार झालेला मुख्य आरोपी नीरव मोदी याचा अलिबाग किहीम येथील रुपन्या हा बंगला स्फोटकांनी उडवून देत जमीनदोस्त करण्यात आला. हा बंगला जमीनदोस्त करताना बंगल्याच्या चारही बाजूनी सुरुंग लावण्यात आला होता. यासाठी तब्बल ३० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. जिल्हाधिकारी तसेच महसूल, पोलिस, बांधकाम कर्मचारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
डायमंड किंग निरव मोदी यांचा किहीम येथील बंगला सीआरझेडचे उल्लंघन केल्याने जिल्हाधिकारी यांनी अनधिकृत ठरवला होता. त्यानुसार मोदी याच्या बंगल्यावर १७ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यास सुरुवात केली होती. यासाठी जेसीबीच्या साहाय्याने बंगला पाडण्याचे काम सुरू केले होते. मात्र हा बंगला आरसीसी व दगडाने मजबूत बांधकाम करून बांधला असल्याने तो पाडण्यास दिरंगाई होत होती. यासाठी मोदी यांचा हा बंगला सुरुंग लावून पाडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला.