शिवसेनेचा वाद आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला
Shiv Sena's dispute has reached the Supreme Court again शिवसेनेचा वाद आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेवर १४ जुलैरोजी सुनावणी होणार आहे.
विधानसभा अध्यक्ष अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्यास चालढकल करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दोन महिने झाले तरी विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नसल्याचे म्हणत ही याचिका दाखल केली आहे.
शिंदे-ठाकरे गटाच्या वादावर ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांना मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. तरी देखील राहुल नार्वेकर जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा आरोप या याचिकेतून केला आहे. यावर १४ जुलैला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ही याचिका दाखल झाल्यानंतर नार्वेकर यांनी हालचाली करत शिंदे गटाच्या ४० आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. या आमदारांना अपात्र का केले जाऊ नये असे विचारत सात दिवसांच्या आत उत्तर मागविले आहे. लेखी उत्तर आले नाही तर विधानसभा अध्यक्ष आमदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलावणार आहेत. निवडणूक आयोगाकडून विधीमंडळाला शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झाली आहे. त्यावर तसेच आमदारांनी दिलेल्या पुराव्यांआधारे नार्वेकर निकाल देणार आहेत.